‘क्वाड’चे भवितव्य आणि परिणाम

दक्षिण चिनी समुद्रात चीनची वाढलेली दादागिरी आणि जपान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स व इतर छोटय़ा देशांच्या सामुद्री सीमांमध्ये प्रवेश करून या देशांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांना तोंड देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अमेरिकेच्या पुढाकाराने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि हिंदुस्थान या चार देशांनी मिळून क्वाडला चालना देण्याचे काम केले. ‘क्वाडला गतिमान करण्याबरोबरच हिंदुस्थानजपान ऍक्ट ईस्ट फोरमस्थापन झाला असून त्याच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. विस्तारात चाललेल्या क्वाडचे मुख्यालय अंदमान बेटावर स्थापन होत असल्याच्या बातम्या येत होत्या. हे मुख्यालय स्थापन झाले तर क्वाडसक्रिय झाले आहे असे म्हणता येईल.

क्वाड’ची स्थापना साल 2007 मध्ये झाली असली तरी त्याकडे सहभागी देशांनी गंभीरपणे बघितले नव्हते. विशेषतः ऑस्ट्रेलिया  ‘क्वाड’मध्ये सक्रिय होण्यास उत्सुक नव्हता, पण कोविड 19 चा काळ, ऑस्ट्रेलियाकडून चीनला होणाऱ्या निर्यातीवर चीनने घातलेली बंधने आणि याच काळात ऑस्ट्रेलियातील स्कॉट मॉरिसन यांचे आक्रमक नेतृत्व यामुळे ऑस्ट्रेलिया ‘क्वाड’मध्ये सक्रियपणे सहभागी झाला असे म्हणता येईल. तसेच चीनने ऑस्ट्रेलियामधील अनेक संस्थांमध्ये केलेला चंचुप्रवेश आणि ऑस्ट्रेलियातील राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे ऑस्ट्रेलियाला चीनबद्दल कडक धोरण घेण्यास भाग पाडले गेले. ऑस्ट्रेलियातील काही राजकारणी लोकांवर चीनने प्रभाव टाकण्यासाठी केलेले प्रयत्न काही महिन्यांपूर्वी समोर आले होते.

अमेरिकेत नुकताच सत्ताबदल झाल्यामुळे आणि तेथील विरोधी पक्ष असणाऱ्या डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन  राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यामुळे जो बायडेन हेही ट्रम्प यांच्याप्रमाणेच ‘क्वाड’च्या सक्रियतेमध्ये किती उत्साहाने भाग घेतील याची ‘क्वाड’मधील इतर देशांना शंका सतावत होती आणि आहे. त्यामुळे बायडेन आणि त्यांचा ‘क्वाड’बद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट होण्याची वाट न बघता सदस्य देशांनी ‘क्वाड’ या चार देशांच्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलल्याचे दिसून येत आहे. हिंदुस्थानने फ्रान्स या देशाला ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देऊन फ्रान्सच्या ‘क्वाड’मधील सहभागासाठी पुढाकार घेतल्याचे समोर आले. फ्रान्सनेही ‘क्वाड’मध्ये येण्यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे फ्रान्स लवकरच ‘क्वाड’मध्ये सामील झाल्याचे दिसून येईल. चीनला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात रोखण्यासाठी हिंदुस्थान, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांच्या ‘क्वाड’बाबत बायडेन प्रशासनाने नकारात्मक भूमिका स्वीकारली तर त्याचे विपरीत परिणाम समोर येऊ शकतात. हे लक्षात घेऊन हिंदुस्थानने इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी फ्रान्स व रशिया या देशांचे सहकार्य मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बायडेन प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसताना हिंदुस्थानने सुरू केलेल्या या हालचाली लक्षणीय ठरतात.

आता ब्रिटननेही ‘क्वाड’मध्ये सामील होण्यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. गेल्या महिन्यात हिंदुस्थानच्या भेटीवर आलेले ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. डिसेंबरमध्ये कोरोना काळात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री राब यांनी हिंदुस्थानचा दौरा करून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेतली होती. आपल्या या दौऱ्यामध्ये परराष्ट्रमंत्री राब यांनी युरोपियन महासंघातून बाहेर पडणारा ब्रिटन इंडो-पॅसिफिक आघाडीत सहभागी होऊ शकतो असे संकेत दिले होते. हाँगकाँगच्या मुद्दय़ावरून ब्रिटन आणि चीन यांच्यात अगोदरच तणाव निर्माण झाला आहे. चीनने हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक निदर्शकांवर केलेल्या कारवाईवर ब्रिटनच्या जॉन्सन सरकारने टीका केली आहे.

अमेरिकेच्या पुढाकाराने सक्रिय झालेल्या ‘क्वाड’मुळे रशिया अस्वस्थ झाल्याचे दिसून आले होते. रशियाचे हिंदुस्थानातील राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी ‘क्वाड’बद्दल काही शंका प्रदर्शित केल्या होत्या. ‘क्वाड’ला चीनविरोधी गटाचे स्वरूप आल्याचा रशियाने आरोप केला होता, परंतु आता रशियालाही ‘क्वाड’मध्ये सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. रशियाही ‘क्वाड’मध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ‘क्वाड’ या सुरुवातीला चार देशांनी मिळून स्थापन केलेल्या संघटनेचा विस्तार होत असल्याचे दिसून येत आहे, पण रशियाचे चीनबरोबर असणारे घनिष्ठ संबंध बघता रशियाच्या ‘क्वाड’मधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रशियाला  ‘क्वाड’मध्ये आमंत्रण देताना ‘क्वाड’ हे कुठल्या देशाविरुद्ध नसल्याचे सांगून ‘क्वाड’ हे सागरी सुरक्षा, वाहतूक, उच्च तंत्रज्ञान, संशोधन, ऊर्जा, कोळसा, कृषी व औषधनिर्मिती इत्यादी क्षेत्रांतील सहकार्यासाठी असल्याचे बोलले गेले.  भविष्यात चीनचे रशियावरील अवलंबित्व कमी होऊ शकेल असा विचार करून रशियाने ‘क्वाड’मध्ये सामील होण्याचे ठरविले असू शकते.

जपान आणि चीनमध्ये ‘सेंकाकू’ बेटांच्या मालकीवरून पूर्वीपासूनच वाद आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सेंकाकू बेटे संपूर्णपणे जपानच्या मालकीची असल्याचा निर्वाळा दिला होता. जो बायडेन  हेही या विषयामध्ये ट्रम्प यांच्याएवढे स्पष्टपणे भूमिका घेतील का? याची ‘क्वाड’मधील देशांना शंका आहे. जो बायडेन प्रशासनाची भूमिका स्पष्ट होत नसल्याने चीनही तैवानच्या हवाई हद्दीत विमाने पाठवून अमेरिकेच्या प्रतिसादाचा अंदाज घेत आहे. त्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन आपल्याविरोधात किती कठोर भूमिका स्वीकारील याचा अंदाज घेत आहे असे अमेरिकेतील अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनने हिंदुस्थानच्या ‘सिक्कीम’ या भूभागाच्या सीमेवर कुरापती काढायला सुरुवात केली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आधीच्या राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत किती आक्रमक आहेत याची चाचणी चीन घेत असावा अशी शंका घेण्यास वाव आहे. बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी चीनच्या राजवटीची दक्षिण आशियातील वाढती आक्रमकता धोकादायक ठरत आहे. त्यामुळे  ‘क्वाड’ सक्रिय आणि ताकदवान बनवून चीनवर दबाव निर्माण करण्यासाठी हिंदुस्थाननेही पुढाकार घेतला आहे.

‘क्वाड’ला गतिमान करण्याबरोबरच ‘हिंदुस्थान-जपान ऍक्ट ईस्ट फोरम’ स्थापन झाला असून त्याच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. विस्तारात चाललेल्या ‘क्वाड’चे मुख्यालय अंदमान बेटावर स्थापन होत असल्याच्या बातम्या येत होत्या. हे मुख्यालय स्थापन झाले तर ‘क्वाड’ सक्रिय झाले आहे असे म्हणता येईल. हिंदुस्थानचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण आणि जपानच्या मुक्त ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’अंतर्गत ‘एईएफ’द्वारे ईशान्य हिंदुस्थानात दोन्ही देशांमधील सहकार्याची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. ईशान्य हिंदुस्थानात जपानने जलविद्युत प्रकल्प व इतर कितीतरी पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. 2017 साली जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या हिंदुस्थान दौऱ्यात यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या व ‘ऍक्ट ईस्ट फोरम’ची स्थापना करण्यात आली होती.

इस्रायलने ईशान्य हिंदुस्थानात गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने ईशान्य हिंदुस्थानसाठी स्वतंत्र वाणिज्य राजदूतांची नेमणूक केली होती. इस्रायलच्या या भूमिकेमुळे इस्रायलही भविष्यात ‘क्वाड’मध्ये समाविष्ट होऊ शकेल. ‘क्वाड’ येणाऱ्या काळात सहभागी देशांची व्याप्ती कुठपर्यंत विस्तारात नेतो याकडे जगाचे लक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या