लोकघन ‘पाऊस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

सध्या पावसाने आपला वरदहस्त आपल्यावर मनमुराद रिता केला आहे. त्याच्या या मनसोक्त बरसण्याशी अनेक लोकपरंपरा जोडल्या गेल्या आहेत.

खानदेशात कानुबाईला कौल लावण्याची प्रथा आहे. याकरिता गहू जमिनीवर टाकून त्यावर तांब्याची कळशी ठेवली जाते. कळशीत पाणी भरून त्यामध्ये कानुबाईची मूर्ती ठेवून तिची पुजा केल्यानंतर कळशीला हात लावून कानबाय माय की जय म्हणत ‘पाणी कवह ई माय’ असा कौल लावला जातो. कानुबाईने कौल दिल्यानंतर कळशी गोल फिरते आणि त्यादिवशी पाऊस पडतो, अशी लोकांची धारणा आहे.

– पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडला नाही की अहिराणी भागात पाणी मागायची लोकपरंपरा आहे. पहिला पाऊस चांगला पडून गेला आणि नंतर पाऊसच येत नसेल तेव्हाही असे घरोघर पाणी मागून पावसाची आराधना करायची पद्धत आहे.
– पाऊस येत नाही म्हणून गावाच्या मारुतीला शेणाने लिंपण्याची पद्धतही काही ठिकाणी रूढ आहे, असा कार्यक्रम करूनही पाऊस आला नाही तर गावातले लोक वाजत गाजत मारुतीच्या पारावर येतात आणि गोवऱया थापाव्या तसे त्या शेणाने मारुतीची संपूर्ण मूर्ती लिंपतात. जर त्या दोन -तीन दिवसात पाऊस आला तर मारुतीच्या मूर्तीवरील शेण काढून त्याला स्वच्छ अंघोळ घालतात. नवा शेंदूर लावतात. नारळ फोडून पूजा करतात. मारूती शेणाने लिंपूनही जर पाऊस लवकर आलाच नाही, तर ते शेण वाळून आपोआप गळायला सुरूवात होते. शेणाचा काही अंश तसाच मारुतीला चिकटून राहतो. मग जेव्हा कधी शिवारात पाऊस येतो, तेव्हा मारुतीला स्नान घालून, शेंदूर लावून पूजा केली जाते. कारण मारूतीला शेणाने लिंपले म्हणूनच पाऊस आला अशी ग्रामीण श्रध्दा असते.
– एका माणसाला धोंडया बनवून गावभर घरोघरी पाणी मागण्यासारख्या काही लोकपरंपरा अहिराणी भागात पहायला मिळतात. असे केल्याने न येणारा पाऊस कुठूनही त्या गावाच्या शिवारात येऊन पोहचतो अशी लोकांची भाबडी श्रद्धा आजही ऐकायला मिळते.
– पाऊस लवकर पडण्यासाठी धोंडय़ा विधीही केला जातो. यामध्ये अंगावर कमीतकमी कपडे ठेवून एका तरुणाला सजवले जाते. त्याच्या डोक्यावर निमच्या झाडाच्या पानांची जुडी सहजासहजी त्याचा चेहरा कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने बांधली जाते. त्याच्या कमरेला बैलांच्या गळ्यातील घुंगटांची गेज बांधतात. पायांना घुंगरू बांधले जातात आणि डफाच्या तालावर त्याला गावातील प्रत्येक घरापुढे अनवाणी नाचवले जाते. ज्या घराच्या समोर अंगणात धोंडय़ा येतो त्या घरातील स्त्री धोंडय़ाच्या डोक्यावर लोटीभर अथवा कळशीभर पाणी ओतते आणि धोंडय़ाला दक्षिणा म्हणून पैसे किंवा धान्य देते. यावेळी डफाच्या तालावर गाणी म्हटली जातात. धोंडय़ा निघतो तेव्हा त्याचे सवंगडी डफाच्या आवाजात मोठमोठयाने आरोळ्या मारून ‘धोंडय़ा धोंडय़ा पानी दे …साळ माळ पिकू दे … धोंडय़ा धोंडय़ा पानी दे हातात खुरपी बायको तिरपी’ पानी दे वं देवनी माय हातात खुट्टी बायको बुट्टी पानी दे वं देवनी माय’ अशा प्रकारची गाणी म्हणत आणि पाण्याचा, पावसाचा जयजयकार करत संपूर्ण गावात पाणी मागून झालं की गोळा झालेले धान्य विकून आलेल्या पैशातून शेंदूर, नारळ, उदबत्त्या घेऊन मारुतीची पूजा केली जाते. धोंडय़ाला मानपान म्हणून टॉवेल टोपी घातली जाते.
– कर्नाटकात जोक्याच्या उत्सवाला खूप मान असतो. पाऊस चांगला पडून चांगलं पीक यावं यासाठी जोक्याची आराधना केली जाते. त्याची परडी डोक्यावर घेऊन गावभर मिरवणूक काढली जाते. या जोक्याला बनवण्याचा मान गावातील कुंभार घरांचा असतो, तर मिरवण्याचा मान कोळी समाजाला असतो.
– पावसाने दडी मारल्यावर खानदेशात काही गावांमध्ये मारुतीच्या मंदिरात 11 किंवा 7 नद्यांचे, विहिरीचे पाणी आणून ते मंदिर पाण्याने पूर्ण भरले जाते आणि मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.
– निसर्गचक्रात बेडूक आणि पावसाचा संबंध आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बेडकाचं लग्न लावण्याची प्रथा आहे. यासाठी नर आणि मादी बेडकाची निवड करून त्यांना सजवून त्यांचं लग्न लावून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांना सजवलं जातं. मंगलाष्टकं म्हटली जातात. पावसासाठी प्रार्थना केली जाते.
– मंगळवेढा, सातारा या गावांमध्ये गाढवाचं लग्न लावण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीने गाढवाचं लग्न लावलं जातं. हळद, साखरपुडा असे तीन दिवस हा लग्नसोहळा पार पाडला जातो.