मुद्दा : पहले मंदिर, फिर सरकार!

17
ram-mandir

>>अमोल मटकर<<

शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुन्हा घेतला आणि साऱया जगाचे लक्ष अयोध्येकडे पुन्हा केंद्रित झाले. त्यातच विश्व हिंदू परिषदेने धर्मसभेचे आयोजन करून वातावरण अजून तापवले. हिंदूंची एकजूट करण्यासाठी राममंदिर हा एकमेव विषय पुरेसा आहे. आणि का नसावा? मोगलांच्या आक्रमणात हजारो मंदिरे उद्ध्वस्त झाली ही गोष्ट तर सर्वज्ञात आहे. बाबरीबद्दलही तिथल्या सामान्य नागरिकांचे हेच मत आहे. त्रेतायुगात श्रीरामाचा जन्म झाला तर 14व्या शतकाच्या अंतिम टप्प्यात जन्म झालेल्या बाबरची ही मशीद कशी? ‘श्रीराम’ म्हणजे प्रत्येक हिंदूच्या आयुष्याचा आणि भावनेचा अविभाज्य भाग आहे. शिवसेनेच्या ‘चलो अयोध्या’बाबत तिथली सामान्य जनतेची भूमिका फार सकारात्मक होती. ‘रामजी का नाम लेके वोट मांगनेवाले सब आते है यहां, लेकिन शिवसेना यहा सरकार को चेतावनी देने आयी है’ अशी एका पंडिताची प्रतिक्रिया होती. शिवसेनेच्या येण्याने अयोध्येत एक आशादायी वातावरण निर्माण झाले हे मात्र निश्चित. अर्थात आपण तेथे जातोय हे केवळ सरकारला जाणीव करून देण्यासाठी ही निश्चित भावना शिवसैनिकांच्या मनात होती आणि त्यामुळे महाराष्ट्रात दिसणारी शिवसेनेची ‘तीच शिस्त’ थेट अयोध्येतही दिसली. वारकरी दिंडय़ा घेऊन येत होते, शिवसैनिक भगवे ध्वज घेऊन घोषणा देत शिस्तीने येत होते म्हणून स्थानिकांनीही त्यांचे मनापासून स्वागत केले. अयोध्यावासीय आणि शिवसैनिकांच्या या मैत्रीमागीलही एकमेव कारण म्हणजे ‘श्रीराम’. रामजन्मभूमीची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. रामलल्लांचे जन्मस्थान म्हणजे लष्करी छावणी झाली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. बंदुकांचा नेम धरून उभे असलेले रॅपिड ऍक्शन फोर्सचे लोक. ठिकठिकाणी थांबवून होणारी तपासणी आणि तणावपूर्ण शांतता. उद्या येथे राममंदिर उभे राहिले की स्थानिकांची तणावापासून, पोलिसांची दबावापासून आणि भाविकांची कडक तपासापासून सुटका तर होईलच, परंतु रामलल्लाही मोकळेपणाने आशीर्वाद देण्यास मोकळे होतील. भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढेल, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल आणि महत्त्वाचे म्हणजे रोजगार उपलब्ध होताना केवळ हिंदूंना नाही तर मुस्लिमांनाही तितकीच संधी मिळेल. हा प्रश्न हिंदू-मुस्लिमवादाच्याही वर आहे याची जाणीव कदाचित तेव्हाच होईल. कलाकारांच्या कलेला वाव मिळेल, स्थानिकांच्या राहणीमानाचा स्तर उंचावेल. जगभरातून पर्यटक अयोध्येलाही येऊ लागतील. अयोध्येत पुन्हा सुबत्ता येईल. हे सर्व होण्यामागे कारण जर ‘राम’ असेल तर हे ‘राम’कारण संपूर्ण हिंदुस्थानला हवे आहे. त्यामुळे शिवसेनेची ‘पहले मंदिर, फिर सरकार’ ही घोषणा आणि मागणी रास्तच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या