ठसा – रवी पटवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या भारदस्त अभिनयाने चित्रपट, मालिका आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांत अनेक भूमिका अजरामर करणारे रवी पटवर्धन गेले. अखेरच्या दिवसापर्यंत ते कार्यरत होते. रवी पटवर्धन यांच्या निधनाने नाटय़-सिनेरसिकांनी एक हरहुन्नरी कलावंत गमावला आहे. मराठी रंगभूमीचे ते निष्ठावंत रंगसेवक होते आणि रंगभूमी, भूमिकांप्रति असणारी त्यांची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वयाच्या 84 व्या वर्षी विसावला. याही वयात त्यांचा उत्साह तरुण पिढीस लाजवेल असाच होता. नटाला वय नसतं असे म्हणतात ते अगदी खरे होय. 1974 साली रत्नाकर मतकरी यांनी आरण्यक लिहिल़े त्यात रवी पटवर्धन यांनी जी धृतराष्ट्राची भूमिका कसदारपणे साकारली होती तीच त्यांनी वयाच्या 84व्या वर्षीही अप्रतिम साकारली आणि अजरामर करून टाकली.

झुपकेदार मिशा, कसदार अभिनय, आवाजातील जरब अशा कितीतरी गुणविशेषांमुळे त्यांनी गावरान सरपंच, वस्ताद पाटलांपासून ते न्यायाधीशापर्यंतच्या असंख्य भूमिका आपल्या सशक्त आणि कसदार अभिनयातून लोकप्रिय करून टाकल्या. माध्यम मग ते चित्रपटाचे असो, रंगभूमीचे असो नाही तर छोटय़ा पडद्यावरील मालिकांचे असो, स्वकर्तृत्वावर त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. आपल्या भूमिकांमधून ते घराघरांत पोहचले होते.

नायक जसा त्यांनी जीव ओतून रंगवला तसाच पोलीस आयुक्त, वकील आणि खलनायकही. आपल्यातील उपजत नाटय़गुणविशेषांचा त्यांनी अभिजात दृष्टीतून पुरेपूर उपयोग केला. 1944 साली बालगंधर्व यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाटय़महोत्सवाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. तेव्हा रवी पटवर्धन केवळ साडेसहा वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी भूमिका साकारून प्रवासाचा श्रीगणेशा केला.

पटवर्धन 84व्या वर्षीही ठणठणीत होते. प्रकृतीचे हे सुदृढत्व त्यांना त्यांच्या आईपासून मिळाले. वयाच्या नव्वदीपर्यंत त्याही ठणठणीत होत्य़ा नऊवारी नेसून बुलेटवर मागे बसून त्या बिनधास्त फिरत असत. तारुण्यात घोडेस्वारीही त्या करायच्य़ा हीच व्यायामाची आवड रवीजींनी शेवटपर्यंत जोपासली. ते म्हणत असत मेंदू सोडून माझ्या सगळय़ा अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मृत्यू अटळ असला तरी ते त्याला लांब उभे राहायला सांगत असत, पण शेवटी नियतीने त्यांच्यावर विजय मिळवला. मृत्यूशी झुंज देत होते आणि मराठी रंगभूमीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले.

अभिनय म्हटला की नटाचे उच्चार हे स्पष्ट व स्वच्छ असायला हवेत. पटवर्धन यांच्या बाबतीत सांगायचे तर ते वयाच्या 80 व्या वर्षी शृंगेरी मठाच्या श्लोक पाठांतर स्पर्धा परीक्षेस बसले व 700 श्लोक पाठ करून शंकराचार्यांच्या प्रशस्तीस पात्रही ठरले. त्यात पहिला क्रमांक पटकावून परीक्षेतील यश सिद्धही केले. रवी पटवर्धन यांनी मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी सांभाळत आपली आवड जोपासली. नोकरी काळात त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. 1964 मध्ये झालेल्या नाटय़ स्पर्धेत त्यांनी गो. म. पारखी लिखित कथा कुणाची व्यथा कुणाला सादर केले. नंतरच्या काळात त्यांनी हे नाटक बँकेच्या स्नेहसंमेलनातही सादर केले.

1971 साली अशा असाव्या सुना हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सिंहासन, उंबरठा, बिनकामाचा नवरा, हरिओम विठ्ठला अशा अनेक मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या. तसेच हिंदीमध्ये अंकुश, प्रतिघात, तेजाब, तक्षक, नरसिंह अशा काही चित्रपटांची नावे सांगता येतील. तेजाब चित्रपटातील त्यांनी साकारलेली वकिलाची भूमिका अत्यंत लक्षवेधी ठरली.

पटवर्धन हे मराठी रंगभूमीचे निष्ठावंत रंगसेवक़ तिथेही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. अपराध मीच केला, आनंद (बाबू मोशाय), आरण्यक (धृतराष्ट्र), एकच प्याला (सुधाकर), कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान), कोंडी (मेयर), जबरदस्त (पोलीस आयुक्त), प्रेमकहाणाr (मुकुंदा), बॅकेट (बॅकेट), भाऊबंदकी, मला काही सांगायचंय (बाप्पाजी), मुद्राराक्षस (अमात्य राक्षस), विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर) यासारख्या विविध नाटकांतून त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. मुंबई दूरदर्शवर आमची माती आमची माणसं हा शेतकऱयांसाठीचा कार्यक्रम, तेरे मेरे पन्ने, महाश्वेता या मालिकांत त्यांनी काम केल़े अग्गंबाई सासुबाई या मालिकेत (बंडेराव कुलकर्णी) आसावरीचा कजाग सासरा नि बबडय़ाचे आजोबा त्यांनी साकारले. या मालिकेत अभिजित राजे आणि बंडेराव यांच्यात खुसखुशीत संवाद व फटकेबाजी कमालीची रंगत अस़े तीच त्यांची शेवटची मालिका ठरली. आजपर्यंतच्या प्रवासात रवी पटवर्धन यांनी दोनशे मराठी-हिंदी चित्रपट, सवाशेहून अधिक नाटके, काही मराठी हिंदी मालिका यात वैविध्यपूर्ण भूमिका साकार करून आपल्या अभिनयाचा प्रवास बहुआयामी नि बहुविध केला. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कला संचालनालयाने आणि झीनेही त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला होता. सात्त्विक आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व लाभलेला हा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

प्रशांत गौतम