आगळं वेगळं – एका पुलाची खरी गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

स्वीडनची राजधानी कोपनहेगन आणि डेन्मार्कमधील माल्मो व लुंड या शहरांना जोडला जाणारा हा पूल सुमारे दहा मिनिटांत हा प्रवास सुखकर करतो. या ई-20 रस्त्याखालून रेल्वे जाते. त्या खालून जहाजांनाही जाता यावं म्हणून 57 मीटर्स उंच जागा सोडली आहे. रोज साधारण 20 हजार प्रवासी या पुलाचा वापर करतात. हा प्रवास बाजूच्या शहरांचे फार सुंदर नजारे दाखवितो. रिझंड पूल आकारमान आणि डिझाईन यांचा उत्तम अभियांत्रिकी नमुना आहे.

स्वीडन आणि डेन्मार्क यांना जोडणारा रिझंड पूल जगातला खूप फेमस पूल आहे. जरी तो जगातला सर्वात मोठा पूल नाहीये, तरी तो खूप प्रसिद्ध झाला ‘द ब्रीज’ या नावाच्या जगभर नावाजलेल्या एका डॅनिश – स्वीडीश टीव्ही सिरियलमुळे.

एकदा या पुलावर एक मृतदेह सापडतो. तोही अशा ठिकाणी जिथे दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना मिळतात. मग तो पूल एक गुह्याचा देखावा बनतो. दोन्ही देशांच्या पोलिसांच्या हेही लक्षात येतं की, खुन्याला पकडण्यासाठी त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे.  मग सागा नोरेन ही स्वीडीश गुप्तहेर आणि मार्टिन रोडे हा डेनिश गुप्तहेर दोघे गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दोन्ही देशांतील वाहतूक दळणवळण किती सोपं झालं आहे हे  लक्षात येतं. जरी दोन्ही देशांची संस्कृती वेगळी असली तरी, तो पूल हे त्या देशांच्या जवळीकतेचं चिन्ह आहे हेही लक्षात येतं. लवकरच असं समजतं की, हा एक खून नसून दोन आहेत. कारण  त्या मृतदेहाचा वरचा भाग हा स्वीडीश राजकारण्याचा व खालचा भाग एका वेश्येचा आहे. मग कहाणीची मोठी गुंतागुंत सुरू होते. या सिरियलचे आतापर्यंत 38 भाग प्रदर्शित झाले आहेत.

2011 मध्ये ही सिरीज प्रथम प्रदर्शित झाली आणि नंतर ती सुमारे 100 देशांत दाखविली गेली. अगदी थोडक्या वेळेत ही फार लोकप्रियही झाली. या ‘स्टार’ शोमुळे तितकाच प्रसिद्ध झाला हा पूल! स्वीडन आणि डेन्मार्कमधील हा 16 कि.मी. रस्ता-पूल रिझंड सामुद्रधुनी ओलांडून जातो. पूल तिथल्या उग्र हवेसाठीदेखील प्रसिद्ध आहे.  हा संपूर्ण रस्ता पूल व भुयार याने बनला आहे आणि तो फक्त पाच वर्षांत बांधला गेला. याचा खर्च आला 430 कोटी डॉलर्स आणि सुरू झाला जून 2000 मध्ये. स्वीडनची राजधानी कोपनहेगन आणि डेन्मार्कमधील माल्मो व लुंड या शहरांना जोडला जाणारा हा पूल सुमारे दहा मिनिटांत हा प्रवास सुखकर करतो. या ई-20 रस्त्याखालून रेल्वे जाते. त्या खालून जहाजांनाही जाता यावं म्हणून 57 मीटर्स उंच जागा सोडली आहे. रोज साधारण 20 हजार प्रवासी या पुलाचा वापर करतात. हा प्रवास बाजूच्या शहरांचे फार सुंदर नजारे दाखवितो. रिझंड पूल आकारमान आणि डिझाईन यांचा उत्तम अभियांत्रिकी नमुना आहे.

1991 मध्ये डॅनिश आणि स्वीडीश सरकारांनी रिझंडवरून दोन्ही देशांदरम्यान एक कायमचा दुवा तयार करायचा ठरवला खरा, परंतु त्यात अडचण अशी आली की, डॅनिश बाजूने जर पूल जहाजांना जाण्यासाठी उंच बांधला तर जवळच्या कस्तृप विमानतळावर उतरणाऱया विमानांना अडथळा होऊ लागला. खाली बांधला तर जहाजांची जाण्या-येण्याची अडचण! मग असं ठरलं की, त्याऐवजी पुलाचा तो भाग एका भुयाराने बनवायचा आणि तो एका कृत्रिम बेटाला जोडू, जिथून तो रस्ता पुलाला मिळेल, असं करायचं. हे भुयार आणि बेट प्रत्येकी सुमारे 4 कि.मी. असेल. हे बेट ओळखलं जातं ‘पेबेरहोम’ या नावानं. या बेटाचं वैशिष्टय़ हे आहे की, पूल बनविण्यासाठी समुद्र खणून जो गाळ त्या वेळी समुद्रतळातून काढला गेला तो वापरला आहे. याच्या सर्व बाजूने स्वीडीश खाणीतून काढलेले खडक वापरले गेले. आता तिथे माणसं राहात नसलेला आरक्षित निसर्ग आहे. या बेटामुळे डेन्मार्कच्या जमिनीत 13 लाख चौरस फुटांची वाढ झाली.

दोन देशांना कायमचं जोडणारा एक दुवा असावा हे स्वप्न त्या देशांनी खूप पूर्वीच पाहिलं होतं. 1888 मध्ये तर दोन्ही देशांच्या सगळ्यात जवळच्या दोन बिंदूंमध्ये डेन्मार्कमधील एल्सिनोर आणि स्वीडनमधील हेलसिंगबोर्ग रेल्वे असावी असा विचार होता,  परंतु ते तसं घडलं नाही. मग दुसऱया विश्वयुद्धानंतर त्यावर परत विचार सुरू झाला. 1995 मध्ये जेव्हा याबद्दलची तयारी सुरू झाली, तेव्हा समुद्राच्या तळाशी वापरलेले ब्रिटिश बॉम्ब मिळाले तेव्हा आधी ते काढावे लागले. त्यानंतर पुलाचा हा नवीन आराखडा ठरवला गेला.

आता इतक्या वर्षांनंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी या मार्गावरील  प्रवाशांची तपासणी करण्याचे ठरवले आहे. यामुळे हा प्रवास तेवढा सुखाचा राहणार नाही असा अनेकांचा कयास आहे. कारण इथला प्रवास आता 30 मिनिटांनी लांबणार आहे. आपण काळात काही वर्षे मागे जातोय असं इथल्या लोकांना वाटतंय. कारण पुलामुळे झालेल्या वेळ वाचण्याच्या सोयीवर यामुळे घाला पडतोय.

[email protected]