सफर बॉलीवूड थीम पार्कची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायानगरी मुंबईत बहुतांश चित्रपट– मालिकांचे शूटिंग होते. अनेक कलाकारांचे करिअर घडवण्यात मुंबईचा मोलाचा वाटा आहे. मुंबईकरांसह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेचे आकर्षण असते. चित्रपटांचे शूटिंग कशाप्रकारे होते, भव्यदिव्य सेट कसे उभारतात, व्हीएफएक्स म्हणजे काय, गाण्यांचे रेकॉर्डिंग कसे होते हे जाणून घेण्याची इच्छा असते. पडद्यामागचे हेच जग आता प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत साकारलेल्या बॉलीवूड थीम पार्कद्वारे पर्यटकांना मिळतेय.  

गोलमाल, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम, ब्लू अशा बॉलीवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांचे प्रॉडक्शन डिजायनर आणि डी फाईन आर्टचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र राहुरीकर यांच्या संकल्पनेतून गोरेगावच्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील दोन ते अडीच एकर जागेवर हे अलिशान बॉलीवूड थीम पार्क साकारण्यात आले आहे. पर्यटकांना चित्रनगरीची सफर घडवण्यासोबत फिल्म मेकिंगची माहिती देणे हा यामागचा हेतू आहे. येथे भेट देण्यासाठी पर्यटक ‘बुक माय शो’ किंवा ‘बॉलीवूड पार्क डॉन इन’ या वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकतात.

सुरुवातीला प्रेक्षकांना चित्रनगरीतील अप्पू पप्पू मैदान, खंडाला घाट, जोश मैदान, कोर्ट, हेलिपॅड अशा आऊटडोअर लोकेशनची सफर घडवली जाते. त्यानंतर बॉलीवूड थीम पार्क दाखवले जाते. बॉलीवूड थीम पार्कमध्ये प्रवेश करताच अजंठा-एलोरा, दाक्षिणात्य शैलीचे मंदिर, राजस्थानी राजवाडे, गोवा आणि युरोपियन स्ट्रीट अशा भव्यदिव्य सेटचे दर्शन घडते. या सेटला भेट देऊन पर्यटकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव घेता येतो. इथल्या ‘सेल्फी पॉइंट’मध्ये गोलमाल बाईक, थ्री इडियट चेअर असे प्रॉप्स ठेवले आहे. याशिवाय बॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटातील कॉश्च्युम परिधान करण्याची संधीदेखील पर्यटकांना मिळते.

सेव्हन डी थिएटर, डान्स शो अन् बरंच काही

सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा विचार करून येथील ऑडिटोरियममध्ये लाईव्ह डान्स आणि कॉमेडी शोची रचना करण्यात आली आहे. इथल्या सेव्हन डी थिएटरमध्ये रोलर कोस्टर आणि हॉरर सिनेमे दाखवले जातात. 360 डिग्री थिएटरमध्ये समुद्री जीवनाचे व्हर्च्युअल दर्शन घडते. पर्यटकांना फिल्म मेकिंगची माहिती मिळावी यासाठी गाण्याचे रेकार्ंडग कसे होते, क्रोमावर कशाप्रकारे शूट केले जाते हे प्रात्यक्षिकासह दाखवले जाते.     

सर्वांचे लक्ष वेधून घेते ते इथले आर्मी थीम रेस्टॉरंट. लष्करात कोणती सन्मानाची पदके दिली जातात, याशिवाय देशभक्तीवर आधारित बॉलीवूडचे कोणते चित्रपट गाजले याची माहिती येथील दालनात दिली जाते. 

 बॉलीवूड थीम पार्कला सर्व वयोगटातील पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. महिन्याकाठी येथे 7 ते 12 हजार पर्यटक भेट देतात. भविष्यात बॉलीवूड थीम पार्कचा विस्तार करण्याची आमची योजना आहे. दिवाळीत येथे वॅक्स म्युझियम सुरू होतेय. तेथे विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींचे पुतळे पाहायला मिळतील. याशिवाय चित्रपटसृष्टीचा शंभर वर्षांचा इतिहास थ्रीडी ऍनिमेशनद्वारे उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

– नरेंद्र राहुरीकर,बॉलीवूड थीम पार्क