लेख – मुद्दा – समोआ पोर्ट प्रोजेक्टः  चीनला धक्का

>>हविशेष बेडेकर

समोआ देशाच्या नवनियुक्त व पहिल्या महिला पंतप्रधान फियामे नाओमी मताफा यांनी चीनचा 100 दशलक्ष डॉलरचा बंदर बांधणी प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले. चीनला इथून पुढे समोआच्या धरतीवर कुठलीही जागा न देण्याचा निर्धार करत त्यांनी ही घोषणा केली.

जगातील प्रत्येक महासागरात आपला किमान एक मिलिटरी बेस असावा असे चीनला वाटते. String of Pearls plan अंतर्गत हिंदुस्थानी महासागराचा बहुतांश भाग हा चीनच्या नियंत्रणाखाली आहे. यात Pearl म्हणजे संभाव्य चिनी बेस किंवा बंदर आणि String म्हणजे संभाव्य चिनी आरमारातील अधिकारी व जहाजांचा तांडा जो या बंदरांना एकमेकांशी जोडतो. हिंदुस्थानी महासागराचा बराचसा भाग काबीज केल्यानंतर आता चीन हळूहळू आफ्रिका आणि अटलांटिक महासागर मिळविण्यासाठी अधिक आक्रमक झाला आहे. प्रशांत महासागरावर अमेरिकेचे वर्चस्व असताना समोआ या छोटय़ाशा देशापासून बंदरे बांधणीची सुरुवात करून चीन आपले अस्तित्व भक्कम करणार होता.

प्रशांत महासागराच्या अगदी मधोमध असलेल्या समोआ या देशाची लोकसंख्या अवघी दोन लाख आहे. अपिया या देशाची राजधानी असून ताला या देशाचे चलन आहे. 2017मध्ये येथील संसदेने हा देश ख्रिस्ती बहुसंख्य असल्याचे घोषित केले. ड्वेन द रॉक जॉन्सन हा एक विश्वविख्यात कुस्तीपटू समोआचा आहे. अमेरिकन समोआ नावाचा स्वतंत्र देश प्रशांत महासागरात अस्तित्वात असून ही लोकं अमेरिकेत बऱयाच प्रमाणात बघायला मिळतात. परंतु अडचण हीच आहे की हा देश अमेरिकेचा भाग म्हणून घोषित नाही.

समोआवर चीनचे 160 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज आहे. सध्याच्या एकूण देयक रकमेच्या जवळपास 40 टक्के रक्कम ही एकटय़ा चीनला देणे आहे. जो डाव चीनने हंबनटोटा बंदर मिळविण्याकरिता श्रीलंकेबरोबर खेळला तोच डाव चीन समोआवर खेळू पाहत होता. आधी भरपूर कर्ज माफक दरात देणे, नंतर जगभरात मैत्रीची संवेदन विधाने देणे आणि एकदा देश कर्जामध्ये बुडाला की परतफेडी दरम्यान जागा हस्तगत करणे हा चीनचा पवित्रा नवनियुक्त पंतप्रधानांनी जाणला व येथील वायुसू बंदर बांधणी करार रद्द केला.

चिनी माध्यमांनी नेहमीप्रमाणे आम्ही फक्त समोआचे हित जाणतो असे म्हणत यात कुठलेही राजकारण नसल्याचे सांगितले. परंतु हे वायुसू बंदर बांधणी रद्द होताच चीनने अमेरिकेला जबाबदार ठरवले. अमेरिकेने अतिशय बारीक निरीक्षण करून आपली कुशाग्र नीती पुन्हा सिद्ध केली. वेळोवेळी सूचना देत चीनचे बळकावू मनसुबे समोआला कळवून सतर्क केले व त्यामुळेच आज चीनला चांगलाच धक्का बसला आहे.

हिंदुस्थान आपल्या शेजारच्या देशांना असे महत्त्वाचे व निर्णायक इशारे देण्यात कुठेतरी मागे पडतो. हिंदुस्थान यातून धडा घेत श्रीलंका, भुतान, बांगलादेश या देशांना चीनच्या कर्ज जाळ्य़ातून वाचवू शकतो. हंबंटोटा पोर्ट श्रीलंकेने चीनमुळे गमावले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या