‘रिप्लेसमेंट’ची अशीही अदा

>> संजय कुळकर्णी

संपदा कुळकर्णी ही व्यावसायिक रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री. तिचे प्रत्येक नाटक लोकप्रिय झाले. लेखन आणि दिग्दर्शन करता करता ती प्रायोगिक नाटकातसुद्धा दिसली. तिचं अलीकडंच  ‘जन्मवारी’ हे प्रायोगिक नाटक आलं. त्यात तिनं रंगवलेली वेश्येची भूमिका तिच्या आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांना छेद देणारी होती. त्या नाटकाचे प्रयोग करीत असताना अचानक तिच्या त्या नाटकाची जाहिरात आली की, आता संपदा कुळकर्णी ‘जन्मवारी’ नाटकात भूमिका करणार नाही.  ते वाचून नवल वाटलं.

याबद्दल संपदाशी  संपर्क साधला असता ती म्हणाली, ‘जन्मवारी’ हे नाटक आधी प्रायोगिक म्हणून रंगमंचावर येणार होते. 5 ते 10 प्रयोग करायचे  होते, पण नाटकाचे स्वरूप मोठे होत गेले आणि अजून एक निर्माते येऊन सामील झाले. मी मर्यादित प्रयोग संख्येवर तयार झाले होते. कारण कोकणात माझे कृषी पर्यटन हे मोठे प्रोजेक्ट सुरू आहे. माझ्यामुळे महिन्याला 4 प्रयोगच शक्य होते. नाटकास उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रत्यक्ष प्रयोग करणे मला शक्य होणार नव्हते. सतत प्रवास आणि माझ्या प्रोजेक्टला वेळ हा कमी दिला जात होता. त्यामुळे एका सक्षम अभिनेत्रींच्या हाती नाटक दिले. सक्षम अभिनेत्री कोण हे तिला विचारल्यावर ती म्हणाली, हेमांगी कवी आता माझी भूमिका साकारतेय. 21 मे रोजी ‘जन्मवारी’चा 25 वा प्रयोग ‘गडकरी रंगायतन’ला सादर केला. शेवटी कर्टन कॉलला तिला रंगमंचावर बोलावून माझी ओढणी, बटवा या नाटकातील प्रॉपर्टी तिच्या हातात सुपूर्द केल्या. तिनेही माझ्या पद्धतीने 2 ते 3 वाक्यांचे संवाद बोलून रसिकांची दाद मिळवली. अशा प्रकारची ही अनोखी रिप्लेसमेंट ठरली.

शांत आणि समाधानाने जगण्यासाठी

बोलता बोलता संपदाने कृषी पर्यटन प्रोजेक्टचा उल्लेख केला होता. त्याविषयी तिला विचारले असता ती म्हणाली, कृषी पर्यटन म्हणजे आम्ही भात, नाचणी, हळद यांची शेती करतो. आंबा, काजू यांची बागायती शेतीसुद्धा करतो. आमच्या व पर्यटकापुरतेच. त्या कृतीचा अनुभव घ्यायला देश-विदेशाहून पर्यटक येतात. आमच्याच शेणाने सारवलेल्या घरात स्वतंत्र खोलीत राहतात. चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेतात. आम्ही शेती संपूर्णपणे रसायन विरहित करतो. अधिक उत्पादन आणि कमाई हा हेतू आमच्या शेतीमध्ये नाही. आर्थिक बाजू पर्यटकांच्या व्यवस्थेतून उभी करतो. अन्नभान देणे, योग्य अन्न खाणे, जागेवरच चुकीचं अन्न उगवण्याचे आणि खाण्याचे धोके व संकट समजावून सांगणे हे आम्ही पर्यटकांच्या वास्तव्यात करतो. आम्ही गावाकडे शांत आणि समाधानाने जगण्यासाठी आलो आहोत. हा आमचा निर्णय अधिक कमावण्यासाठी नाही, तर अधिक गुणवत्ता युक्त जगण्यासाठी.