सॅनिटायझेशन घरच्या घरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंजुश्री ओक (सॅनिटाइझतज्ञ)

सॅनिटायझेशन ही एक वेगळी अडचण आहे. त्यासाठी लोक एक्सपर्टना बोलावतात. हे सॅनिटायझेशन वेगळे आहे, चांगले आहे आणि तितकेच खर्चिक आहे. त्यामुळे हे सॅनिटायझेशन सामान्य माणसाला परवडणारे नाही. एखादे घर, लहान गाडी सॅनिटाईझ करायला हजार-बाराशे रुपये घेतले जातायत. त्याच्या आकारावरून त्याची किंमत ठरवली जाते. एवढेच नाही तर घरात मेकॅनिकचे काहीना काही काम निघतेच. तर ऑनलाइन मागवलेल्या वस्तू किंवा भाजी देण्यासाठी येणारी माणसं आत येतात. त्यांचा त्या वस्तूंना हात लागलेला असतो अशावेळी संपूर्ण घर सॅनिटाईझ करायचे, गाडी सॅनिटाईझ करायची हे प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. ते फार खर्चिक होते. त्यामुळे अशा वेळी घरच्या घरी आपल्याला निर्जंतुकीकरण कसे करता येईल हे आपण पाहूया.

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, पण कोरोनाचा विषाणू कोणत्या मार्गाने आपल्या घरात येईल हे काही सांगता येत नाही. बाहेरून घरात येणारे लोक, कुटुंबातील नोकरीवर जाणारे सदस्य, ऑनलाइन मागवण्यात आलेली पार्सल्स यामार्फत कोरोनाचा विषाणू आपल्या घरात पोहोचू शकतो. त्यामुळे घरच्या घरी निर्जंतुकीकरण करणे आपल्यासाठी केव्हाही उपयुक्त आहे.

घरातील खोल्या स्वच्छ ठेवण्यासाठी बाहेरून आलेल्या व्यक्तीचा पहिला संपर्क हॉलमध्ये येतो. त्यामुळे हॉल कायम मोकळा-स्वच्छ असायला हवा. त्याचबरोबर घराची दारे, डोअर नॉब, रिमोट, खिडक्या, खुर्ची-टेबल, डायनिंग टेबल डेटॉल, सॅव्हलॉनने स्वच्छ करावेत. लादी रोजच्या रोज फिनेलने पुसून घ्यायला हवी. ते नसल्यास मीठ आणि डिटर्जंट पावडर मिक्स करून त्याने लादी पुसून घ्यावी.

स्वयंपाकघराची स्वच्छता…

तुमचं स्वयंपाकघरदेखील स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. बाजारातून भाजीपाला आणल्यानंतर ज्या-ज्या वस्तूंना तुम्ही स्पर्श केला आहे, त्या-त्या वस्तू स्वच्छ करण्यास विसरू नका किंवा टाळू नका. बाहेरून अन्न पदार्थ, भाज्या आणल्या की, त्या थेट किचनमध्ये आणल्या जातात, पण त्या पिशव्या थेट किचनमध्ये न आणता काही वेळ बाहेर ठेवा. आपला किचनचा ओटा नियमित डिश वॉशिंग लिक्विडने स्वच्छ करावा. ओव्हन, फ्रिजचा हॅण्डल नियमित डेटॉल, सॅव्हलॉनचे पाण्यात थेंब घालून ते स्प्रे बाटलीत भरावे आणि त्याचा वापर करावा. दुधाची पिशवी बाहेरून आणल्यावर साबणाने स्वच्छ करून मग हात धुवावेत. घरी व्हाईट व्हिनेगर असल्यास ते आणि बेकिंग सोडा एका बादलीत घेऊन फळभाज्या त्या पाण्यात धुऊन घ्या. पंधरा ते वीस मिनिटे तशाच ठेवाव्यात. दुसरा उपाय म्हणजे एका मोठय़ा भांडय़ामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये काही वेळासाठी हिरव्या पालेभाज्या भिजत ठेवा. त्यानंतर हलक्या हातानं रगडून पालेभाज्या स्वच्छ करून घ्या. एका चाळणीमध्ये भाज्या ठेवून थंड पाण्यानं पुन्हा धुऊन घ्या. सिंक, भांडी घासण्याचे स्क्रबर, भाजी चिरण्याचे बोर्ड हे व्हिनेगरच्या मदतीनं स्वच्छ करा.

पिशव्या घरी आणल्यावर स्वच्छ धुवा…

किराणा सामान आणण्यासाठी नेहमी स्वच्छ धुतलेल्या नव्या पिशवीचाच वापर करावा. तसंच खरेदी करून झाल्यानंतर वापरलेली पिशवी घरामध्ये ठेवण्याची चूक करू नका. महत्त्वाचे म्हणजे वाण सामानाची नेहमीची पिशवी वापरणं टाळा. ती घरी आणल्यावर गरम पाण्यात स्वच्छ धुतल्यावरच वापरा. भाजीपाला, फळे घरी आणल्यानंतर त्यांना वापरलेली पिशवी थेट कचऱयाच्या डब्यात फेकून द्या. बाहेरून आणलेल्या पिशवीवर कोरोना व्हायरस असण्याची भीती आहे. किराणा सामान घरी आणल्यावर त्यातील प्रत्येग गोष्ट स्वच्छ करणे शक्य नसते. अशा वेळी त्या वस्तूंना पास-सहा दिवस हात न लावता नंतर वापरण्यास हरकत नाही.