
>> वैश्विक
दुर्बिणीतून ‘शनी’ बघायला आमच्या खगोल मंडळाच्या कार्यक्रमात लोक खूपच उत्सुक असतात. पुस्तकातल्या चित्रात दिसतो तसाच हा कडी (वलयं) असलेला ग्रह दिसतो का ते जाणून घ्यायची त्यांची इच्छा पूर्ण होते. शनीची केवळ कडीच नव्हे, तर ‘ए’ आणि ‘बी’ या दोन रिंगांमधली ‘गॅप’सुद्धा दुर्बिणीतून दिसते.
चंद्रावर खड्डे आहेत, गुरूला चार चंद्र आहेत आणि शनीला कान (Lump) आहेत असं गॅलिलिओ गॅलिली याने जगातल्या पहिल्यावहिल्या दुर्बिणीद्वारे केलेल्या आकाशदर्शनात नोंदवून ठेवले. 1610 मध्ये त्याला हे शनीचे ‘कान’ दिसले. 1612 मध्ये ते गायब झाले असं त्याला वाटलं, पण पुन्हा 1613 मध्ये ते उगवले. या ग्रहाची ही काय भानगड आहे हे त्याला समजलं नाही, परंतु पुढे 1655 मध्ये डच खगोलविद ह्युजेन्स याने मात्र शनी ग्रहाभोवती एक चकतीसारखं कडं असल्याची नोंद केली. मात्र ही एकच सपाट चपटी चकती नसून त्या वेगवेगळ्या कडय़ा आहेत हे कॅसिनी या अभ्यासकाने 1675 मध्ये सांगितलं. कॅसिनीचं शनीच्या कडय़ांबाबतचं निरीक्षण इतकं अचूक होतं की, नंतर या कडय़ांच्या अभ्यासासाठी थेट शनीच्या भेटीला गेलेल्या यानाचं नावही कॅसिनी ठेवण्यात आलं.
शनीच्या कड्यांमध्ये मुख्यत्वे ए, बी, सी ही कडी आहेत. त्यांची रुंदी खूप आहे. ‘ए’ कड्याची रुंदी 4500 किलोमीटर आहे. यावरून या कड्यांचा अंदाज करा. कालांतराने ‘ए’च्या आधीही केवळ 50 कि.मी. रुंदीची एक बारीक रिंगही आधुनिक निरीक्षणात आढळली, पण शनीची कडी म्हटलं की ए, बी, सी अशी रुंद कडी आणि त्यामध्ये असलेली जागा (गॅप) यांचाच विचार येतो.
गुरू ग्रहाभोवतीही कडं असलं तरी ते शनीच्या कडय़ांसारखं प्रेक्षणीय नाही. गुरूचे चंद्र (आता एकूण 77) खूपच चर्चेत असतात. त्यातले चार तर दुर्बिणीतून सहज दिसतात. अर्थातच गुरूचे चंद्र गुरूच्या समोर आले तर किंवा मागे गेले तर दिसत नाहीत. तसंच शनीची सूर्याभोवती फिरतानाची स्थिती पृथ्वीसापेक्ष कशी आहे यावर कडी किती मनोहारी दिसतील ते अवलंबून आहे. गॅलिलिओने शनीकडे दुर्बिणीतून पाहिलं तेव्हा शनीची ही वलयं त्याच्या पृष्ठभागावरून जात असल्याने सूर्यतेजात लुप्त असावीत. म्हणून त्याला फक्त दोन्ही कडेचे कान दिसले. आता ही कडी कधी नि कशी दिसतील त्याचं वेळापत्रक समजू शकतं.
प्रश्न असा आहे की, शनीची कडी गुरूसारखी ‘दगडी’ नसून अब्जावधी सूक्ष्म हिमकणांची असल्याने ती नष्ट होतील का? गेल्या डिसेंबरपासूनच त्याची चर्चा सुरू आहे. कुणाला असं वाटत असेल की, ही बर्फाळ कडी सूर्यप्रकाशामुळे वितळतील, तर तसं अजिबात नाही. शनीवर पृथ्वीसारखा सूर्यप्रकाश पडत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशातही शनीच्या बर्फाळ कडय़ांचं तापमान -180 अंश सेल्सियस इतकं असतं. शनीच्या छायेत असताना तर ते -200 अंश सेल्सियस इतकं उतरतं. शनी ग्रह सूर्याचा 46 टक्के प्रकाश परावर्तित करतो, तर ही चकचकीत हिमकडी 80 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतात.
मग शनीची ती अब्जावधी वर्षांची कडी नष्ट कशी होतील? वैज्ञानिक निरीक्षणात असं आढळून आलंय की, या कडय़ांमधील हिमकणांचा पाऊस सतत वायुरूप शनी ग्रहावर कोसळत असतो. सेकंदाला टनभर पाऊस पाडणारी हिमकडी कधी ना कधी नष्ट होणारच असं नासाच्या काही शास्त्रज्ञांचं म्हणणं. त्यांचं असंही सांगण आहे की, मुळात 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला निर्माण झाली त्यावेळी शनीला कडी नव्हतीच. मात्र ती गेल्या कोटय़वधी वर्षांत निर्माण झाली.
हायड्रोजनचं H3 हे संयुग शनीच्या पृष्ठभागावरील वातावरणात मोठय़ा प्रमाणावर शनीच्या पृष्ठभागी तयार होतं. आतल्या बाजूच्या ‘सी’ कडय़ांमधून भारित अणू निसटत असतात. भारित अणू आणि शनीच्या वातावरणातील अणूंची टक्कर होऊन बर्फातून तयार झालेल्या पाण्याचा पाऊस कड्यांमधून शनी ग्रहावर पडतो.
या पावसाचं प्रमाण वाढतच गेलं आणि शनीच्या कडय़ांची शक्ती क्षीण होत गेली, म्हणजे त्यातील बर्फ वेगाने संपुष्टात येऊ लागला तर हळूहळू ही नयनरम्य वलयं विलय पावतील. तसं झालं तर शनी ग्रहाची कवचकुंडलंच गेल्यासारखं होईल. त्याच्या विलोभनीय रूपाला बाधा येईल.
पण फार चिंता करू नका. हे सारं इतक्यात म्हणजे आपल्या आयुष्यक्रमात तर नव्हेच, पण पुढच्या हजारो पिढय़ांच्या काळातही घडणार नाही. कारण शनी कड्यांविना दिसायला किमान सुमारे 30 कोटी वर्षे लागतील. इतकी वर्षे शनिपृष्ठावर पाऊस पडण्याइतका हिमसंचय या कड्यांमध्ये आहे. त्यामुळे ही फार पुढची गोष्ट झाली.
आपण माणसं शनी ग्रहाची कडी अवघी 410 वर्षे न्याहाळतोय. त्यापूर्वी कुठे होत्या दुर्बिणी आणि गुरू, शनीचं वलयांकित दर्शन? तेव्हा आता शक्य असल्याने दुर्बिणीतून शनीची कडी जरूर पहा. आकाशदर्शनाचा मोसम आता संपत आलाय. आकाशात तुरळक का होईना, ढग येऊ लागलेत. पाऊसपाण्यासाठी ते हवेच आहे, पण मेघाच्छादित आकाश जून ते सप्टेंबर ग्रह-तारे झाकून टाकेल. तेव्हा सध्या पहाटे धनु राशीत दिसणारा शनी त्याच्या कड्यांसह जरूर न्याहाळा.






























































