मुद्दा : शालेय विद्यार्थ्यांना सोपा मार्ग दाखवायला हवा!

1165
teacher-school

>> विजया चौधरी

मध्यंतरी सगळीकडे संख्याओरड झाली. पण कुणी अंतर्मुख होऊन यावर विचार केला  नाही. संख्यावाचनातले विद्यार्थी आहेत इयत्ता पहिली, दुसरीचे. वयोगट आहे साडेपाच वर्षे ते साडेसात वर्षे. पहिलीत पहिल्या सहामाहीत 1 ते 10 अंक वाचन व लेखन आहे. दुसऱ्या सहामाहीत 11 ते 100 या संख्यांचे वाचन व लेखन आहे. शतकाची ओळख आहे.

सध्याची मुले इ. पहिलीत येण्याअगोदर बालवाडीत असतात. तिथे आणि घरी मुलांना संख्या व मुळाक्षरे घेतलेली असतात. बाराखडी व संबंधित शब्दही मुलांना येत असतात.

पूर्वी बालवाडी नव्हती, थेट पहिलीत प्रवेश होता. तेव्हाही मुलांना घरी 1 ते 100 अंक व बाराखडी घोकून घोकून पाठ करून घेतलेली असे. हा तोंडी अभ्यास इतका जोरदार करून घेतला जातो की मूल न चुकता धडाधडा 100 अंक जोडाक्षरांसहित म्हणते, पण त्यांना मधून 65, 83, 79 विचारले की ओळखता येत नाही, दाखवता येत नाहीत. लिहिणे दूरच, पूर्वी घोकंपट्टीवर भर होता, त्यामुळे पाढेही चांगले पाठ असत, पण पाढा बनविणे, पाढा समजून पाठ करणे हे आजही 95 टक्के विद्यार्थ्यांना जमत नाही. एकोणीसशे, बहात्तराशे, साती दोन हे पोपटाप्रमाणे तोंडपाठ असते, पण ते कसे बनलेत याचे आकलन मुलांना झालेले नसते. आज जी मंडळी संस्थेच्या नावाने ओरड करतात ती सगळी मोठी आहेत, जाणती आहेत. त्यांनी थोडं मागे जाऊन पहिली, दुसरीच्या मुलांच्या भूमिकेत जाऊन पहावे. एवढेच कशाला ज्या घरी पहिली, दुसरीत मुले शिकत आहेत त्यांच्यावर प्रयोग करून पहावा म्हणजे त्यांना समजून चुकेल मुलांना किती कठीण जाते.

पूर्वी गणिती क्रियांवर इतका भर नव्हता. पण सध्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्रिया कशी करावी यावर भर आहे. इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत शतकापर्यंत संख्या आहेत. त्यात मुलांना एकक, दशक, शतक या संकल्पना स्पष्ट करताना प्रात्यक्षिकाद्वारे समजून द्याव्या लागतात. 1 ते 9 एकक, 10 एककाला 1 दशक मग 32 ची फोड करताना 30 नी 2, 30 एकक म्हणजे 3 दशक, पुढे दशक पूर्ण होत नाही म्हणून 2 एकक म्हणजे 30 नी 2 अशी फोड मुलांना कळणे आवश्यक आहे. 30 अधिक 2 बत्तीस हा नवीन जोडाक्षराचा शब्द आला तो त्या वयात मुलांना कठीण जातो. पुढे हे शब्द पक्के होतात पण तोपर्यंत 30 नी 2 बत्तीस म्हणायला सोपे जाते. लिहिणे जमत नाही. प्रात्यक्षिकाद्वारे हे पक्के करून घेतले की सोपे जाते. यात आपण इंग्रजीचे अंधानुकरण करीत नाहीत. आपण इथे दोन अंकी संख्या म्हणजे 10 ते 99 त्यांची निर्मिती समजावून सांगताना आपण मराठीच वापरतो. उदा. 83Ù80 नी 3 यातील 80, 3 हे मराठी शब्द आहेत. 80 चे 8 दशक, 3 एकक हेदेखील मराठी आहे. फक्त सोपी पद्धत आपण अवलंबतो. माझ्या मते 10 नी 1 अकरा अशीही सुरुवात करायला हरकत नाही. लहानपणी एकावेळी अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात येतात. म्हणूनच विद्यार्थी 50Ù50 नी 5 पंचावन्न, पचपन, Fifty Five अशा अनेक प्रकारे विद्यार्थी लक्षात ठेवतो. इथे एका विषयाबरोबर अन्य विषयांशी संबंध जोडणे मुलांना लिलया जमते. तसं शिकण्याची संधी मात्र पालकांनी मुलांना दिली पाहिजे. क्लास संस्कृतीमुळे मुलांच्या वाचन, मनन, लेखन या क्रिया होत नाहीत. सृजनात्मक स्थिती विद्यार्थीदशेतच विकसित होत गेली पाहिजे. गणिताची निर्मिती मुलांना करता आली पाहिजे. तेव्हाच विचारांच्या शृंखला तयार होतील. त्यातील समस्या लक्षात येतील. समस्येवर उत्तर शोधले जाईल. तेव्हा ज्ञानप्रक्रिया पूर्ण होईल. विद्यार्थी ज्ञानार्थी होईल. हे सर्व आपण मोठय़ांनी लहान होऊन त्यांना सोपे जाईल असा मार्ग मुलांना दाखवला पाहिजे. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर दिली पाहिजे. तेसुद्धा बहुसंख्येने!

आपली प्रतिक्रिया द्या