साय-फाय – वैयक्तिक माहितीची सुरक्षा

>> प्रसाद ताम्हणकर

अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या एका नव्या विधेयकामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची खासगी माहिती (पर्सनल डाटा) आणि तिची सुरक्षा हा मुद्दा जगभरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या या नव्या विधेयकामुळे अमेरिकेत टिकटॉक या अॅपवर बंदी घालण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे अॅप चायनीज कंपनीचे असल्याने अर्थातच चीनने या विरोधावर स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुस्थानमध्ये या अॅपवर पूर्वीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकच्या सुरक्षा यंत्रणेविषयी जगभरात शंका घेतली जात असताना अमेरिकेचे हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

टिकटॉक अॅप हे वापरकर्त्याची गरजेपेक्षा जास्त माहिती गोळा करते हा आरोप जगभरात केला जातो. अनेक पाश्चात्त्य देशांनी आपले राजकीय नेते, सुरक्षा यंत्रणेशी निगडित लोक आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर हे अॅप इन्स्टॉल करण्यास मनाई केलेली आहे. टिकटॉक वापरकर्त्यांची गोळा केलेली सर्व माहिती चीनच्या सरकारसोबत शेअर करते असादेखील आरोप केला जात असतो. मात्र टिकटॉक ही स्वतंत्र कंपनी असून चीन सरकारला कोणतीही माहिती देत नाही असे कंपनीतर्फे अनेकदा सांगण्यात येत असते.

ऑस्ट्रेलियन सायबर कंपनी इंटरनेट 2.0 च्या संशोधकांनी टिकटॉकच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अभ्यास करून जुलै 2022 मध्ये आपला माहिती अहवाल प्रकाशित केला होता. यामध्ये टिकटाक गरजेपेक्षा जास्त माहिती कशी गोळा करते हे पुराव्यासकट सिद्ध करण्यात आले होते. टिकटॉक वापरकर्त्याचे लोकेशन, तो कोणत्या कंपनीच्या कोणत्या मोबाईलमध्ये हे अॅप वापरत आहे, त्याच्या मोबाईलमध्ये अजून कोण कोणती इतर अॅप आहेत अशी सर्व माहिती गोळा करत असत असे यामध्ये नमूद करण्यात आले होते. आजही जगभरातील अनेक सायबर तज्ञ या अहवालाला टिकटॉकवरील आरोपांचा पुरावा म्हणून सादर करत असतात.

या सर्व चर्चेत सायबर तज्ञांचा एक गट मात्र टिकटॉकला पूर्ण दोषी मानण्यास तयार नाही. आज इंटरनेटवर उपलब्ध असणारी अनेक अॅप आणि सोशल मीडिया वेबसाईट यादेखील टिकटॉकसारखीच वापरकर्त्याची सर्व माहिती गोळा करत असतात आणि त्या माहितीचा वापर आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती निवडण्यासाठी करतात असे या तज्ञांचे मत आहे. जे अनेकदा पुराव्यानिशी सिद्धदेखील झालेले आहे. या संदर्भात चर्चा करताना काही तज्ञ एक वेगळा मुद्दा समोर आणतात. त्यांच्या मतानुसार आज टिकटॉक हे फेसबुक, स्नॅपचाट, यूटय़ूब, इन्स्टाग्राम अशा अनेक बडय़ा सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मला टक्कर देत आहे. हे सर्व मोठे प्लॅटफॉर्म अमेरिकन कंपनीच्या मालकीचे आहेत, तर टिकटॉकची मालकी बीजिंगमधील दिग्गज टेक कंपनी असलेल्या बाईटडान्स या कंपनीकडे आहे आणि मूळ दुखण्याचे कारण तेच आहे. टिकटॉक जेवढी माहिती गोळा करते, तेवढय़ाच प्रमाणात माहिती हे इतर अमेरिकन प्लॅटफॉर्म्सदेखील गोळा करत असतात. अशा वेळी फक्त टिकटॉकमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि अमेरिकन कंपन्यांच्या अॅप आणि वेबसाईटने गोळा केलेली वापरकर्त्यांची माहिती मात्र सुरक्षित आहे असे मानणे हा मोठा विनोद असल्याचे स्पष्ट मत हे तज्ञ मांडत आहेत.

अमेरिकेत सादर झालेले विधेयक संमत होणे न होणे हा वेगळा मुद्दा असला तरी या विधेयकामुळे जगभरातील इंटरनेट वापरणाऱ्यांची खासगी माहिती आणि तिची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे हे महत्त्वाचे!

[email protected]