वेब न्यूज – मंगळावर होता समुद्र

753

>> स्पायडरमॅन

 नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर यानाने मंगळाच्या अनेक विशेष गोष्टींचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना खूपच मदत केली आहे आणि हे यान अजूनही बरीच मदत करते आहे. पूर्णपणे अज्ञात असलेल्या मंगळाच्या पृष्ठभागापासून ते त्याच्यावरील वातावरणापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी क्युरिऑसिटी रोव्हरचा प्रचंड उपयोग होत आहे. क्युरिऑसिटी रोव्हरने नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून मंगळावरती समुद्र आणि समुद्री वातावरण असल्याचे अभ्यासातून सामोरे येत आहे.

गेल क्रेटर नावाच्या 100 मैलांच्या रुंद खोऱ्यात पसरलेल्या तलावाचे पुरावे क्युरोसिटी रोव्हरला सापडले आहेत. त्याचबरोबर खडकांमध्ये गाळात मिसळलेले खनिज मीठदेखील शोधण्यात यश आले आहे. या सगळ्याचा अभ्यास करता, 3.5 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावरती सामुद्रिक वातावरण असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. या विषयावरती अधिक संशोधन करण्यासाठी मंगळावरील गेल क्रेटर आणि माऊंट शार्प या भूभागांच्या प्रत्येक थराचा अभ्यास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्युरिऑसिटी रोव्हरने काही महिन्यांपूर्वीच मंगळावरती मिथेन वायूचा शोध लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या यानाने आपल्या मंगळावरील सात वर्षांच्या वास्तव्यातील सर्वात मोठय़ा प्रमाणावरील मिथेनच्या पातळीचा शोध लावला आहे. यापूर्वी शोधलेल्या मिथेनच्या पातळीच्या प्रमाणात नव्याने शोधलेली मिथेनची पातळी तिप्पट मोठी आहे.

या संशोधनामुळे हा मिथेन गॅस कदाचित मंगळाच्या वातावरणात जैविक पातळीवरतीच उपलब्ध असल्याचा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. खरे तर 1970 सालीच व्हायकिंग मोहिमेमध्ये अंतराळ शास्त्रज्ञांना मंगळावरती मिथेन असल्याचे संकेत मिळालेले होते. त्यादृष्टीने मग या वायूच्या शोधाची खास मोहीमच चालू करण्यात आली. पृथ्वीवरच्या सूक्ष्मजीवांसाठी मिथेन अत्यंत महत्त्वाचा वायू समजला जातो. त्यामुळे या शोधाचे एक विशेष महत्त्व आहे. क्युरिऑसिटी रोव्हरच्या सॅम्पल ऍनालिसिसने प्रति 1 अब्ज युनिटच्या 21 भाग या प्रमाणामध्ये मिथेन कसे सापडले हे स्पष्ट केले आहे. सध्या या शोधण्यात आलेल्या मिथेनचा मूळ स्रोत नक्की कोणता आहे, याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या