वेब न्यूज – सेमिकंडक्टर उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ होणार हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

कोरोना महामारीनंतर सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले बोर्ड, कोअर कंपोनंट याच्या पुरवठय़ात निर्माण झालेल्या कमतरतेमुळे जगभरातील उद्योगधंद्यावर प्रचंड मोठा फरक पडला. या भागांच्या कमतरतेमुळे अनेक उद्योगांना मोठे नुकसान सोसावे लागले. सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ामुळे अनेक स्मार्टफोन आणि कार उत्पादकांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणावर कमी आली तर काही स्मार्टफोन उत्पादकांना कोअर कंपोनंटच्या कमतरतेमुळे आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा जास्ती उशीर झाला.

या एकूण प्रकाराचा अभ्यास करता, अनेक देशांनी आता सेमिकंडक्टर आणि कोअर पार्ट्सच्या स्वदेशी उत्पादनाकडे जातीने लक्ष देण्यात सुरुवात केली आहे. हिंदुस्थाननेदेखील या भागांच्या उत्पादनाच आता ‘आत्मनिर्भर’ होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सरकारतर्फे एक ’मास्टर प्लॅन’ बनवण्यात आला असून, सेमिकंडक्टर चिप, डिस्प्ले बोर्डच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PLI ‘(Production Linked Incentive)’ ही योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत आगामी 5 ते 6 वर्षांत 10 बिलियन अमेरिकी डॉलर्स (जवळपास 76,000 करोड रुपये) गुंतवण्याची योजना आखण्यात आली आहे. जोडीलाच ’चिप्स टू स्टार्टअप’ या कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील उच्चशिक्षित आणि अनुभवी इंजिनीअर्सला तसेच विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या, पास आऊट झालेला बी-टेक (B.Tech), एम टेक (M.Tech), पीएचडी (PhD) पदवीधारकांनादेखील या योजनेत सामील करून घेतले जाणार आहे. यामुळे मायक्रो चिपचे डिझाईन, उत्पादन, पॅकिंग, निरीक्षण अशा प्रमुख क्षेत्रात मोठी मदत मिळणार आहे.

सध्या सेमिकंडक्टर चिप, डिस्प्ले बोर्ड, कोअर कंपोनंटस् अशा उत्पादनांसाठी हिंदुस्थान सध्या दक्षिण कोरिया, चायना, तैवान अशा देशांवर पूर्णपणे अवलंबून आहे. हे सर्व प्रमुख कंपोनंटस् सध्या या देशांमधून आपल्या देशात आयात केले जातात. मात्र आता हिंदुस्थानच्या या नव्या धोरणामुळे स्वदेशी सेमिकंडक्टर निर्मितीला प्रचंड प्रोत्साहन मिळण्याची आणि या क्षेत्रात हिंदुस्थान पूर्णपणे ’आत्मनिर्भर’ होण्याची आशा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.