
>> डॉ. हर्षवर्धन कांबळे
लहान मुलांपासून तर मोठय़ा प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वांना सामान्य मानसिक आरोग्याची गरज आहे. हजारोंच्या संख्येत फेस बुकवर मित्र, व्हॉटस्ऍपवर दररोज येणारे हजारो मेसेजेस, यूटय़ूबवर लाखोच्या संख्येने व्हिडीओ, इंस्ट्राग्राम, गूगल, जी मेल, यात काय काय दररोज आहे हे बघण्यातच सारा वेळ जातो आहे. खऱ्या अर्थाने स्वतःसाठी वेळ उरतच नाही आणि त्यातून मग मानसिक स्वास्थ्य डगमगत जाते.
मोबाईलच्या जगातून जी व्यक्ती स्वतःला स्थिर ठेवू शकते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतःसाठी यशस्वी जीवन जगत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मानसिक स्वास्थ्याची अत्याधिक गरज असते. ते आधीच चिंता आणि वार्ध्यक्य अवस्था यामुळे ग्रस्त असतात. एकांताची भावना अधिकच बेचैनी वाढवते. तो एकांतवास अतितीव्र असतो. या स्थितीत मन स्थिर राखणे कठीण असते. तरी सुद्धा स्थिर मनासाठी काही ना काही उपाययोजना कराव्याच लागतात. ध्यानधारणा, विपश्यना किंवा योग आदी गोष्टी फारच सहाय्यक ठरू शकतात. त्यासाठी मात्र मन विचलित करणाऱ्या टीवीवरील बातम्या, क्लेश निर्माण करणाऱ्या धारावाहिक यांचा त्याग करावा लागेल. तसेच मोबाईल फोनचा वापर जर शक्यतो कॉल करणे आणि कॉल स्वीकारणे एवढाच जरी ठेवला तरी पुरेसे आहे. अधिक खोलात जाऊन स्वतःच्या मनःशांतीची तिलांजली देण्यामध्ये काही बुद्धिमत्ता नाही.
ज्येष्ठ नागरिक अंथरुणाला खिळलेल्या स्थितीत आला की घरातील इतर सर्व सदस्य,आता हा काही जास्त दिवस काढू शकणार नाही, अशी कल्पना करतात. म्हणजे त्यांच्याकडून जगण्याची उमेद त्यागून देतात. ज्येष्ठ नागरिकांनी अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेपर्यंत पोचण्याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्टिने अधिक मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. शारीरिक तपासणी नियमितपणे करून घ्याव्यात. त्यात रक्त शर्करा,अस्थी घनता आणि नेत्र तपासणी सर्वात महत्त्वाच्या आहेत. नियमित व्यायाम – योगासने दररोजच्या रोजनिशीमधे असावे. आपल्या आजारी मित्रांना आवर्जून जाऊन भेटावे, त्यांचे मनोबल वाढवावे, जेणेकरुन मानसिक समाधानासह प्रसन्नता लाभेल. सोबतच स्वतःला अधिक आनंदी ठेवण्यासाठी पारिवारिक किंवा समवयस्क वयाच्या लोकांबरोबर सहली काढाव्यात. विविध प्रकारच्या छोटय़ा छोटय़ा क्रीडा स्पर्धा त्यात असाव्यात. एखादा जर कोणता छंद असेल तर त्या छंदास मिळेल तेवढा वेळ द्यावा. त्यातून नवीन सर्जनशीलता सतत घडवत राहावी. एकांतवास आणि मुलांकडून होत जाणारी अपेक्षा टाळण्यासाठी स्वतःला सतत क्रियाशील ठेवणे फार गरजेचे आहे. तसेच याचा पूर्ण फायदा वयाला पराभूत करण्यासाठी सुद्धा होतो. असे म्हणतात की, मित्रमैत्रीण आपल्या मित्राला कधी म्हातारा होऊ देत नाही. म्हणून सर्वांनी आयुषभर मित्र बनवत जावे. यासाठी वयाची अट बाळगू नये. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला कुटुंब आणि समाज यासाठी नेहमी एक उपयुक्त, उपयोगी आणि आवश्यक घटक म्हणुन प्रस्तुत करीत राहावे. म्हणजे त्यांचे उर्वरित आयुष्य समाधानकारक व्यतित होईल.



























































