लेख : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले

>> डॉ. कामाजी डक 

शहाजीराजे यांचा जन्म  18 मार्च 1594 रोजी झाला. त्यांची जयंती 18 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनमध्ये शहाजी महाराज यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला, मग तो आदिलशाहीशी असो, निजामशाहीशी असो किंवा मोगलांशी, ते सतत लढत राहिले. शहाजी महाराज एक महत्त्वाकांक्षी मराठा सरदार होते. ते स्वतंत्र विचाराचे होते. त्यांना मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे असे वाटत होते. पण उत्तरेत बलाढ्य मोगल असताना व दक्षिणेत आदिलशाही व निजामशाही प्रबळ असताना त्यांनी सुरुवातीला निजामशाहीत राहून आपल्या पराक्रमाआधारे तेथे आपला दबदबा निर्माण केला.

निजामशाहीची मोगल व आदिलशाही या दोन सत्तांच्या विरोधात भातवडी या ठिकाणी इ. स. 1624 मध्ये झालेल्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी मोठा पराक्रम केला. या लढाईचे नेतृत्व जरी मलिक अंबरने केलेले असले तरी युद्धामध्ये भोसले बंधूंनीच खरा पराक्रम केला होता. भातवडीच्या लढाईची खरी व्यूहरचना ऐन पंचविशीतल्या तरुण शहाजीराजे यांची होती. याच लढाईत शहाजी महाराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले मारले गेले. यात निजामशहाला मोठा विजय मिळाला. त्यात शहाजीराजांचे मोठे योगदान होते. बृहदीश्वरी शिलालेखात आलेल्या उल्लेखानुसार भातवडीच्या युद्धानंतर दरबारी रिवाजानुसार मूर्तजाशहाने मलिक अंबरला मोठेपणा दिला असला तरी खास आदरसत्कार आपल्या कर्त्या व आवडत्या शहाजी राजांचा केला. या भातवडीच्या विजयापासून दख्खनच्या राजकारणात शहाजीराजे यांचे महत्त्व वाढले.

शहाजीराजांच्या मोठेपणाचा गौरव जयराम पिंडे यांनी आपल्या ‘राधामाधवविलासचंपू’ या काव्यात केला आहे. यामध्ये आलेला उल्लेख असा, परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतात की, ‘तू सृष्टी रचिलीस तीत कोणाकोणाची कुठे योजना केली आहे’ तेव्हा ब्रह्मदेव सांगतो- ‘ पूर्वेचा रक्षक रवि व पश्चिमेला रक्षक चंद्र केला आहे तसेच उत्तर दिशेला लोकपाल शहाजहान बादशहा केला आहे व दक्षिण देशाचा रक्षक शहाजी महाराज केले आहेत. आपण खुशाल क्षीरसागरात शयन करायला हरकत नाही’ जयराम पिंडे यांनी शहाजीराजांना दक्षिण देशाचा रक्षक म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना चंद्र व सूर्य यांच्याशी केलेली आहे. जयराम पिंडे यांच्या या उल्लेखावरून दक्षिणेमध्ये शहाजी राजे किती प्रबळ होते हेच दिसून येते.

शहाजीराजांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नाचा बंदोबस्त करण्यासाठी मोगल व आदिलशहा यांनी एकत्र होऊन मोहीम आखली. या दोन्ही सत्तांच्या विरोधात शहाजी राजेंनी पेमगिरी ते माहुली असा जवळपास 4-5 वर्ष संघर्ष केला. जोपर्यंत लढणे शक्य आहे, तोपर्यंत माहुलीच्या किल्ल्यावर शहाजीराजांनी मोगल व आदिलशाही सैन्याशी निकराचा लढा दिला. पण या दोन्ही बलाढ्य सत्ता असल्याने फार काळ संघर्ष शक्य नव्हता. तरीही शहाजी राजांना पुढे आदिलशाहीची जहागिरी देण्यात आली. यांच्या पराक्रमाची नोंद दख्खनच्या इतिहासमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावी अशीच आहे.

मोगलापासून आदिलशाहीचे रक्षण करण्यासाठी पुढे या बलवान मराठा सरदाराची आपणास मदत होईल या आदिलशहाच्या विचाराचे प्रतिबिंब शिवभारत या ग्रंथात दिसून येते. शिवभारतातील उल्लेख असा, ‘ज्या सामर्थवान मोगलांनी निजामशहास युद्धात बुडविले ते मलाही बहुधा बुडवितील म्हणून या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपले इष्टकार्य साधीन’. शहाजी महाराजांना मोठ्या आदराने आदिलशहाने आदिलशाहीत सामील करून घेतले.

शहाजी महाराज आदिलशाहीचे सरदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न कायमच सुरू होते. स्वराज्य स्थापीत करण्याच्या आपल्या आकांक्षेतूनच कर्नाटकातील हिंदू राज्य व संस्थाने शहाजी महाराजांनी आपल्या छत्राखाली टिकवून ठेवली. तेथील राजांना त्यांनी आपले मांडलिक बनविले. शहाजीराजे जरी आदिलशाहीचे सरदार असले तरी कर्नाटकात ते एका स्वतंत्र राजाप्रमाणे कारभार करत. या कालखंडात त्यांनी जिवाभावाची माणसे निर्माण केली.

डॉ. बाळकृष्ण म्हणतात, ‘कर्नाटकातील सुभेदार म्हणून शहाजीराजे आदिलशहाच्या वतीने कारभार चालवीत होते त्यांच्या पदरी विविध प्रांतातील सुमारे 75 कवी व पंडित लोक होते. मुस्लिम अधिकाऱ्यांनी तिकडील भागात चालविलेल्या हिंदू प्रजेचा छळ आणि मंदिरांचा विध्वंस त्यांनी थांबविला. हिंदू संस्कृती आणि साहित्य यांचे त्यांनी रक्षण केले. मराठीला दरबारी भाषेत स्थान दिले. महाराष्ट्रातील मंडळींना आपल्या शासनात त्यांनी महत्त्वाच्या जागा दिल्या. त्यांनी सुरू केलेली शासनपद्धत पुढील पिढीकडून आणि त्यानंतरही ब्रिटिश आमदानीत अनुसरली गेली. ते संस्कृतचे विद्वान, मुत्सद्दी व स्वधर्मनिष्ठ राजे होते. ते बृहन महाराष्ट्राचे संस्थापक होते’. शहाजीराजे अतिशय विद्वान, सुसंकृत, धाडसी, शूर, धोरणी, पराक्रमी, दूरदृष्टीचे व कल्पक होते. ते न्यायी होते. तसेच प्रेमळ होते. राजनीती व समाजशास्त्रात देखील ते पारंगत होते. समाजाचे हित त्यांना चांगले ठाऊक होते. समाजावरील होणारा अन्याय त्यांना सहन होत नसे, यासाठी मराठ्यांचे राज्य असावे, असे त्यांना वाटत होते. ते लोकांना आधार देत म्हणून तर समाज त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होता. तेथील प्रजा शहाजीराजांना आपला आधारस्तंभ मानत होती.

लेखक पुरातत्त्व समन्वयक आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या