
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
साहित्य-बांधिलकी आणि उत्साह बघून त्यांना अकाली मृत्यू आला अशीच साहित्य विश्वातील सगळ्यांची भावना झाली आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वामध्ये आणि विशेषतः जालन्याच्या साहित्य नावलौकिकामध्ये न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जालन्याच्या शायरीचे झेंडे अटकेपार रोवण्यात शम्स साहेबांचे योगदान मोठे होते. एकेकाळी राजयोग लाभलेल्या या वृद्ध कवीची आर्थिक परिस्थिती बेतास बात होती. शेवटपर्यंत ते उर्दू पेपरवाटपाचे काम करत असत. लोक सांगायचे ते उदरनिर्वाहासाठी असे काम करत असत. मात्र याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणायचे, ‘ही उर्दू भाषेची सेवा आहे.’ स्वातंत्र्यपूर्व अनेक वर्षांपासून जालना जिह्याच्या बोलचालीची व्यवहाराची भाषा उर्दूच होती. साहजिकच उर्दू ‘अदब’ची मोठी परंपरा जालन्यामध्ये पाहायला मिळते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील लाल किल्ल्यावर भरणाऱया मुशायऱयामध्ये देशभरातून प्रसिद्ध शायरांना सन्मानाने बोलावले जाते, हा मान जालन्याच्या रायसाहेब ‘दुःखी’ या प्रसिद्ध उर्दू शायरानंतर शम्ससाहेबांना मिळाला. पंडित नेहरू जालन्याच्या शायरांचे खास चाहते होते. त्यानंतर येणाऱया पंतप्रधानांनी ही पुढे परंपरा सुरू ठेवली. शम्स साहेब एक आठवण सांगताना सद्गतित होऊन जात असत. पूर्व पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी शम्ससाहेबांच्या शायरीचे खास कौतुक केले होते. त्यांच्या गजलेवर आपण फिदा असल्याचे ते म्हणत. शमशुद्दीन मुहम्मद फाजील अन्सारी हे त्यांचे पूर्ण नाव फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल. ‘शम्स जालनवी’ हा त्यांचा तखल्लुस. त्याच नावाने ते ओळखले जात असत. अत्यंत साधेपणा, ऋजू स्वभाव, मितभाषी, मात्र आपुलकी निर्माण झाली की मनमोकळे हसून स्नेहबंध साधायची कला ही विलक्षण होती. गझल म्हणजे खरंतर त्यांच्या आत्म्याला शब्द सुचायचे आणि त्याची शायरी व्हायची. त्यांना अनेक गझला मुखोद्गत होत्या, त्या त्यांनी कधीही लिहिल्या नाहीत. त्यांची गझल थेट काळजाला भिडते. गझल पेश करून आपल्या शब्दांच्या मोहामध्ये रसिकांना तल्लीन बघताना त्यांना अभिमान वाटायचा. त्या नादात त्यांनी अनेक कविता टिपून ठेवल्या नाहीत. गेल्या 75 वर्षांपासून त्यांच्या शब्दांचे गारूड महाराष्ट्रभर नव्हे, देशभर होते. शकील बदायुनी, गुलजार आदींच्या सोबत विविध राज्यांमध्ये मुशायऱयांना व्यासपीठावर भागीदारी त्यांनी केली. उर्दू ही त्यांची आत्मभाषा व्यक्त होण्यासाठी अत्यंत सृजनात्मक ठरते. समोर रसिक बसलेले असताना त्यांचा ‘अंदाजे बयां’ ज्यांनी पाहिलाय त्यांना हाडाचा-मांसाचा कवी कसा असतो ते वेगळा दाखवण्याची गरज नाही. काव्यसंध्या, मुशायरे, साहित्य संमेलने यामध्ये त्यांचा उत्साही सहभाग असायचा. त्यांच्या आवाजाला तीक्ष्ण अशी धार होती, त्यांची गझल गहिऱया गुहेतून उमटत असल्यासारखा भास होई, शब्दफेकीची त्यांची हातोटी ही त्यांच्या प्रसिद्धीचे महत्त्वाचे कारण ठरले. शम्ससाहेबांची गझल कानातून झिरपत जाऊन हृदयाला हात घालते आणि समस्त रसिकांना ते त्यांच्या तरन्नुमने डोलायला लावत. शम्सचे दोन गझलसंग्रह आहेत. ‘तमाजत’ हा उर्दू संग्रह. उर्दूसंग्रह अनेक रसिक वाचकांना भाषेच्या अडथळ्यामुळे वाचता येत नसायचा. त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी देवनागरी आवृत्ती काढली. ‘मध्यान्ह का सूर्य’ कवितासंग्रह अनेक गझलप्रेमींना वाचता आला. त्यातली तालबद्धता, शब्द रचना, भावस्पर्श अनुभवता आले. शम्स शायराची वैशिष्टय़े आणि लिखावट अशी रसिकांच्या मनावर कोरली गेली. त्यांच्या उर्दू अदबच्या सेवेला राजाश्रय आणि पुरस्कार मिळाला नाही. ‘पद्म’ पुरस्काराच्या तोडीची त्यांची शायरी बेदखल राहिली अशी खंत साहित्य रसिकांच्या मनात कायम राहील. त्यांची अत्यंत
गाजलेली गझलेचा नमुना बघा-
मेरा मन कितना पागल है।
काटों से खुशबू की आशा,
जहर से जीवन मांग रहा है।
बीते दिन नहीं लौट के आते,
सूखे फूल नहीं मुस्कराते,
‘शम्स’ वो मेरी बूढी मां से मेरा
बचपन मांग रहा। मेरा मन…
उर्दू साहित्य विश्वातला तळपता माध्यान्हीचा सूर्य मावळला. तरीही, अदबची सेवा करण्याचा त्यांचा वसा पुढे चालवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.






























































