अवतरले जग ताराया!

179

>> चैतन्यस्वरूप ([email protected])

अंतापुरातील वास्तव्यास मागे सारून शंकरबाबाची पावले हिमालयाच्या पर्वतरांगांचा वेध घेती झाली. चिमणाजीच्या घरातील वास्तव्य तसेच मायबापाच्या त्या प्रेमळ आठवणींमधून बाहेर निघणे शंकरबाळासाठी कष्टप्रद होते. शंकरबाळास त्यांनी लहानाचा मोठा केला होता. त्याची हौसमौज पुरविली होती, लाडाकोडाने वाढविले होते. दैवगती काही और असली तरीही परमेश्वरासदेखील मानवरूपामध्ये अवतरीत झाल्यावर मायेचा पगडा झुगारणे अशक्य असते. विष्णू परमात्म्याने कारणपरत्वे विविध युगांमध्ये श्रीरामाचे आणि श्रीकृष्णाचे रूप धारण केले, तेव्हा भगवंतासही मायबापांच्या वात्सल्य ओढीतून बाहेर पडणे निव्वळ अशक्य झाले होते. याच कारणाने, चिमणाजीचे आणि मातेचे वात्सल्य अन् त्यांचा प्रेमळ भावबंध दूर सारून अवतारकार्याच्या वाटचालीचा पुढील टप्पा गाठणे शंकरबाबासाठी विलक्षण त्रासदायक ठरले, तरीही साधुवृत्तीला जागून त्याने इतिहासातील आठवणी इतिहासातच राहू दिल्या आणि नव्या क्षितिजाकडे झेप घेतली.

हिमालयातील विस्तीर्ण पर्वतरांगा उल्लंघून जाण्याचे आव्हान अन् त्यात शंकरबाबाचे अष्टावक्र शरीर! जेथे सर्वसामान्य मनुष्यप्राण्यास पायी चालत जाणे अशक्य तेथे ठिकठिकाणी वाकुडेपण प्राप्त केलेल्या शरीराच्या साहाय्याने हिमालयाच्या पर्वतरांगामधील चढउतारास सामोरे जाणे ही कल्पनाच विलक्षण कष्टदायी आणि शरीरसामर्थ्याचा अंत पाहणारी होती. मात्र अवतारकार्यातील अलौकिकत्वाची पहिली चुणूक दाखवीत शंकरबाबा योगमार्गाने केवळ मनोबलाच्या वेगावर आरूढ होऊन थेट हिमालयाच्या शिखरासन्निध उतरले.

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये शंकरबाबांचा बरेच दिवसांचा मुक्काम झाला. अनेकविध योगी, ऋषिमुनी व सिद्धसत्पुरुषांशी संपर्क झाला. त्यांच्याशी विविध विषयांवरील चर्चा आणि अध्यात्ममार्गातील अनेकविध रहस्ये जाणून घेण्यासाठी शंकरबाबांनी समग्र हिमालय पालथा घातला. दीर्घकालीन वास्तव्यानंतर ते केदारेश्वर येथे आले आणि तेथे अदमासे बारा वर्षे मुक्काम करते झाले. पुढे केदारेश्वराचे वास्तव्य आटोपल्यावर शंकरबाबांनी प्रयागक्षेत्री गंगा-यमुना-सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पंधरा महिन्यांचे वास्तव्य केले. श्रीमहाराजांच्या पावन वास्तव्यामुळे त्रिवेणी संगम क्षेत्रदेखील पवित्र झाले. शंकरबाबा जेव्हा संगमामध्ये स्नान करण्याकरिता उतरत असत तेव्हा त्या तीनही नद्यांचे पाणी उसळून वर येत असे आणि बाबांच्या मंगलस्नानाची इच्छा पूर्ण करीत असे. त्या परिसरामध्ये उपस्थित असलेल्या अनेक भाविकांनी हा चमत्कार पाहिला, मात्र शंकरबाबांच्या अवतारीत्वाविषयी माहिती नसल्याने त्यांना बाबांचे मोठेपण जाणवले नाही. असो.

हिंदुस्थानातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण करून श्रीशंकरबाबांची स्वारी हिंदुस्थानच्या सीमारेषा ओलांडती झाली. भक्तजनांचा उद्धार करणे आणि अध्यात्ममार्गाचा प्रचार करणे या हेतूने शंकरबाबांनी सर्वत्र सर्वदूर संचार केला. प्रत्येक ठिकाणी ते विविध नावाने वावरले. अनेकविध प्रांतांतील भक्तभाविकांनी श्रीशंकरबाबांचे विविध प्रकारे नामकरण केले. सातपुडा येथील भक्तमंडळी त्यांचा उल्लेख ‘सुपडय़ाबाबा’ अर्थात ‘सापडलेला’ या संबोधनाने करीत असत, तर मध्य प्रदेशामध्ये ते ‘गौरीशंकर’ नावाने ओळखण्यात येऊ लागले. गुजरात येथे ‘देवियाबाबा’ म्हणून तर युरोपखंडामध्ये ते ‘जॉनसाहेब’ या नावाने प्रख्यात झाले. मुसलमान भक्तमंडळी त्यांना ‘रहिमबाबा’ म्हणून ओळखत होती तर खानदेश प्रांतातील ‘रावेर’ परिसरामध्ये ते ‘कुँवरस्वामी’ म्हणून ख्यातकीर्त झाले. पंढरपूर येथे ‘पंढरीनाथ’, मध्य प्रांतात ‘लहरीबाबा’, मद्रासमध्ये ‘गुरुदेव’, आफ्रिकेत ‘टोंबो’ आणि अफगाणिस्तानामध्ये ‘नूरमहंमदखान’ या संबोधनाने शंकरबाबांची ओळख दृढ झाली.

विविध देशांमध्ये अनेकविध नावाने सुपरिचित आणि भक्तप्रिय असणारे शंकरबाबा विशिष्ट ध्येयरूपाने अवतरीत झाले. ‘परमार्थ म्हणजे काय’ आणि ‘सर्वसामान्यांचा उद्धार कसा करता येईल’ या सद्हेतूने सर्वत्र संचार करीत ते पुन्हा एकदा महाराष्ट्रभूमीत कसे अवतरले, आणि लीलाप्रसंगांच्या माध्यमातून त्यांनी येथील भक्तांच्या हृदयात स्वतःचे अढळस्थान कसे निर्माण केले हे पुढील भागात पाहूया.

आपली प्रतिक्रिया द्या