वीर शिवा काशिद

छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार करण्यात अनेक मावळ्यांचे, शूरवीरांचे प्राण पणाला लागले. त्यातीलच एक शिवा काशिद. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणार्या नेबापूर या गावातील त्यांचा जन्म. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत. सिद्दी जौहरने प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला होता. महाराजांनी हा वेढा फोडत विशालगडाकडे जाण्याचे ठरविले. विशालगडाकडे दोन पालख्या निघाल्या. एका पालखीत महाराजांचा पोशाख चढवून शिवा काशीद बसले. महाराजांची पालखी सुरक्षित पुढे गेली पण जौहरच्या हेरांनी दुसरी पालखी अडवली अन् सिद्दीने शिवा काशिदचे शीर कलम करण्याचा आदेश दिला. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणार्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. इथे शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या परामाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत.