देखो उसकी शान, फहरे भगवा निशान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>मल्हार कृष्ण गोखले

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे नेहमी एक स्फूर्तिदायक हिंदी कवन म्हणत असत,

‘दिल्ली लूटी, आग्रा लूटा, घोडा उडा मैदान।
देखो उसकी शान, फहरे भगवा निशान।।

या शब्दांसरशी, ऐकणाऱया श्रोत्यांच्या मनात हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांपासून दिल्लीचे उन्मत्त मुघल तख्त फोडणाऱया वीर सदाशिवराव भाऊपर्यंतच्या सगळय़ा रणमर्दांच्या आठवणी जाग्या होत असत. त्यांच्या दौडत्या घोडय़ांच्या टापांसोबतच पुढे पुढे सरकणाऱया भगव्या विजयी ध्वजाच्या आठवणीने श्रोते उत्साहाने सळसळून उठत.

प्रस्तुत ‘ध्वज पुराण’ या पुस्तकाचे लेखक राजेंद्र शेळके यांच्या मनात असे आले की, छत्रपती शिवरायांनी हा भगवा झेंडाच का बरे निवडला? अभ्यास केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, भगवा झेंडा हा अनादि काळापासून हिंदू चक्रवर्ती सम्राटांचा ध्वज राहत आलेला आहे. महाधनुर्धर प्रभू रामचंद्र, सम्राट शालिवाहन, वाकाटक, चंदेल, होयसाळ, पाल, यादव, चौहान, कृष्णदेवराय या सर्वांचे ध्वज भगवेच होते. भगवान श्रीकृष्णाचाही ध्वज भगवाच होता नि शिवाय त्यावर गरुड चिन्ह होते. त्या ध्वजाला यादव वंशाचा गरुडध्वज असे म्हटले जात असे. रणांगणावर हा ध्वज नुसता दिसला की, शत्रूसैन्याच्या उरात धडकी भरत असे. मग लेखकाने ‘ध्वज’ हाच विषय धरून खूप अभ्यास केला. हिंदूंचा प्रत्येक देव हा योद्धा आहे आणि तो युद्धाला जाताना आपला विशिष्ट झेंडा फडकावीतच जातो. देवांचाही देव जो भगवान शिव, त्याच्या भगव्या ध्वजावर नंदीचे चिन्ह असते. आई जगदंबेच्या भगव्या ध्वजावर सिंह असतो. शिवाच्या गणांचा प्रमुख जो गणपती त्याच्या ध्वजावर कधी कुंभ असतो, तर कधी मूषक असतो. देवसेनेचा अधिपती कार्तिकेय याच्या ध्वजावर मयूर असतो.

लेखकाने ध्वजाबद्दलचा आपला हा सगळा अभ्यास एकत्रित मांडून प्रस्तुत पुस्तक सिद्ध केले आहे. देवदेवतांच्या ध्वजांपासून ते प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, महाभारतातील अनेक महारथी, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, चालुक्य, शिलाहार, यादव, विजयनगर, शिवशाही, पेशवाई, राजा रणजित सिंह, राणी लक्ष्मीबाई अशा सर्वांच्याच ध्वजाचा आढावा इथे उपलब्ध आहे.

काही सटकणाऱया गोष्टीही आहेत. ‘ध्वज पुराण’ हे सुंदर नादमधूर आणि अर्थवाही नाव असताना त्याला ‘कॅलिडोस्पिक ह्यू’ हे खडबडीत इंग्रजी उपनाव कशासाठी? तसेच महमंद पैगंबर, मुघल, निजामशहा, टिपू सुलतान यांच्या ध्वजांची माहिती कशासाठी? बरे, एक संदर्भग्रथ म्हणून ती द्यायचीच असेल, तर मग इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचीही द्यायची, म्हणजे पुस्तकाला परिपूर्णता आली असती.

एकंदरीतच अशा सर्व गोष्टींसाठी व अधिक नेटक्या विषय मांडणीसाठी कुणा जाणत्या संपादकाची मदत घ्यायला हवी होती. तरीही पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीयही. कारण अनेक ध्वजांच्या रंगीत आर्ट प्लेटस्ही दिलेल्या आहेत. चित्रकार नितीन पासलकर यांनी उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि या ध्वजांच्या आर्ट प्लेटस् बनवल्या आहेत.

नावीन्य प्रकाशन, पुणे यांची एकंदर निर्मिती समाधानकारक. मांडणी, मुद्रण या तांत्रिक बाबीत सुधारणेला वाव. दुसऱया आवृत्तीत तशा सुधारणा व्हाव्यात अशी अपेक्षा नि शुभेच्छादेखील.

ध्वज पुराण                                                                                  

कॅलिडोस्पोपिक ह्यू

लेखक: राजेंद्र शेळके

प्रकाशक: नावीन्य प्रकाशन, पुणे

पृष्ठ: 165, मूल्य: 550 रुपये