
>> विवेक दिगंबर वैद्य
कर्ममार्गाचा सिद्धांत तळागाळापर्यंत रुजविणाऱया सिद्धेश्वर कुरोलीस्थ ‘श्रीयशवंतबाबा’ यांच्या अवतारकार्याचा हा परिचय.
सन 1923. उन्हाळ्याच्या काहिलीने तप्त झालेला ‘मायणी’ गावचा परिसर आषाढसरींची चाहूल लागल्यागत हरखला. रखरखीत वास्तवाचे दाहक अस्तित्व पुसण्यासाठी मातीमाय अंगाअंगाने पाझरावी तसं काहीसं घडलं. 23 जून. चारचौघांगत प्रपंचाचा गाडा ओढणाऱया नावजी मानेंच्या बायकोची, सगुणेची कूस उजवली. जन्मलेल्या बाळाचा टाहो ऐकण्यासाठी जलदेवता सर्वांगाने बरसू लागली. ऊनपावसाचे आलटपालट नवजात बालकाचे स्वागत करते झाले आणि त्याच्या ललाटीचा वनवासदेखील प्रत्यक्षात येण्यास अधीर झाला.
‘लक्ष्मण’ नावाचे दिसामासाने वाढणारे हे बालक त्याच्या नकळत्या वयातच मातृप्रेमाला पारखे झाले. हक्काची माय निवर्तल्यावर त्याचा सांभाळ सिद्धेश्वर कुरोली येथे राहणाऱया त्याच्या मोठय़ा बहिणीने केला. येथील सिद्धेश्वराच्या मंदिरात तासन्तास रमणाऱया लक्ष्मणाचा सांभाळ बहिणीने निगुतीने केला असला तरीही, वाढत्या वयासोबत उमज आणि समज येताच लक्ष्मणाने लहरी वाऱयाची साथ घेत कुरोली गाव सोडले. उन्हातान्हातून फिरत, ठेचकाळत, उपाशी-तापाशी राहात लक्ष्मण मुंबईस आला, मात्र इथल्या धकाधकीच्या वातावरणात तो रमला नाही. येथून तो अस्वस्थ मनाने निघाला आणि सोमेश्वरास पोहोचला. अननुभवाचे गाठोडे पाठीशी घेत दिशाहीनपणे फिरणारा तो अश्राप जीव एकेजागी टिकेनासा झाला. भ्रमंती हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय बनले आणि त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी सोमेश्वराहून निघालेला लक्ष्मण पुढे वालचंदनगर-इंदूर-दिल्लीहून कराचीस गेला. तेथेही काही जमले नाही म्हणून पुन्हा मागे वळून तो काशीविश्वेश्वर, प्रयाग-गया, पुणे, देहू-आळंदी, जेजूरी, औंध असे करीत सिद्धेश्वर कुरोली येथेच स्थिरावला. भ्रमंतीचे वर्तुळ पूर्ण झाले. मात्र हा दिशाहीन प्रवास लक्ष्मणाला अनुभवांची शिदोरी, आयुष्याचे ध्येय आणि ‘यशवंतबाबा’ या नावाची वेगळी ओळख देता झाला.
हिंदुस्थानचा बराचसा भाग पायतळी घातल्यावर या भूमीवर असहाय्यतेने जगणाऱया माणसांच्या आयुष्याचे भीषण वास्तव यशवंतबाबांच्या नजरेस आले. अज्ञान, अंधश्रद्धा, जातिधर्माची विषवल्ली आणि त्यात नाहक होरपळणारे असंख्य जीव पाहून यशवंतबाबांनी सर्वधर्म समभावाचा ‘प्रशस्त’मार्ग आपलासा केला. कुरोली येथे बाबा पाच घरी माधुकरी मागत असत आणि त्या बदल्यात पडेल ती कामे करीत असत. हातात काठी आणि खांद्याला झोळी अडकवून फिरणारा हा अवलिया जे ‘दान’ मिळेल, ते स्वीकारत असे. जात व धर्म भेदाभेद, स्पृश्य-अस्पृश्य यांची तमा त्यांनी बाळगली नाही. मिळालेल्या माधुकरीचे तीन भाग करून जलचर व भूचर यांना प्रत्येकी एक भाग आणि राहिलेला पाण्यात भिजवून स्वतःकरिता असा नेम असे, मात्र त्यातही कुणी भुकेला जीव समोर उभा राहिला तर स्वतःच्या भुकेची पर्वा न करता आपल्या हिश्शाचा भाग ‘दान’ करण्यात त्यांनी संकोच बाळगला नाही. माधुकरीच्या बदल्यात भांडी घासून देणे, झाडलोट करणे, अंगण सारवणे, वाणसामान पोचविणे, ओझी उचलणे, पोस्टात पत्र टाकणे अशी अनेक कामे यशवंतबाबा निःसंकोचपणे करीत असत.
बाबांचा वेष आगळावेगळा होता. नेसायला-बसायला आणि झोपायला एक पोते पुरेसे होत असे. भटकंती करत असता खांद्यावर, चिंध्यांनी भरलेले एक पोते या वेषात सदासर्वकाळ दिसणारे यशवंतबाबा स्वतःशीच बोलत-हसत-रागे भरत किंवा मौन धरून राहात. त्यांचे वागणे असंबद्ध, वृत्ती बालोन्मतपिशाच्च आणि बोलणे समोरच्याला न समजेल असे. त्यांच्या उक्तीचा आणि कृतीचा परस्परसंबंध नवख्या मंडळींना अनाकलनीय भासत असे. यशवंतबाबांचा आवाज धारदार आणि दृष्टी भेदक होती. त्यांच्या नजरेला नजर भिडवणे निव्वळ अशक्य. आवाज असा काही दणकट की जणू सिंहगर्जना. त्यांच्या खाण्याची तऱहादेखील असंबद्ध होती. त्यांना चहा अतिशय प्रिय होता मात्र ते चहात पाणी ओतून पीत. शेवेमध्ये खडीसाखर घालीत, भजी पाण्यात भिजवून पिळून मगच खात. त्यांच्या अवतीभवती नित्य पशू-पक्ष्यांचा संचार असे, त्यातही अनेकदा त्यांच्यापाशी असलेला जहरी सर्पांचा वावर दर्शनार्थीच्या हृदयात धडकी भरवीत असे.
यशवंतबाबांचा मुक्काम गावाबाहेरील स्मशानात किंवा वेदावती नदीच्या काठावर असे. स्मशानातील बांबू, अर्धवट जळलेल्या तिरडय़ा आदी एकत्र करून ते झोपडी उभारत तेव्हा गावातील काही विकृत माणसे झोपडीची नासधूस करीत. मात्र बाबा त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत. बाबा अनेकदा रणरणत्या उन्हात तप्त माळावर निवांतपणे पहुडलेले असत. बाबांच्या लहरी जगण्यामध्ये खाण्यापिण्याचा मागमूसही नसे या कारणाने ‘हा वेडा माणूस उपाशीपोटी जगतोय तरी कसा?’ याचे ग्रामस्थांना आश्चर्य वाटू लागले. त्यांच्यातीलच काही भाग्यवंत मात्र यशवंतबाबांचा अधिकार पूर्णतः जाणून असल्यामुळे त्यांनी बाबांवर भक्तीप्रेमाचा वर्षाव केला. पुढे त्यांचे अनुकरण करीत अन्य भक्तमंडळीदेखील सरसावली. यांच्यापैकी अनेकांना यशवंतबाबांच्या देवत्वाची खूण पटली जेव्हा त्यांना बाबांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. यातील कुणी रोगमुक्त झाले, कुणास नोकरी लागली, कुणाचा संसार मार्गी लागला, कुणास धनलाभ झाला, तर कुणास संतती प्राप्त झाली.
यशवंतबाबांमध्ये देवत्वाचा अंश असला तरीही त्यांनी, त्यांच्या अवतारकार्यामध्ये केवळ कर्ममार्गाचाच पुरस्कार केला. त्यांनी माळावर लाकूडफाटा जमवून बेघरांसाठी आश्रमशाळा बांधल्या. गावांतील वाडी-वस्त्यांतून फिरून कूपनलिका बांधल्या. बाबा जिथे पाय ठेवत असत तिथे पाण्याचे झरे वाहात असत. ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील मंडळींना एकत्र करून यशवंतबाबांनी सर्वधर्म समभाव आणि परोपकार यांचा परिचय करवून दिला. गावकऱयांच्या श्रमदानाची झालर लाभताच सिद्धेश्वर कुरोली परिसराचा कायापालट झाला. बाबा कर्मयोगी होते. ‘दोन हात कामासाठी आणि भजनासाठी’ हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांच्याकडे कुणी समस्या घेऊन आला की बाबा त्याला धीर देत, ‘तुझे संकट दूर होईल’ असा विश्वास देत आणि जवळच्या चिंधीला गाठ मारत. अशा गाठी मारलेल्या चिंध्यांची अनेक बोचकी त्यांच्यापाशी पाहावयास मिळत. नैसर्गिक आपत्ती घडल्याचे वृत्त कानी आले की तिथे सर्वप्रथम बाबाच पोहोचत असत याचा अनुभव अनेकांनी घेतला.
निसर्गाला देव मानणारे यशवंतबाबा, ‘काम आहे तर राम आहे’ असे सांगत असत. ‘मी साऱया जगाचे पाहतोय तर तुला वाऱयावर कसा सोडेन?’ आणि ‘तुमचे रिमोट हवेतून फिरतात, माझा रिमोट जमिनीतून फिरतो’ असे निःसंदिग्धपणे सांगणाऱया यशवंतबाबांच्या भेटीला श्रीगगनगिरी महाराज, डेव्हिडबाबा, सरूताई आदी दिग्गज संतमंडळी येत असत. 2004 सालच्या आषाढ शुद्ध षष्ठाrस, रात्रौ बारा वाजता यशवंतबाबांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा कर्ममार्गातून समाजाची नेटकी बांधणी करू पाहणारा अध्यात्माचा बुलंद ‘गड’ ढासळला.





























































