
>>नामदेव सदावर्ते<<
श्रीमद्भगवद्गीता ही दैवी सद्गुणदायिनी आहे. तशीच ती श्रीहरीच्या मुखावाटे प्रकट झाली आहे म्हणून तिला हरिमुखवाणी म्हणतात. ती सकलस्त्राची स्वामिनी आहे. गीता समता आणि त्याग शिकविणारी आहे. गीता हा मानवाला लाभलेला कल्याणकारी असा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गीता केवळ हिंदुधर्मियांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक व कल्याणकारक असा ग्रंथ आहे.
संसारसागरात बुडून मरण्याचे भय नष्ट करणारी श्रीमद्भगवद्गीता परमानंदपदाची प्राप्ती करून देते. भगवद्गीता संसारसागरातून सहज सुखरूपपणे पैलतीरावर नेणारी व वैकुंठप्राप्त करून देणारी नाव आहे. परमानंद प्रदान करणारी गीता मोक्षदायिनी आहे. जीवनात अंधारी रात्र न येऊ देता, अज्ञान, अंधःकार नष्ट करणारी गीता ज्ञानदीप लावते व प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करते.
श्रीमद्भगवद्गीता भक्ताच्या जीवनातील आसुरी संपत्तीचा नाश करून दैवी संपत्ती प्रदान करते. निर्भयता, ज्ञान, सत्कर्म, दान, इंद्रियनिग्रह, तप, स्वधर्माचरण, अक्रोध, अहिंसा, त्याग, शांती, दया, नम्रता, निर्लोभता, तेज, अद्रोह, क्षमा आदी सद्गुण दैवी मानतात. दांभिकता, राग, गर्वअभिमान, निष्ठtरता, अज्ञान, दर्प आदी दुर्गुण राक्षसी मानतात. समाजात दैवी संपत्ती असलेले लोक जास्त असतील तर मानवजात सुखी होईल. म्हणून दैवी सद्गुणांचा संस्कार करणाऱया वाङ्मयाचा प्रसार होणे आवश्यक असते. गीतेचे तत्त्वज्ञान समाज सुखी व समृद्ध बनविणारे आहे. ते गीता तत्त्वज्ञान मराठी भाषेत सांगणारे ज्ञानदेव यांना महाविष्णूचा अवतार मानतात व त्यांना माऊली, आई या नावाने संबोधतात. भगवद्गीतेस तर गीताई म्हणतात. जीवनातील कटूप्रसंगी, संकटात गीता लेकरांस सहाय्य करते. संत विनोबा म्हणतात-
गीताई माऊली माझी । तिचा मी बाळ नेणता।
पडतां रडतां घेई । उचलूनि कडेवरी ।।
श्रीमद्भगवद्गीता ही दैवी सद्गुणदायिनी आहे. तशीच ती श्रीहरीच्या मुखावाटे प्रकट झाली आहे म्हणून तिला हरिमुखवाणी म्हणतात. ती सकलस्त्राची स्वामिनी आहे. गीता समता आणि त्याग शिकविणारी आहे. गीता हा मानवाला लाभलेला कल्याणकारी असा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गीता केवळ हिंदुधर्मियांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक व कल्याणकारक असा ग्रंथ आहे.
वराह पुराणात श्रीमद्भगवद्गीतेचे महात्म्य वर्णिलेले आहे. एकदा पृथ्वीदेवीने भगवंताला विचारले, हे परमेश्वरा, प्रारब्धभोग भोगीत असलेल्या जीवांच्या हृदयात तुझी अनन्यभक्ती कशाने उत्पन्न होईल? यावर भगवान श्रीविष्णू सांगतात, प्रारब्ध भोगीत असतानाही जो नेहमी गीतेच्या अभ्यास, वाचन, मननात मग्न असतो तो संसारात असूनही मुक्त व सुखी जीवन जगतो. महापातकादि पापे त्याला स्पर्श करीत नाही.
पुराणात जसे गीतामहात्म्य वर्णिलेले आहे, तसेच महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा गीतेचे महत्त्व अनेक अभंगातून वर्णन केले आहे. संत एकनाथ म्हणतात-
गीता गीता गीता वाचे जे म्हणती ।
नाही पुनरावृत्ती तया नरा ।।
नित्य नेम वाचे वदतां अक्षरें ।
भवसिंधु तरे अर्धक्षणी ।।
एका जनार्दनी जयाचा हा नेम ।
तयां पुरुषोत्तम न विसंबे ।।
संत नामदेव म्हणतात- संसारी जीवाने गीता गीता असा नाम-जप करावा. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या पापाचा नाश होईल व त्यास कैवल्यपदही मिळेल. एवढेच नाही तर गीतेचे श्लोक कानांनी ऐकले तरी भव-भय नष्ट होईल. एक एक श्लोक म्हणता अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल. जो गीतेचे नित्य वाचन करतो तो महाभाग्यवान समजावा. ते म्हणतात-
गीता गीता गीता त्रिवार बोलतां ।
पाप जाय तत्वतां मोक्ष जोडे ।।
गीतेचा महिमा बोलवेना वाचे ।
बंधने जीवाची दूर होती ।।
एक एक अक्षर कोटी अश्वमेध ।
फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त ।।
एकचि तो श्लोक वाचिलिया नेमे ।
अंती परमधाम प्राप्त होय ।।
नामा म्हणे गीता संपूर्ण वाचितां ।
लाभ त्याच्या हाता बोलवेना ।।
भगवान श्रीकृष्णही गीतेत शेवटी गीता महात्म्य सांगतात-
गीता ही श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेली, व्यासरचित आहे. गीता मंत्ररूप आहे. या मालामंत्राचा ऋषी वेदव्यास होय. गीतेचा छंद अनुष्टुप असून, देवता श्रीकृष्णपरमात्मा आहे. अद्वैतज्ञानामृताचा वर्षाव करणारी गीता सातशे श्लोकांची सप्तशती आहे. मंत्ररूप गीता जगदंबा आहे. मोहरुपी महिषासुराचा नाश करणारी गीता भगवती आहे. ज्ञानराज म्हणतात-
कीं गीता हे सप्तशती । मंत्र प्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ती । आनंदली असे ।।
भगवान श्रीकृष्ण, महर्षी व्यास व गीतामातेस वंदन!































































