आभाळमाया – चंद्राआड दडला सूर्य!

>> वैश्विक, [email protected]

पुन्हा एकदा सूर्यग्रहण पाहण्याचा योग आला. मात्र या वेळी ते रात्री पाहिले. तुम्ही म्हणाल, ठीक आहे ना? रात्रीचा कुठला सूर्य नि ग्रहण! प्रश्न बरोबरच आहे, पण गेल्या काही वर्षांतल्या सॅटेलाइट कम्युनिकेशनमुळे जगातली कोणत्याही वेळी घडणारी घटना प्रक्षेपित केलेली असेल तर कुठेही बघता येते. 8 एप्रिलच्या सोमवारी अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण पाहायला खग्रास पडद्यावर (टोटॅलिटी बेल्ट) लाखो लोक जमले होते. त्यात आमच्या खगोल मंडळाचेही अनेक सभासद होते. ही मंडळी तिथे जेव्हा दिवसा एकच्या सुमारास खग्रास सूर्यग्रहण पाहत होती, नेमक्या त्याच क्षणी इथे मुंबईत बसून तेच दृश्य पडद्यावर दिसत होते. इथे डॅलासमधील खग्रास सूर्य आपल्या रात्री 12.12ला दिसला! अमेरिकेतले अनेक चॅनेल्स या विशेष वैज्ञानिक घटनेचं थेट प्रक्षेपण करत होती आणि आपल्याकडच्या ज्या खगोल अभ्यासकांना तिथे जाणं शक्य झालं नाही, त्यांना घरबसल्या, पण मध्यरात्री जागरण करून हे ग्रहण पाहण्याचा आनंद अनुभवता आला. त्या वेळी अमेरिकेतून मित्रांचे पह्न येत राहिले. बऱयाच ठिकाणी ढगाळ वातावरण होतं.

आपल्या देशात अशा विलक्षण क्षणाची पर्वणी 16 फेब्रुवारी 1980 रोजी आम्ही काही मित्रांनी रायचूर येथे जाऊन ‘याचि डोळा…’ अनुभवली होती. चव्वेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेच सर्व मित्र परवा एकत्र आलो तेव्हा 8 एप्रिलच्या ग्रहणाच्या निमित्ताने त्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही पाहिलेलं खग्रास सूर्यग्रहण देशातून 1898 नंतर दिसलेलं तसं ग्रहण होतं. आमच्या मागच्या किमान दोन पिढय़ांना अशी विलक्षण अनुभूती प्राप्त झाली नव्हती. आम्ही ती सुवर्णसंधी साधली… आणि त्यानंतर हिंदुस्थानातूनच 24 ऑक्टोबर 1995, 11 ऑगस्ट 1999, 9 जुलै 2009 अशी खग्रास सूर्यग्रहणे पाहण्याचा आणि आमच्यासह आलेल्या शेकडो अभ्यासकांना दाखवण्याचाही योग आला. 8 एप्रिलचं अमेरिकेतलं ग्रहण विविध न्यूज चॅनेल्सवर पाहिलं.

1980 मध्ये आम्ही अनुभवलेली सूर्याची खग्रास स्थिती सुमारे अडीच मिनिटांची होती. जगभरचे शेकडो अभ्यासक त्यासाठी ग्रहणपट्टय़ावर दाखल झाले होते. 1995चं ग्रहण अवघ्या एक मिनिटाचं (टोटॅलिटी), तर 1999 आणि 2009ची खग्रास स्थिती ढगाआड झाल्याचा वेगळाच अनुभव आला. आकाशात ढग असले तरी त्यातून येणारा मंद ‘गाळीव’ प्रकाश असतोच. मात्र अशा स्थितीत ढगांच्या वर असणारा सूर्य ‘खग्रास’ होतो. त्या काळात (1 ते 7 मिनिटांच्या) शेजारची व्यक्तीही दिसणार नाही असा काळोख भरदिवसा होतो. हे सारं अनुभवताना आपोआप वैज्ञानिक जागृती होते.

तेव्हा डोळय़ांची सुरक्षा देणारे विशिष्ट गॉगल वापरूनच खग्रास सूर्यग्रहण पाहावं. केवळ अद्वितीय अनुभव असतो. एक्स-रेची काढलेली फिल्म पिंवा वेल्डिंग ग्लास वगैरे वापरू नये. मायकल फिल्मचे गॉगल स्वस्तात मिळतात. अशा प्रकारच्या ग्रहणाचा संशोधकांना किती फायदा होतो, तर बराच! उदाहरणार्थ, 11 ऑगस्ट 1868च्या हिंदुस्थानातून आणि महाराष्ट्रातल्या विजयदुर्गावरून दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या प्रभामंडळाचा जो वर्णपट (स्पेक्ट्रम) घेतला गेला, त्यातून सूर्यावर असलेल्या हिलियम वायूचा शोध निश्चित झाला. गुंथूर आणि जॅन्सेन यांनी कर्नाटकातून, तर नॉर्मल लॉकिएर यांनी आपल्या विजयदुर्गावरून एकाच वेळी हे निरीक्षण केलं होतं. ती जागा आता ‘सायबाचे ओटे’ म्हणून ओळखली जाते.

बाकी सर्वसामान्यांना भरदिवसा झाकला गेलेला सूर्य आणि चंद्राचा कधी न दिसणारा भाग काळय़ा रंगात पाहायला मिळतो. कारण सूर्य चंद्रापलीकडे असतो, आपण अलीकडे पृथ्वीवर. चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या खूप जवळच्या म्हणजे ‘उपभू’ किंवा ‘पेरिजी’ कक्षेत असताना जे खग्रास सूर्यग्रहण होतं, त्याचा ‘खग्रास’ कालावधी (टोटॅलिटीचा काळ) जास्त असतो. त्याची कमाल मर्यादा 7 मिनिटं आणि 32 सेकंद असते. कारण या वेळी चंद्राची दाट छाया पृथ्वीवर ज्या भागात पडेल तिथे जास्त वेळ टोटॅलिटी दिसून भरदिवसा एवढा काळोख होतो की, बुध, शुक्र हे सूर्याजवळचे ग्रह आणि सूर्याचं लखलखीत प्रभामंडळ (करोना) अप्रतिम दिसते. चंद्रछाया पृथ्वीवरून पसार होताना दिसणारा ‘नाचणाऱया’ सावल्यांचा खेळ अभूतपूर्व असतो.

खग्रास पट्टय़ाची लांबी 16 हजार किलोमीटरपर्यंत पसरते, पण रुंदी 200 किलोमीटरच्या आत असते. (8 एप्रिलच्या ग्रहणाच्या वेळी ती 198 कि.मी. होती असं वाचलं). त्यामुळे खग्रास सूर्य पाहायचा तर त्या पट्टय़ातच जावं लागतं. आता तर प्रभावी कॅमेरे आणि दुर्बिणी घेऊन कित्येक सामान्यजनही त्यासाठी जगप्रवास करतात.

8 एप्रिलचं खग्रास सूर्यग्रहण जे आम्ही पडद्यावर पाहिलं ते प्रत्यक्षात अमेरिकेच्या नैýत्येला पॅसिफिक महासागरात सुरू झालं आणि ईशान्येकडे जात कॅनडाचा काही भाग आणि अटलांटिक महासागर पार करून युरोपातूनही थोडंफार दिसलं. इतिहासात नोंदलेलं 7 मिनिटं 20 सेपंदांची ‘टोटॅलिटी’ असलेलं खग्रास सूर्यग्रहण इसवी सनपूर्व 743 मध्ये झालं होतं. पुढचं खग्रास सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027ला अमेरिकेतून दिसेल. ते सवासहा मिनिटं सूर्य झाकणारं असेल. हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहण यानंतर 20 मार्च 2034 ला दिसेल. त्यापूर्वी 21 मे 2031 रोजी पंकणाकृती सूर्यग्रहणही दिसणार आहे. त्याची माहिती 2030 मध्ये घेऊन टोटॅलिटी बेल्टवर जाण्याचं नक्की करा.

छाया – अमोल मांदुस्कर, अमेरिका