
>> किरणकुमार जोहरे ([email protected])
पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱया उपग्रह–ताऱयाच्या एकमेकांच्या सावलीखाली येण्याने माणसाच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होतो हा दावाच अनाकलनीय आहे. ग्रहण ही एक दुर्मिळ व विस्मयकारक खगोलीय घटना आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नये. कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून सूर्यग्रहण पाहावे. तसेच सुरक्षितपणे पाहण्याकरिता इतर आप्तेष्ट व नागरिकांनादेखील प्रोत्साहित करणे ही आपली जबाबदारी आहे.
ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा आणि
खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱया स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. आज (26 डिसेंबर) दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल, त्यामुळे ते पाहण्याचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक संस्था ग्रहण निरीक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहेत त्याचाही लाभ घेता येईल.
एक वर्षात जास्तीत जास्त 7 ग्रहणे होऊ शकतात. यातील 4 ते 5 सूर्यग्रहणे, तर उरलेली चंद्रग्रहणे असतात. एका वर्षात कमीत कमी 2 ग्रहणे होतातच. मात्र त्या वेळीही दोन्ही ग्रहणे सूर्यग्रहण असतात. त्या वर्षी चंद्रग्रहणे होत नाही. चंद्रग्रहणाच्या तुलनेत सूर्यग्रहणे संख्येने अधिक असतात. पण चंद्रग्रहण पृथ्वीच्या अर्ध्या भागावरून दिसते तर सूर्यग्रहण पृथ्वीच्या फारच कमी भागावरून दिसते. त्यामुळे चंद्रग्रहण पाहिलेले लोक जास्त आहेत तर सूर्यग्रहण पाहिलेले लोक कमी आहेत. सूर्यग्रहण सर्वसाधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते. खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त 7 मिनिटे 40 सेकंदांपर्यंत दिसणे शक्य असते. पण कंकणाकृती सूर्यग्रहण जास्तीत जास्त 12 मिनिटे 30 सेकंद एवढा वेळ दिसू शकते.
हिंदुस्थानसह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंडातील इथिओपिया, केनिया व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया, ओमान, हिंदुस्थान, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, इंडोनेशिया या देशांतील काही भागातून दिसेल. दक्षिण हिंदुस्थानातून केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यांतील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित हिंदुस्थानातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. आजच्या सूर्यग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया येथून हिंदुस्थानी वेळेप्रमाणे सकाळी 8 वाजता तर हिंदुस्थानातून 8 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होईल आणि 11 वाजून 10 मिनिटांनी समाप्ती होईल.
हिंदुस्थानातूनच सूर्यग्रहण पाहण्याची संधी सुमारे दहा वर्षांनंतर मिळणार आहे. या आधी 22 जुलै 2009 रोजी मध्य आणि उत्तर हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. 1890 नंतर 15 जानेवारी 2010 रोजी देशाच्या दक्षिण टोकावरून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. 26 डिसेंबरच्या दक्षिण हिंदुस्थानातून दिसणाऱया कंकणाकृती सूर्यग्रहणानंतर 21 जून 2020 रोजी आणखी एक कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर हिंदुस्थानातून पाहता येईल. 21 जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही भागांतून पाहता येऊ शकते.
26 डिसेंबरच्या कंकणाकृती ग्रहणादरम्यान चंद्राच्या सावलीच्या जमिनीवरील मार्गाची रुंदी 164 किलोमीटर असून, हा मार्ग केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यांमधील काही भागांमधून जात आहे. या ग्रहणावेळी चंद्राची गडद सावली ही केवळ 118 किमीच्या रुंद पट्टय़ातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाच्या या मुख्य पट्टय़ामध्येच कंकणाकृती अवस्था दिसून येईल. कंकणाकृती ग्रहणाची मध्यरेषा केरळमधील कन्नूर, तामीळनाडूमधील उटी, कोईम्बतूर, करैकुडी या शहरांच्या जवळून जात आहे. कंकणाकृती ग्रहणाच्या मार्गावर असणाऱया उटीमध्ये सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांनी कंकणाकृती अवस्थेचा मध्य पाहता येईल, तर 11 वाजून नऊ मिनिटांनी ग्रहण संपेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणारे खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते, परंतु कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते तेव्हा सूर्यबिंब मोठे आणि चंद्रबिंब लहान असते, त्यामुळे चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही, त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून दिसेल?
दक्षिण हिंदुस्थानात केरळमधील (कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड) कर्नाटकातील (मंगलोर, म्हैसूर,) तामीळनाडूतील (कोईम्बतूर, इरोडे, करूर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई) येथून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.
खंडग्रास सूर्यग्रहण
महाराष्ट्र आणि उर्वरित हिंदुस्थानातून 60 ते 70 टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहणाची सकाळी 8.10 वाजता सुरुवात, 9.32 वाजता ग्रहण मध्य तर 11.00 वाजता ग्रहण समाप्ती असेल.
ग्रहणांबाबत अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. ग्रहण सुरू होण्याच्या आधीच खाद्यपदार्थ व घरामध्ये सगळीकडे तुळशीची पाने टाकली जातात, मात्र तुळशीच्या पानांमुळे अन्नधान्य दूषित होत नाही असे सांगणारा एकही शोधनिबंध नाही. तसेच ग्रहणकाळात केस आणि नखे कापणे, सिलाई-कढ़ाई करणे, चाकू-सुरी किंवा कात्री आदींचा वापर करणे, भोजन तयार करणे या कृतीने नुकसान होते असा अवैज्ञानिक दावाही केला जातो. ग्रहण लागते तेव्हा कोणत्याही देवी-देवतांचे दर्शन घेणे, स्पर्श न करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी देवी-देवतांना कपाटात बंद करून ठेवले जाते आणि पूजेचे कोणतेही वाक्य बोलले जात नाही.
ग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्राr, वृद्ध, बालके, रुग्ण, अशक्त व्यक्ती यांना खाद्यपदार्थ, पाणी पिणे वर्ज्य करण्यास सांगितले जाते. इतकेच काय पण औषधदेखील दिले जात नाही. भाजी वा फळ चिरल्यास ओठ फाटतात असे सांगितले जाते. मलमूत्रोत्सर्ग, झोपणे अशी कर्मे टाळण्यासाठी सांगितले जाते. ग्रामीण भागात तर या अंधश्रद्धा घरोघरी कसोशीने पाळल्या जातात. यामागे काही ठोस आणि तर्कसंगत पुरावा मात्र नाही. उलट अशी बंधने पाळल्याने अनेकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते व त्यामुळे चक्कर व अशक्तपणा येऊन प्रसंगी जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मलमूत्रोत्सर्ग वेळेवर केल्याने शरीरयंत्रणेत बिघाड तसेच मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होऊ शकते.
ग्रहणात बुटक्या माणसाला ओढल्यास तो लांब होतो. उंच आणि ठेंगणा होणे हे माणसाच्या शरीराच्या वाढीवर अवलंबून असते. असे ग्रहणात वाढून माणसे उंच होऊ लागली असती, तर आज आपल्याला कोणताही ठेंगणा माणूस दिसला नसता हे समजून घ्यायला हवे. अशा हास्यास्पद अंधश्रद्धांना मूठमाती द्यायला हवी.
चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाबाबतीत असणाऱया गैरसमजुती आता बऱयापैकी कमी झाल्या आहेत. याचमुळे ग्रहण कसे असते, याबद्दल पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही कुतूहल वाढत आहे. असे असले तरी ग्रहणामध्ये वेगवेगळ्या परंपरा मानल्या जातात. काही गोष्टी न करण्यास घरातील थोरामोठय़ांकडून सांगितले जाते व अंधश्रद्धेचे बीज एका पिढीकडून दुसऱया पिढीला संक्रमित होत आहे ते थांबवणे गरजेचे आहे.
(लेखक भौतिकशास्त्रज्ञ व विज्ञान पत्रकार आहेत)


























































