मुद्दा – सोयाबिनवर आधारित स्टार्ट अप

974

>> पद्माकर देशपांडे

महाराष्ट्रात सोयाबिनचे दरसाल जवळजवळ 50 लाख टन उत्पादन होते. उत्पादकांना भाव मिळत नाही. कारण सोयाबिनचा उपयोग तेलगिरण्यांचा कच्चा माल म्हणून केला जातो व सोयाबिनमध्ये 17 टक्के तेल असते. उरलेली पेंड गुरांचे खाद्य म्हणून वापरली जाते.

एशियन टायगर म्हटले जाणाऱ्या चीन, कोरिया, जपान या देशांमध्ये शेकडो वर्षे सोयाबिनचा आहारात समावेश केला जात आहे. सोयाबिनमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले असते. मधुमेह, कॅन्सरच्या रुग्णांनी आहारात सोयाबिनचा समावेश अवश्य करावा. आपल्या आहारात सोयाबिनचा समावेश फारसा नसतो. कारण प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबिन खाण्यास योग्य होत नाही व या प्रक्रिया आपणास माहीत नसतात. सोयबिन प्रक्रियांच्या क्षेत्रातले जे थोडेसे स्टार्ट अप यशस्वी झालेले आहेत त्यांचा भर संशोधनावर आहे किंवा हे उद्योग परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने सुरू झालेले आहेत. उद्योजकांनी इंटरनेटवर किंवा यंत्र उत्पादकांनी दिलेल्या माहितीचा उपयोग प्रथम गृहोद्योगात प्रयोग करून बाजारपेठेची खात्री करण्यासाठी करावा. आपण ज्ञानाला, संशोधनाला महत्त्व द्यावे.

संपूर्ण जगात फक्त हिंदुस्थानात सोयाबिन नॉन-जीएमओ आहे. युरोप-अमेरिकेतल्या श्रीमंत ग्राहकांना सर्टिफाइड ऑरगॅनिक व नॉन-जीएमओ उत्पादने हवी असतात. तेथे आता मांसाहारालाच नव्हे तर सर्वच प्राणिजन्य उत्पादनांना विरोध वाढत आहे. या चळवळीला व्हेगन म्हटले जाते. या व्यक्ती गाईच्या दुधालासुद्धा प्राणिजन्य समजतात. ही जगाची बाजारपेठ नवी आहे आणि वेगाने वाढत आहे. 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत सोयाबिनचे दूध एशियन दुकानांमध्येच मिळायचे. आता या क्षणाला अमेरिकेतील दुधाच्या बाजारात सोयाबिनच्या दुधाचा वाटा 15 टक्के आहे आणि वाढत चालला आहे. जी गोष्ट डेअरीची तीच गोष्ट पोल्ट्रीची, चिकनच्या पदार्थांसारखे दिसणारे, चवीला तसेच असणारे, पण कॉलेस्टेरॉल नसणारे अन्नपदार्थ ग्राहकांना हवे असतात.

लघुउद्योगात सोयाबिनचे तेल सोयाबिनचे तेल मुख्यतः प्रचंड गुंतवणूक असणाऱ्या साल्व्हंट एक्स्ट्रक्शन प्लाण्टमध्ये काढले जाते. कारण एक्स्टडरने तेलाचा उतारा कमी मिळतो. मात्र जर आपण रसायनमुक्त सोयाबिनचे तेल जास्त भावाने विकले व त्याच वेळेला पेंडीचा उपयोग सोयानडी, सोयानगेट, सोया ग्रॅन्युल्स अशी उत्पादने करण्यासाठी केला तर लघुउद्योगात हा पथदर्शक प्रकल्प यशस्वी होईल.

फ्रेश सोयामिल्क सोल्ड हिअर एक किलो सोयाबिनपासून  6 लिटर पर्यायी पौष्टिक दूध तयार होते. एवढे स्वस्त असतानासुद्धा अनेक प्रकल्प बंद पडलेले दिसतात. कारण बंद पडणाऱ्यांचा भर कर्जावर असतो. हे दूध चहाला चालत नाही हे ज्ञान यंत्रे बसवल्यावर होते. यशस्वी व्यक्ती वेगळे काही करीत नाहीत. ते वेगळ्या रीतीने करतात. आपण गृहोद्योगात सोयाबिनचे उत्पादन करावे व एका ब्रॅण्डने विकावे. त्याच वेळेला हल्ली सोयाबिनचे दूध बनवताना जो चोथा कचरा म्हणून वाया जातो त्यापासूनही फायदेशीर उत्पादने बनवावीत.

सोयाबिनची कॉफी सोयाबिनपासून कॅफीन फ्री कॉफी बनवता येते.

सोयामीट सोयाबिनपासून चिकन, मांसाला पर्याय असणारे पदार्थ बनवता येतात. नव्हे हल्ली असे पदार्थ आयात होतात. तसेच दिल्लीच्या काही कंपन्या असे पदार्थ सर्व मोठय़ा शहरांमध्ये फ्रँचाइजीच्या मार्फत विकत आहेत. त्यांना या पदार्थाची वाहतूक चिकनप्रमाणेच कोल्डचेनने करावी लागते. आपण ही उत्पादने आवश्यक तेवढय़ाच यंत्रांच्या सहाय्यानेसुद्धा करू शकतो.

सोयाबिनपासून सोयाआटा, सोयापापड, सोयाचिक्की, सोयाब्रेड, सोया बिस्किटे अशी अनेक उत्पादने बनवता येतात. सोयाबिनमध्ये प्रथिनांचे प्रमाण चिकन, मांसाप्रमाणे असते. त्यामुळे पोट भरते. पोट भरल्यामुळे खा खा होत नाही व ढेरीचा घेर सांभाळला जातो. मी स्वतः व्हिवा फूड्स नावाने सोयाबिनची उत्पादने बनवून ‘ऑन लाइन’ विकत आहे. सोयाबिन प्रक्रियातून हजारो रोजगार निर्माण होऊ शकतील असा मला विश्वास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या