आभाळमाया : विश्वाची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

आपल्या म्हणजे अगदी अवकाशस्थ दुर्बिणींच्याही ‘नजरे’ला दिसतं ते विश्व म्हणजे संपूर्ण विश्वाचा केवळ 4 टक्के भाग आहे. याशिवाय आपल्या विश्वात 23 टक्के कृष्णद्रव्य (डार्क मॅटर) आणि 73 टक्के कृष्ण ऊर्जा (डॉर्क एनर्जी) आहे. विश्वाची व्याप्ती समजून घेताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपलं विश्व 13.8 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालं. तो क्षण म्हणजे ‘बिग बँग’ या एका क्षणात आता विश्वात दिसणारे ग्रह-तारे, तेजोमेघ, कृष्णविवरं, दीर्घिका वगैरे निर्माण करणारं द्रव्य एका बिंदूतून (सिंग्युलॅरिटी) झालेल्या महाप्रसरणातून तयार झालं आणि त्याचा पसारा आणखी काही क्षणांतच म्हणजे आधी काही निमिषार्धात ते पहिल्या तीन मिनिटांत कल्पना करता येणार नाही असा वाढत गेला.

विसाव्या शतकाच्या आरंभी ‘‘आता भौतिकशास्त्रात नवीन शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही,’’ अशी मतं व्यक्त होऊ लागलेली असतानाच अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताने विज्ञान विश्व ढवळून निघालंच, पण विराट विश्वाचा आवाकाही लक्षात येऊ लागला. त्याच काळात एडमंड हबलसारखे अनेक संशोधकही यावर विचार करत होतेच. सर्व संस्कृतीमधल्या विश्वाविषयीच्या भाकितांना ओलांडून केवळ खगोलभौतिकीच्या माध्यमातून विश्व जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड’सारख्या संकल्पना पुढे आल्या आणि एकोणीसशे साठच्या दशकात ‘विश्व प्रसरणशील आहे, एक्स्पॅडिंग आहे हे सर्वमान्य होऊ लागलं. प्रत्यक्ष निरीक्षणातूनही दूरस्थ दीर्घिका (गॅलेक्सी) परस्परांपासून दूर जाताना दिसल्याचं सिद्ध झाल्यावर प्रकाशातील रंगांचं परिमाण लावून हा या दीर्घिकांचा ‘रेड शिफ्ट’ (दूर जाणे) असल्याचं स्पष्ट झालं.

आता विश्वातील प्रत्येकी अब्जावधी तारे असलेल्या अब्जावधी दीर्घिका परस्परांपासून दूर जाताना त्याच ‘प्रवासा’चा एक भाग म्हणून काही दीर्घिका जवळ येताना दिसू लागल्या. त्याला दीर्घिकांचा ‘ब्लू शिफ्ट’ असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. उदाहरणार्थ, विश्वातील एकूणच दीर्घिकांच्या चलनवलनात आपली आकाशगंगा (मिल्की वे) दीर्घिका आणि आपल्या शेजारची सर्वात जवळची देवयानी (ऍन्ड्रोमीडा) दीर्घिका यांच्यात जवळीक निर्माण होतेय. हा ‘ब्लू शिफ्ट’ काही अब्ज वर्षांनी या दोन्ही दीर्घिका परस्परांना ओलांडून आपापल्या मार्गाने जातील. मात्र गंमत अशी की, तेव्हाही त्यांच्यातले अब्जावधी तारे एकमेकांवर टक्करण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण एका दीर्घिकेमधील ताऱयांचीं अंतरे प्रचंड आहेत.

तर ‘बिग बँग’ ऊर्फ प्रसरणशील विश्वरचनेत हे घडतंय. या प्रकाराला हे नाव मात्र ज्या फ्रेड हॉएल यांनी विश्व स्थिर स्थितीमध्ये (स्टेटी स्टेट) असल्याचा सिद्धांत मांडला होता. त्यांनी ‘बीबीसी’वरील एका भाषणात (1949) (बहुधा उपरोधाने) केलं आहे? ‘बिग बँग’च्या पूर्वी आपल्या विश्वाची निर्मिती आणि व्याप्ती याविषयी फ्रेड हॉएल यांनी हर्मन बॉन्डी आणि टॉमी गोल्ड या सहकाऱयांसह ‘स्थिर स्थिती’ विश्वाचा सिद्धांत मांडला. त्यानुसार आपल्याकडे विश्वाची जी ‘अनादी अनंत’ अशी प्राचीन संकल्पना आहे, तशाच प्रकारची, पण आधुनिक भौतिकशास्त्रावर आधारित ही मांडणी होती. 1948 मध्ये मांडलेल्या या सिद्धांतानुसार ‘म्हाताऱया’ म्हणजे आधी तयार दीर्घिका परस्परांपासून दूर जात असल्या तरी नव्या तरुण दीर्घिकांची निर्मिती होतच असते. ही एक ‘शाश्वत’ प्रक्रिया आहे. त्यात ‘एका विशिष्ट क्षणी’ असा आरंभ नाही की अंत नाही. त्यामुळे विश्वातील घनता पूर्वी इतकीच राहते. याउलट केंब्रिजमध्ये रेडिओ खगोलशास्त्राचे अभ्यासक असलेले मार्टिन राइल यांनी दुरून येणारे रेडिओ स्रोत मोठय़ा प्रमाणावर असल्याने पूर्वी दीर्घिकांची ‘गर्दी’ होती. म्हणजे विश्वाची घनता आजच्या तुलनेत जास्त होती असं मत मांडलं. आता हे ‘मॉडेल’ ‘बिग बँग’ला पूरक होतंच. मात्र ते ‘स्थिर स्थिती सिद्धांता’तही अंतर्भूत असल्याचं फ्रेड हॉएल यांनी दाखवावं असं आव्हानच दिलं. राइलच्या ‘प्रारूपा’ला गणिती परिमाण देऊन ते सिद्ध करण्याचं हॉएल आणि त्यांचे विद्यार्थी जयंत नारळीकर यांनी ठरवलं. लंडनच्या ‘रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’च्या सभेत अनेक दिग्गजांपुढे ते अवघ्या दहा मिनिटांत सादर करणं हे दुसरं आव्हान होतं. हॉएल यांचे सहकारी बॉन्डीसुद्धा त्या सभेत होते, परंतु गणिती भाग सादर करण्याची जबाबदारी हॉएल यांनी नारळीकर यांच्यावर सोपवली आणि तरुण जयंतने ती उत्तम प्रकारे पार पाडली. अवघ्या आठ मिनिटांतच जयंत नारळीकर यांनी विवेचन संपवलं. मात्र यावर पुढे वैज्ञानिक जगतात साधकबाधक चर्चा अभावानेच झाली. ‘प्रसरणशील विश्व’ सिद्धांत सर्वमान्य झाला. त्यानुसार प्रकाशाच्या वेगाने 13.8 वर्षे (1 प्रकाश वर्ष म्हणजे 9460 अब्ज वर्षे) प्रवास केला, तर विश्वाच्या उत्पत्तीचा ‘क्षण’ समजेल एवढं त्याचं महाप्रसारण झालं नि होत आहे. विज्ञानातले वाद ‘तत्त्वबोध’ करणारे असतात, तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. आपल्यासारख्या सामान्यांना विश्वाच्या विराट व्याप्तीची थोडीशी कल्पना आली तर अधिक संशोधन करायला आपण आपली नि आपल्या ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. एवढं कळलं तरी खूप!