आभाळमाया – हा ‘ओमुआमुआ’ कोण?

>> वैश्विक, [email protected]

विश्व विराट आहेच. आपला ग्रह, आपला जनक तारा सूर्य, संपूर्ण सूर्यमाला हा त्यातला केवळ छोटासा किंवा नगण्य भाग. अर्थात ही नगण्यता वैश्विक परिणामाच्या, विस्ताराच्या तुलनेतली. एरवी आपलं जगसुद्धा आपल्यासाठी मोठंच. परंतु विश्वाच्या सखोल अभ्यासातून त्याचा व्याप हळूहळू आपल्याला समजायला लागलाय. हे ‘समजणं’सुद्धा इतकं कमी आहे की, हजारो वर्षांनंतरही नित्यनव्या प्रयोगांमधून विश्व जाणून घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील.

मात्र आता आपल्या हाती विश्वाभ्यासाची जी साधनं आहेत त्यांच्या मदतीने सतत काही ना काही अजब माहिती मिळत असते. या विस्मयकारी गोष्टी केवळ काल्पनिक नव्हे, तर सत्य असतात. आपली अज्ञाताची अनिवार ओढ आपल्याला म्हणजे मानवी समूहाला स्वस्थ बसू देत नाही आणि आपले वैज्ञानिक हबल, चंद्रा, जेम्स वेब अशा अनेक अंतराळ दुर्बिणींच्या सहाय्याने विश्वाच्या अंतरंगात अधिकाधिक डोकावण्याचा प्रयत्न करतात.

गेल्या काही दशकांमध्ये अंतराळातील विविध गोष्टींचा धांडोळा जगभराच्या वैज्ञानिकांनी घेतलाय. आपल्या ग्रहमालेच्या मर्यादेतील कोणते महापाषाण किंवा अशनी सूर्य आणि पृथ्वीच्या दिशेने कधी येतील, त्यातले कोणते आपल्याला धोकादायक ठरू शकतील… वगैरे गोष्टींचे आडाखे बांधणं पूर्वीच्या तुलनेत सोपं झालंय. एखादा संभाव्य अंतराळी महापाषाण, कधीतरी पृथ्वीला धडक देईल याची शंका आली तर आधीच त्याला एखाद्या धडकयानाची किंवा ‘इम्पॅक्टर’ची धडक देऊन त्याची कक्षा बदलण्यातही यश आलंय. आपलं छोटंसं इम्पॅक्टर (रोझेटा) धूमकेतूवरही आदळलंय.

या सर्व गोष्टी केवळ पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी. पृथ्वीपलीकडच्या मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या दरम्यान एक अशनींचा पट्टा आहे. त्यातून निसटलेले दगड भिरभिरत पृथ्वीकडे येऊ शकतात आणि दाणकन आदळू शकतात. डायनॉसॉरचा अंत आणि ‘लोणार’सारख्या विवरांची निर्मिती अशाच अशनी आघातांमधून झालीय. याशिवाय प्लूटोच्याही पलीकडे असलेल्या ‘किपर’ पट्टय़ातील पाषाण भरकटत आपल्या दिशेने येऊ शकतात आणि आपल्या सबंध ग्रहमालेबाहेर दूरवर आवरणासारख्या पसरलेल्या ‘उर्ट क्लाऊड’मधून काही धूमकेतूही पृथ्वीचा वेध घेऊ शकतात. या अकल्पित अंतराळी आक्रमणापासून सावध राहायला हवं हे वैज्ञानिकांच्या लक्षात आलंय.

आता हे आपल्या ग्रहमालेतलं म्हणजे घरचं झालं थोडं म्हणून की काय, आपल्या सूर्यमालेच्या कक्षेबाहेरचा एक महापाषाण आपल्या ‘हद्दीत’ घुसला. या अनाहुत पाहुण्याचं नाव ‘ओमुआमुआ.’ हे चमत्कारिक उच्चाराचं वाटणारं नाव आहे. हवाई बेटावरच्या हवायन भाषेतलं. त्याचा सरळ साधा अर्थ ‘पहिलाच दूरस्थ दूत’! या ग्रहमालेपलीकडच्या ‘दूता’चा शोध 19 ऑक्टोबर 2017 मध्ये लागला तो ‘हवाई’मधूनच निरीक्षण करताना.
‘ओमुआमुआ’ हा आपल्या ग्रहमालेपलीकडचा पहिला ज्ञात ‘व्हिजिटर’ किंवा भेटीला आलेला ‘पाहुणा.’ आपली जागा सोडून तो आपल्या सूर्याच्या प्रभावाखाली असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाटय़ात सापडला आणि वैज्ञानिक जगतात त्याने खळबळ उडवून दिली. पहिल्यांदा निरीक्षण केलं तेव्हा तो 3 कोटी 30 लाख किलोमीटर म्हणजे चंद्र पृथ्वीपासून ज्या अंतरावर आहे त्याच्या 85 पट अंतरावर होता. त्याचं वैज्ञानिक नामकरण झालं 1 आय/2017 यू 1. तो सूर्याच्या अगदी जवळून गेला. पृथ्वी-सूर्य अंतराच्या तुलनेत 0.000007 एवढय़ा जवळ. सेकंदाला सुमारे 26 किलोमीटर वेगाने त्याचं अंतराळभ्रमण सुरू होतं. 115X111X19 मीटर असा त्रिमितीय आकाराचा हा लांबडा अशनी साध्या भाषेत 300 ते 3000 फूट कमी-अधिक लांबीचा आणि 115 ते 548 फूट कमीअधिक जाडीचा ओमुआमुआ पृथ्वीवर आदळला असता तर उत्पातच झाला असता. त्याचा रंग लालसर दिसतो. सूर्यमालेपलीकडच्या अनेक वस्तूंचा रंग असाच असतो. तो सूर्याजवळ आला तरी त्याला धूमकेतूसारखा ‘कोमा’ किंवा ‘गोलक’ आढळला नाही. त्याची लांबी मात्र सौरमालेतील अशनींपेक्षा अधिक जाणवली. त्याची स्वतःभोवती फिरण्याची गती ‘गिरकी’ घेणारी (स्पिन) नव्हे तर गडगडणारी, घरंगळणारी (टम्बलिंग) असल्याचंही लक्षात आलं.

‘ओमुआमुआ’ नक्की कोणत्या ग्रहमालेचा भाग असावा याचा काही उलगडा झाला नाही. 2019 पर्यंत दोन वर्षे त्याचा अभ्यास केल्यावर हे काही कोणीतरी पाठवलेलं परग्रहमालेतील यान वगैरे नसून एक नैसर्गिक अशनीच आहे. अशा निष्कर्षापर्यंत वैज्ञानिक पोचले. ओमुआमुआ एखादा दूरस्थ धूमकेतूचा भाग अथवा प्लूटोपेक्षा लहान असणाऱया परग्रहमालेतील ग्रहाचा तुकडा असावा आणि त्यावर प्लुटोप्रमाणेच नायट्रोजन बर्फ असावं असंही मत नोंदलं गेलं. लोएब नावाच्या अभ्यासकाने मात्र तो परग्रहमालेतील प्रगत तंत्रज्ञानाद्वारे बनवलेली वस्तू असावी असं म्हटलं असलं तरी या मताला फारसा पाठिंबा मिळाला नाही. ‘ओमुआमुआ’सारखे अनाहुत ‘पाहुणे’ पूर्वी कधी येऊन गेले असतील का? ठाऊक नाही. पण यापुढे सजग राहाणं गरजेचं आहे. आता जरी हा पाहुणा आला त्या मार्गाने परतीच्या प्रवासात ‘किपर बेल्ट’ ओलांडून अतिदूर गेला असला आणि आपल्या कोणत्याही दुर्बिणीच्या टप्प्यात येत नसला तरी त्याने एक नकळत इशारा दिला आहे.