
>> वैश्विक
गेल्या वर्षभरात आपण आपल्या ग्रहमालेतली काही वैशिष्टय़े आणि त्याचबरोबर तारे, ताऱ्यांचा जन्म-मृत्यू, त्यांचे विविध प्रकार, अनेक प्रकारच्या दीर्घिका (गॅलॅक्सी), आपली आकाशगंगा यांची ढोबळमानाने माहिती घेतली. त्यातला अगदी काटेकोर गणिती भाग टाळला तो एवढय़ासाठीच की काही खगोलीय संकल्पनांचा रंजक पद्धतीने परिचय झाला की अधिक अभ्यास करताना त्यातले बारकावे जाणून घेता येतात. आधी एखाद्या विषयाची आवड निर्माण होणं महत्त्वाचं. खगोलशास्त्राच्या बाबतीत आम्ही लोकसमूहात काम करायचं ठरवलं तेव्हा हीच गोष्ट प्रामुख्याने नजरेसमोर ठेवली. सुरुवातीलाच क्लिष्ट वाटणारी प्रमेय सांगून त्या विषयात रुची कशी निर्माण होणार? म्हणून काही पारंपरिक गोष्टींचा आधार घेत विज्ञान रुजवण्याचा प्रयत्न केला. कथा, कविता, पथनाटय़ अशा अनेक माध्यमांमधून लोकांमध्ये उत्सुकता वाढविण्याची सुरुवात केल्यावर उत्साहवर्धक अनुभव गेल्या छत्तीस वर्षांत आला.
त्याला रात्रभराच्या आकाश निरीक्षणाच्या आकर्षणाची जोड मिळाल्यावर तर मुंबईसारख्या शहरातली तरुणाईसुद्धा ‘इयर एन्डिंग’चे ‘इव्हेन्ट’ कार्यक्रम सोडून ‘विश्वरूप दर्शना’च्या सोहळ्यात सामील होऊ लागण्याचा सुखद अनुभवही आला. तर गेल्या वर्षभरातल्या ‘आभाळमाया’त विश्वाचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. तसं पाहिलं तर विश्वाचा धांडोळा ‘थोडासा’च घेता येतो, कारण आपण ज्याला आपलं अनेक ट्रिलियन (म्हणजे एकावर बारा शून्य) दीर्घिकांचं ‘विराट’ विश्व डोळ्यांनी पृथ्वीवरच्या नि अवकाशातल्या दुर्बिणींनी पाहतो ते अवघे पॉइंट पाच टक्के विश्वदर्शन असतं. उरलेलं आहे ते डार्क मॅटर 30 टक्के आणि 69.4 टक्के डार्क एनर्जीचं. यांचं कोडं अजून पूर्णपणे उलगडलेलं नाही. अर्थात एवढय़ा प्रचंड विश्वाचा अभ्यास आपण म्हणजे मानवाने फक्त गेल्या काही हजार वर्षांत केला असेल. त्यातही गॅलिलिओपासूनच दुर्बिणीचं युग जमेस धरलं तर अवघ्या चार-साडेचारशे वर्षांचा हा काळ इतकं प्रचंड विश्व समजून घ्यायला पुरेसा नाही. त्यात वेगाने प्रगती होतेय आणि आपण दृश्य विश्वाच्या मूलकणाच्या (हिग्जबोसॉन) संशोधनापर्यंत पोचलोय हे खरंच. तरीही ही केवळ सुरुवात आहे.
हे वर्ष संपता – संपता आणखी काही अवकाशीय गोष्टींची अगदी धावती माहिती घेऊया. आपल्याकडे नक्षत्रांची कल्पना फार पुरातन काळापासूनची आहे. अवकाशाचे सत्तावीस भाग करून त्यात अश्विनी, भरणी करत करत रेवतीपर्यंतची नक्षत्रे सामावली आहेत. कालांतराने त्यात ‘अभिजित’ नक्षत्राचीही भर पडली. या नक्षत्रांच्या सुरस आणि चमत्कारिक कथाही वर्षानुवर्षे सांगितल्या गेल्या. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘नक्षत्रलोक’ या पुस्तकात त्याचं सुंदर वर्णन आहे. क्रमाक्रमाने येणाऱ्या नक्षत्रांच्या कथांमुळे अवकाशातील त्यांचा ‘पत्ता’ सहज शोधता येऊ लागला. चित्रा नक्षत्राशी चैत्र महिना किंवा मृगशीर्षाशी ‘मार्गशीर्ष’ची जुळणी केल्याने रोजच्या व्यवहारातही ते समजून घेणं सोपं गेलं. पंचांगाच्या पहिल्या तीन म्हणजे तिथी, वार, नक्षत्र या भागात खगोलीय विचारच आहे. तिथी म्हणजे तारीख, पूर्वी म्हणजे अगदी विसाव्या शतकातही चतुर्थीला असं घडलं किंवा त्या वेळी अमकी पौर्णिमा किंवा अमावास्या होती हे सहजतेने बोललं जायचं. जुन्या – पिढीकडून लहानपणी या गोष्टी अनेकदा कानावर यायच्या.
पाश्चात्य जगातही तारकासमूहांची रचना आणि कथा ग्रीकांनी लोकप्रिय केल्या. आधुनिक काळात फ्रेंच संशोधक मेसिए यांनी तारकाविश्वाची 88 भागांत विभागणी केली. परंतु सत्तावीस नक्षत्र किंवा ही ‘मेसिअर ऑब्जेक्टस्’च्या पलीकडेही बरंच काही राहून गेलं. त्यात दूरस्थ दीर्घिका, तेजोमेघ, कृष्णविवर वगैरे गोष्टींचा समावेश करून एनजीसी किंवा न्यू जनरल कॅटेलॉग सिद्ध झाला. हे फारच मोठं काम विल्यम व कॅटेलिन हर्षल यांनी केलं. आज आकाशनिरीक्षकांना प्राचीन अर्वाचीन आणि आधुनिक अशा सर्वच आकाश प्रतिमांची आणि त्यावरून काढलेल्या नकाशांची मदत होते. आता तर हे आकाश नकाशे मोबाईलवरही पाहता येतात. आपण ज्या ठिकाणी आहोत ते ‘लोकेशन’ दाखवलं की त्या गावावर, शहरावर त्या क्षणी दिसणारं अवकाश पडद्यावर उमटतं. त्यासाठी स्थळ आणि वेळेची नोंद करावी लागते. म्हटलं तर आता अवकाशाचा मागोवा घेणं थोडं सोपं झालंय. तरीही खगोलीय अभ्यासाच्या विस्तृत पटामधले असंख्य धागे हाती लागणं बाकी आहे. त्याचा विचार केला जातोय. पुढच्या वर्षी आपण ‘अवकाश झेप’ घेणाऱ्या महत्त्वाच्या मानवी मोहिमांविषयी माहिती घेऊ. त्याचबरोबर काही खगोल – संशोधक आणि अवकाशवीर तसेच महत्त्वाच्या घटनांचीही नोंद घेण्याचा प्रयत्न करूया.































































