
>>वैश्विक
अवकाशी उद्वाहन म्हटलं तर काही बोध होईल? त्यापेक्षा स्पेस एलिवेटर म्हटलं तर स्पेसमध्ये एखादी ‘लिफ्ट’ चालणार की काय असं तरी वाटेल … आणि ते खरं आहे. जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध विज्ञान लेखक आर्थर सी. क्लर्क यांनी त्यांच्या ‘ओडिसी’मध्ये ‘स्पेस एलिवेटर’ची कल्पना मांडली. पृथ्वीवरून एखादा उपग्रह अवकाशात सोडायचा असेल तर तो घेऊन जाणाऱ्या रॉकेटचा वेग सेकंदाला 11 किलोमीटर एवढा असावा लागतो. तरच ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध आणि वातावरण भेदून, वजनरहित जागी उपग्रहाला नेऊन ठेवू शकतं. त्याला एस्केप वेलॉसिटी म्हणतात. ती गती प्रत्येक ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते.
चंद्रावरून रॉकेट अवकाशात उडवायचं तर त्याचा वेग सेकंदाला किमान 2.4 कि. मी. असावा लागेल. तोच बुध गृहावरून 4.3 किलोमीटर असेल. शुक्रावरून 4.3 कि. मी. भरेल, मंगळपृष्ठावरून अवकाशात उड्डाण करण्यासाठी रॉकेटला प्रतिसेकंद 5 किलोमीटर वेग धारण करावा लागेल. गुरू ग्रहाचं आवरण वायुरूप आहे. त्यावर रॉकेट ठेवून उडवता येणं अशक्य पण त्याचं प्रचंड गुरुत्वाकर्षण लक्षात घेता तिथून रॉकेट अवकाशात सोडायचंच झालं तर एका सेकंदाला 60.2 किलोमीटर तर शनीवरून 35.5 कि. मी. वेग द्यावा लागेल. युरेनसवरून अवकाशगामी रॉकेटला सेकंदाला 21.3 किमी., नेपच्युनवरून 23.5 कि. मी. वेग द्यावा लागेल. (प्लुटो 2007 पासून खुजा ग्रह म्हणून घोषित झाला आहे.)
पृथ्वीवरून रॉकेट सेकंदाला 11 किलोमीटरचा वेग देऊन सोडायला प्रचंड ऊर्जा लागते. त्याऐवजी पृथ्वीपासून ते अवकाशापर्यंत एखादा ‘एलिवेटर’ किंवा ‘लिफ्ट’ बांधली तर उपग्रह थेट अवकाशात ठेवता येईल अशी भन्नाट कल्पना एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मांडण्यात आली. 1895 मध्ये रशियन संशोधक कॉन्स्टनटीन यांना ही कल्पना सुचली. पुढे त्यावर बरीच चर्चा घडली.
पृथ्वी ते अंतराळ असा टॉवर उभारून त्यावरून ‘लिफ्ट’ पाठवण्याची तर प्रचंड उंचीचा हा टॉवर बांधण्याइतका भक्कम (कठीण) धातू निर्माण करायला हवा. आजही तसा कणखर धातू उपलब्ध नाही. तो सापडला किंवा बनवला तरी नंतर पृथ्वीची गती, पृथ्वीवरचं वातावरण या सगळय़ाचा अभ्यास करून हा महाउंच मनोरा उभारता येईल. विज्ञानात अनेकदा ‘कथा’ वाटणाऱ्या गोष्टी नंतर प्रत्यक्षात उतरतात. विमान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, परंतु ते ‘स्वप्न’ प्रत्यक्षात आणायला अचूक वैज्ञानिक आधार लागतो. तो अजूनपर्यंत ‘स्पेस एलिवेटर’ला लाभलेला नाही. भावी काळात कदाचित ते शक्य होईल.
त्यापूर्वी जपानी अवकाश शास्त्र्ाज्ञांनी एक ‘मिनी स्पेस’ एलिवेटरचा प्रयोग केला. (सप्टेंबरमध्ये) एच-2बी रॉकेटवरून एक ‘चिमुकला’ किंवा ‘मिनी’ उपहारग्रहांमधल्या 10 मीटर केबलवरून ‘चालवला’ जाईल, असं ठरलं होतं. याच्या यशस्वीतेवर किमान अंतराळातल्या ‘स्पेस एलिवेटर’ कार्यान्वित होऊ शकेल. जपानी ‘मिनिएचर’ प्रयोग मात्र यशस्वी झाला.
अवकाशतंत्रज्ञानाच्या यशस्वीतेची दुसरी वार्ता म्हणजे ‘क्युरिऑसिटी’ या मंगळावर पाठविलेल्या ‘रोवर’ने सहा वर्षे पूर्ण केली आहेत. मंगळावरील पाणी आणि जीवसृष्टीला पोषक घटकांचं संशोधन करणाऱ्या ‘क्युरिऑसिटी’ने ‘मी माझा सहावा वाढदिवस मंगळावर साजरा’ केला तो मंगळावरच्या लोहभस्मासोबत ‘असं रोवर’ म्हणतंय. या आयर्न ऑक्साईडमुळेच मंगळाचा पृष्ठभाग ‘लाल’ दिसतो. अवकाश संशोधनातल्या या दोन प्रगतिशील बातम्या पुढची दिशा स्पष्ट करणाऱ्या ठरतात


























































