अंतराळ- शांतीभूमी की युद्धभूमी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

पृथ्वीवर लोकवसाहती सुरू झाल्या तेव्हापासून त्या त्या वस्तीला एक म्होरक्या मिळाला. त्याच्या महत्त्वाकांक्षा जशा वाढल्या तशा आपापसात ईर्षा निर्माण होऊन राजेमहाराजे, साम्राज्ये यांच्यात तणाव आणि युद्धे झाली. श्रेष्ठ कोण आणि अधिक शक्तिशाली कोण या स्पर्धेत अनेक मार्गांनी युद्धे लढली गेली. काही प्रत्यक्ष युद्धे होती, काही लपून छपून तर काही शीतयुद्धे होती. आधुनिक काळात अणुबॉम्ब, अत्याधुनिक शस्त्रसाठा यावर देशाचे बलाढय़पण अवलंबून असते. शिवाय ही दादागिरी फक्त पृथ्वीसाठीच नव्हे तर अंतराळातील श्रेष्ठत्वासाठीदेखील सुरू आहे. त्यामुळे अंतराळ हे शांतीभूमी की युद्धभूमी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तराळाचा वेध घेण्याचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले ते विसाव्या शतकातील सहाव्या-सातव्या दशकांत. तोपर्यंत दुर्बिणी होत्या, परंतु अंतराळयाने पाठवून अंतराळाचा वेध घेणे हे मात्र याच काळात सुरू झाले. त्या काळी अमेरिका आणि रशियामधील शीतयुद्ध जोरात होते. रशियाने स्पुटनिक पाठवून इतिहास घडविला तर अमेरिकेने प्रत्यक्ष मानवाला चंद्रावर उतरवून नवा इतिहास घडविला. पुढे उपग्रहांचे महत्त्व आणि ताकद लक्षात आल्याने वेगवेगळ्या कारणांसाठी उपग्रह पाठवायला सुरुवात झाली. हवामान अंदाज, संचार, दळणवळण आणि देखरेख तसेच मनोरंजन यासाठी सर्व देश उपग्रहांचा वापर करतात. अर्थात अंतराळातील इतर ग्रह, उपग्रह आणि विश्वाचा वेध घेण्यासाठी मात्र जी काही यंत्रणा असावी लागते त्याचा खर्च परवडणारे देश मात्र थोडेच आहेत. अमेरिका, रशिया, कॅनडा, युरोप, जपान अशा काही बलाढ्य देशांचे आज अंतराळ विज्ञानामध्ये वर्चस्व आहे. अंतराळवीरांना प्रशिक्षण देणाऱया संस्था याच पाच देशांमध्ये आहेत. अर्थात गेल्या काही वर्षांत हिंदुस्थान, चीन, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे देशही अंतराळ विज्ञानामध्ये भराऱया घेत आहेत.

अंतराळ स्पर्धा किंवा शीतयुद्ध हा विषय आता नव्याने छेडला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे चीनने चंद्रावर पाठवलेले चँग-4 हे अंतराळयान. आतापर्यंत चंद्रावरील मानवी मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात रशिया आणि अमेरिका अव्वल होते. आता त्यापाठोपाठ चीनने नंबर लावला आहे. चीनचे अंतराळयान चँग-4 चंद्रावर यशस्वीपणे उतरले आहे. अमेरिका आणि रशियाच्या आजवरच्या अंतराळ सत्तेला या मोहिमेने एक प्रकारे धक्का दिला आहे. जगभरात याचे कौतुक होत असले तरी त्यामुळे शीतयुद्धाच्या लाटा मात्र उसळू लागल्या आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे चंद्राची जी बाजू नेहमी अंधारात असते, जी आपल्याला कधीच दिसत नाही अशा चंद्राच्या मागच्या बाजूवर चँग-4 हे यान उतरले आहे. थोडक्यात जे करण्याचा प्रयत्नदेखील अमेरिका आणि रशियाने केला नाही ते चीनने करून दाखविले. त्यामुळे अंतराळ वर्चस्वाच्या लढाईत चँग-4 हे चीनच्या वाढत्या ताकदीचे प्रतीकच म्हणावे लागेल. याचे जगभर उमटलेले पडसाद पाहता त्यामुळे अंतराळ स्पर्धेला नवीन दिशा दिली आहे हे निश्चित.

चीनला अंतराळ उपक्रमांमध्ये बलाढय़ देशांकडून फारशी मदत कधीच मिळाली नाही. त्यामुळे चीनने स्वतःच्या हिमतीवर ही तंत्रज्ञान विकसित केले. 1970 मध्ये चीनने पहिला उपग्रह अंतराळामध्ये सोडला होता. पुढे चीनने 2003 मध्ये पहिला अंतराळवीर यंग लेवी अंतराळात पाठविला. आता चांद्रमोहीम यशस्वी झाल्याने चीनने मंगळावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. एवढेच नाही, तर मागील वर्षी चीनने इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त रॉकेटस् अंतराळात सोडली आहेत. मागील वर्षात चीनने 39, अमेरिकेने 31, रशियाने 20 आणि जपानने 8 रॉकेस् सोडली होती. 2011 मधील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रकल्पामध्ये अमेरिकेने चीनचा सहभाग नाकारला, परंतु चीनने स्वतःची अंतराळ स्थानकांची दोन प्रोटोटाईप्स पाठविली आणि 2020 मध्ये स्वतःचे कायमस्वरूपी अंतराळ स्थानक पाठविण्याचे ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा जीवनकाळ संपत आल्याने पुढे चीनच्या स्थानकाचे वर्चस्व राहील.

1950पासून जागतिक स्तरावर चर्चेत असलेला अंतराळासंबंधी (जागा) कायदा हा तसा नवीन नाही. जेव्हा 1957 मध्ये स्पुटनिक-1 हे यान प्रक्षेपित झाले त्यावेळी अंतराळात जाण्यासंदर्भात कायद्यांवर औपचारिकरीत्या शिक्कामोर्तब झालेले नव्हते. संयुक्त राष्ट्रसंघाने 1959 मध्ये ‘अंतराळाचा शांततामय उपयोग हा मानवाच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल’ अशा विषयाला धरून एका समितीची स्थापना केली. ‘युनायटेड नेशन्स ऑफ आऊटर स्पेस अफेअर्स’ ही ती समिती. यात बाह्य अवकाश किंवा अंतराळ म्हणजे काय याची व्याख्या केली गेली आहे.

अंतराळ जागेसंदर्भात करारामध्ये (ट्रिटी ) राष्ट्रांनी आपल्या अवकाश संशोधन व अंतराळाचा उपयोग कसा केला पाहिजे (यात चंद्र व इतर अवकाशस्थ वस्तू अंतर्भूत आहेत) याविषयी मांडणी केली आहे. ऑक्टोबर 1967 मध्ये ‘आऊटर स्पेस ट्रिटी’ अस्तित्वात आली. यामध्ये संहारक अण्वस्त्र अंतराळात नेऊ नयेत. त्यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता येईल आणि पृथ्वी, चंद्र व इतर खगोलीय वस्तू सुरक्षित राहतील असे मांडण्यात आले, परंतु यास अजून सर्वमान्यता मिळालेली नाही. शिवाय या कलमांमध्ये अनेक संदिग्धता आहेत.

वास्तविक मानवाने आधी गरजेपोटी अंतराळाचा वेध घ्यायला सुरुवात केली. नंतर कुतूहलापोटी अंतराळाचा शोध घेण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. केवळ पृथ्वीवर नको, तर विश्वात इतरत्रदेखील मानवी वास्तव्य असायला हवे हे स्वप्न मानवाने पाहिले. चंद्रावर आपण पाऊल ठेवले आहे, पण एवढय़ानेच संशोधन वृत्ती थांबत नाही, तर इतर ग्रहांवर आणि उपग्रहांवर जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज माणूस धडपडत आहे, अर्थात तेथेच नेमक्या जीवघेण्या स्पर्धेला कळत नकळत सुरुवात झाली. आज ही स्पर्धा व्यापक होत आहे. दिवसेंदिवस तिचे स्वरूप अधिकाधिक उग्र होत जाणार आहे. अंतराळातील वर्चस्वाची ही स्पर्धा जगाला कुठे नेईल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र ती अशीच अनिर्बंधपणे सुरू राहिली तर पृथ्वीसाठी आणि जीवसृष्टीसाठी तिचे परिणाम घातक असतील हे निश्चित.

[email protected]