एसटीने घेतला आहे सुरक्षित प्रवासाचा वसा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> श्रीरंग बरगे

प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांमध्ये सुरक्षित प्रवास वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि राज्य परिवहन बसेसना अपघात होणार नाहीत याची काळजी घेणे, हे तीन मुख्य उद्देश समोर ठेवून दरवर्षी एसटी महामंडळाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जानेवारीमध्ये अपघात सुरक्षितता मोहीम राबवली जाते. या मोहिमेसाठी शासनाकडून घोषवाक्य देण्यात येते व ते घोषवाक्य घेऊन सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे घोषवाक्य घेऊन राज्य शासन 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान ही मोहीम राबवत आहे.

रस्ते वाहतुकीचा होणारा विस्तार, दररोज रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, रस्तारुंदीकरणामध्ये येणाऱया अडचणी, वाहतूककोंडी, तंत्रज्ञानामुळे वाहनांचा वाढलेला वेग आणि मानवी चुका यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहनांना किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. या मोहिमेचा केंद्रबिंदू चालक ठरवून राष्ट्रीय स्तरावर रस्ता सुरक्षित मोहीम राबवली जात आहे.

वर्ष 2019-20 मध्ये महामंडळाच्या बसेसचे 360 जीवघेणे, 1553 गंभीर, 1424 किरकोळ अपघात असे एकूण 337 असे अपघात झाले. या अपघातांमध्ये 471 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर 4703 जण जखमी झाले. हे प्रमाण एसटीच्या गाडय़ांची संख्या व वाहतुकीचे प्रमाण पाहिल्यास नक्कीच कमी आहे, पण हे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सुरक्षित वाहतूक सेवा हा दावा अधिक प्रबळ करण्यासाठी महामंडळाने चालकांच्या दृष्टीने काही उपक्रम राबवले आहेत व असे उपक्रम राबणारी एस. टी. ही एकमेव संस्था आहे.

गेली 72 वर्षे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची ‘लोकवाहिनी’ म्हणून सेवा करणाऱया एसटीचा ‘चालक’ हा खऱया अर्थाने ‘सुरक्षित प्रवासी सेवेचा’ ब्रँड अँबेसिडर आहे. हा वसा भविष्यात असाच सुरू ठेवण्यासाठी सध्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी 25 वर्षे सुरक्षित सेवा देणाऱया एसटी चालकाचा 25 हजार रुपये देऊन सपत्नीक सत्कार करण्याची घोषणा केली आहे. यापुढे दरवर्षी व्यवस्थेतील सुमारे शे-पाचशे चालकांचा अशा पद्धतीने सत्कार करण्यात येणार असून सुरक्षित सेवेचं व्रत घेतलेल्या चालकांच्या कामगिरीचा हा सन्मान होणार आहे.

चालकाची योग्य निवड – चालकाची निवड करताना त्याची शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता तपासली जाते. चालकाच्या वाहन चालवण्याच्या अनुभवासह लेखी परीक्षा, प्राथमिक चाचणी, 48 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, अंतिम चाचणी अशा विविध स्तरावरील चाचण्या पूर्ण केल्यानंतरच त्या व्यक्तीची चालक पदावर नियुक्ती होते.

आरोग्य – स्वतःची सुरक्षितता ही सर्वोच्च सुरक्षितता आहे. त्यामुळे चालकाने सकस आहार, पुरेशी विश्रांती घेणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये या नियमांचे चालकांना कटेकोरपणे पालन करावे लागते. याअंतर्गत महामंडळातर्फे चालकाच्या वयाच्या 40 वर्षांपर्यंत दोनदा दृष्टी तीक्ष्णता तपासणी तर 40 वर्षांनंतर दरवर्षी दृष्टी तपासणी केली जाते. सर्व आगारांमध्ये चालकांची अल्कोहोल टेस्ट केली जाते. चालकांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रशिक्षकामार्फत समुपदेशन देण्यात येते.

प्रशिक्षण – जड वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या चालकांना त्यांच्या अनुभवानुसार 8 आठवडे, 12आठवडय़ांचे सेवापूर्व प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय 10वर्षांपर्यंत सेवा झालेल्या चालकांना 2 वर्षांतून आणि 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या चालकांना 5 वर्षांतून उजळणी प्रशिक्षण दिले जाते. सोबत अपघात घडल्यास संबंधित चालकास 10 दिवसांचा अपघातप्रवण पाठय़क्रम प्रशिक्षण राबवले जाते.

समुपदेशन – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांचे समुपदेशन करण्यासाठी विभागनिहाय समुपदेशकांची विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे समुपदेशक महामंडळातील चालकांचे समुपदेशन करतात. तसेच ज्या चालकांकडून जास्त अपघात झाले आहेत अशा 100 चालकांना मुंबईस्थित वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) या संस्थेमार्फत विशेष सिम्युलेटर प्रशिक्षण देण्यात येते.

प्रोत्साहन ः सध्या 25 वर्षे विनाअपघात सेवा केलेल्या चालकांना रोख बक्षीस 14 हजार आणि सपत्नीक सत्कार करण्यात येतो. 5, 10, 15, 20 आणि 25 वर्षे विनाअपघात सेवा केलेल्या चालकांना बिल्ला दिला जातो.

अपघात सहाय्यता निधी योजना – रा.प. बस अपघातातील जखमी, मृत व्यक्ती यांना देण्यात येणाऱया अपघात नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यासाठी माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळामार्फत 1 एप्रिल 2016 पासून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत रा.प.बसेसमधून प्रवास करणाऱया प्रत्येक प्रवाशाकडून प्रति प्रवासी 1 रु. ( 1 रुपया) अपघात सहाय्यता निधी घेण्यात येतो.

अपघातग्रस्तांना आर्थिक मदत – अपघातग्रस्तांना जिल्हा परिषद दवाखाना, म्युनिसिपल दवाखाना, कुटीर दवाखाना किंवा शासकीय दवाखाना येथे त्वरित दाखल करून उपचार केले जातात. याव्यतिरिक्त, जखमी व्यक्तींना 500 ते हजार आणि मृतांच्या नातेवाईकांना 10 हजार आर्थिक तात्कालिक मदत देण्यात येते.

सुरक्षितता मोहिमेंतर्गत ठिकठिकाणच्या आगारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. प्रचार कालावधी व सुरक्षितता मोहीम कालावधीत ज्या बस स्थानकांवर ध्वनिक्षेपणाची व्यवस्था आहे, त्या बस स्थानकांवर सुरक्षित प्रवासाबाबतच्या सूचना ध्वनिक्षेपणाद्वारे वारंवार करण्यात येतात. प्रत्येक आगार, बस स्थानक, विभागीय कार्यालय, कार्यशाळेत सुरक्षित मोहिमेबाबत बॅनर लावले जातात. रस्ते मोटार वाहन अपघात व सुरक्षितताबाबत सामाजिक जनजागृती करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेने एक कार्यक्रम तयार केला आहे. मोहिमेंतर्गत राज्य परिवहन कर्मचाऱयांना प्रबोधन करण्यासाठी या संस्थेची मदत घेत सर्व विभागात जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. रोटरी, लायन्स, जेजीस यांसारख्या सामाजिक कार्य करणाऱया मान्यवर संस्थांच्या मदतीने प्रत्येक आगारात कमीतकमी 2 वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात…..सलग 72 वर्षे सुरक्षित प्रवासाचा वसा एसटीने घेतला आहे.