लेख – असीम जीवनेच्छा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नव्या वर्षात सारं काही बरं घडेल अशा अपेक्षेने आपण उत्साहात आरंभ केला. या स्तंभातून या वर्षी जागतिक ठसा उमटवलेल्या माणसांच्या जीवनपटाचा परिचय व्हावा असं ठरवलं. साधारण त्या त्या महिन्यातील जागतिक महत्त्वाची मंडळी कोण याचा मागोवा घेण्याने सध्याच्या कोविडग्रस्त काळात निदान मनाला तरी उभारी मिळू शकेल असा विचार त्यामागे होता, पण वर्षारंभीच ‘ओमायक्रॉन’ आणि कोविडचा उद्रेक जगाला पुन्हा व्यापून टाकताना दिसू लागल्यावर ‘उषःकाल होता होता काळरात्र’ परत येतेय की काय अशा शंकेची पाल सर्वांच्याच मनात चुकचुकली. सर्वांनाच नकोसा असलेला, पण नाइलाजाने स्वीकारावा लागणारा इलाज ऊर्फ ‘लॉक डाऊन’कडे जगाची नव्याने वाटचाल सुरू होतेय का? असं वाटणारं झाकाळलेलं वातावरण सध्या म्हणजे हा लेख लिहिताना सभोवती आहे. तरीही ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या सुरेश भट यांच्या गाण्यातील जिद्द मनात बाळगावीच लागेल. अशा वेळी निदान वाचनात तरी काही स्फूर्तिदायक आणि वेगळय़ा प्रकारचा जीवनसंघर्ष करून यशस्वी झालेल्यांची उजळणी करू या.

समूहाच्या जीवनात जेव्हा ‘जणू सारं काही कोसळतंय’ असे वाटणारे प्रसंग येतात तेव्हा एकमेकांना धीर देत सावरण्याचा तरी मार्ग असतो, पण व्यक्तीच्या जीवनात एखाद्या दुर्धर आजाराने अशी अवस्था आणली तर ती केवळ त्याच व्यक्तीला सहन करावी लागते. त्यातील यातनांवर मात करूनही जे विलक्षण कर्तृत्व दाखवतात, त्यापैकी एक खूप मोठं नाव आहे खगोलशास्त्र्ाज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं.

त्यांचं स्मरण आता होण्याचं कारण म्हणजे गेल्या आठ तारखेला त्यांची जयंती होती. 2018 मध्ये वयाच्या अमृत महोत्सवाचा अनुभव घेऊन त्यांनी हे जग सोडलं, परंतु आयुष्याचं जवळपास अर्धशतकभर मोटर न्यूरॉन या असाध्य रोगाशी विकलांग अवस्थेशी धैर्याने सामना करत त्यांनी जगाला स्तिमित करणारं विश्वरचनेसंदर्भातलं  संशोधन केलं.

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या प्रसिद्ध ऑक्सफर्ड शहरातला. जागतिक कीर्तीच्या विद्यापीठासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. स्टीफन यांच्या आई-वडिलांच्या घराण्यांमध्ये उच्च शिक्षणाची परंपराच होती. दोन्हीकडच्या नात्यांमधली बरीच मंडळी वैद्यकीय क्षेत्रात होती. अशा वातावरणात स्टीफनचं शिक्षण उत्तम प्रकारे होणं स्वाभाविकच होतं. शालेय जीवनानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ते भौतिक शास्त्र्ााची बी.ए. पदवी पहिला वर्ग मिळवून उत्तीर्ण झाले. तरुण स्टीफन यांना पुढचा खगोलीय विश्वरचना शास्त्र्ााचा अभ्यास केंब्रिज विद्यापीठातून करण्याची इच्छा पूर्ण करता आली. आधुनिक कॉस्मॉलॉजीचे जनक मानले जाणारे डेनिस शिमा तसंच खगोलशास्त्र्ाज्ञ फ्रेड हॉयल (नारळीकरांचे गुरू) हेसुद्धा तेथेच होते. एकंदरीत अभ्यासाला अनुकूल वातावरण असतानाच स्टीफन यांना  ‘मोटर न्यूरॉन’ या विकाराची चाहूल लागली. एकेक करत स्नायू आणि अवयव हळूहळू निकामी होण्याचा हा विकार म्हणजे एखाद्या तरुणाला शापच होता. स्टीफन यांना त्यातून डिप्रेशन आलं. ते स्वाभाविकच होतं.

परंतु इथेच त्याच्या अंतर्मनाची कसोटी होती. के.एल. सैगल यांच्या एका गाण्यात ‘करू क्य आस, निरास भयी?’ या प्रश्नाचं उत्तरही आहे, ते असं की, ‘जब न किसीने राह दिखायी, अंदर से आवाज ये आयी, हिंमत बांध, संभल, बढ आगे, आस बनेगी नयी, कहो ना आस निरास भयी’. स्टीफननी मनोमन नेमकं हेच ठरवलं आणि पुढची सुमारे पन्नास वर्षे एकेक अवयव संप करत असताना केवळ मेंदूने उदात्त, उत्तम आणि ‘जगावेगळा’ विचार करून शिमा यांच्या प्रेरणेने त्याने संशोधनावर लक्ष केंद्रित केलं. बोलताना, लिहिताना त्रास होऊ लागल्यावर त्याने कॉम्प्युटरची मदत घेतली. अलीकडेच नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले रॉजर पेनरोज यांच्या ‘स्पेसटाइम सिंग्युलॅरिटी’ प्रमेयाने उद्युक्त होऊन स्टीफन यांनी संपूर्ण विश्वासाठी तो सिद्धांत मांडला. त्याशिवाय कृष्णविवराविषयीचं त्यांचं मूलभूत संशोधनही विज्ञान विश्वाने मान्य केलं. ते ‘हॉकिंग रेडिएशन’ म्हणून प्रसिद्ध आहे.

त्यांच्या संशोधनाचा सखोल आढावा घेण्याची ही जागा नव्हे. ज्या परिस्थितीत एका माणसाने केवळ ऑक्टिव्ह मेंदूच्या जोरावर ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’सारखी विज्ञान विचारप्रवर्तक पुस्तकं लिहिली. त्याला लौकिक जगातला आनंद इतरांप्रमाणे घेताच येत नव्हता. विशेष व्हीलचेअरवरून त्यांना न्यावं लागायचं. आपल्याकडचे शास्त्र्ाज्ञ प्रा. चित्रे, प्रा. नारळीकर वगैरेंनी त्यांना केंब्रिजमध्ये उत्साही तरुण आणि व्हीलचेअरला खिळलेला रुग्ण अशा दोन्ही अवस्थांमध्ये पाहिलं होतं. मुंबईत 2001 च्या 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी षण्मुखानंद हॉलमध्ये आम्हीही स्टीफन हॉकिंग यांना पाहिलं. कॉम्युटरच्या सहाय्याने त्यांनी उसन्या आवाजात, पण स्वतःच्या विचारांनी केलेलं भाषण ऐकलं. ते ‘दर्शन’ आज एकवीस वर्षांनंतरही स्फुरण आणि विपत्तींवर मात करून जगण्याची प्रेरणा देतं. स्टीफन हॉकिंग यांच्या संशोधनाइतकीच त्यांची जीवनेच्छा केवळ अद्वितीय म्हणावी लागेल.