खाऊगल्ली- खमंग मसालेदार चिवडा खा!

 

>>संजीव साबडे

 

आपल्या गावातील चिवडा मस्त असं प्रत्येकाला वाटतं. त्या चवीची सवय लागते ना! ‘लेलो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो’ या गाण्याची आठवण व्हावी इतके वेगवेगळे चिवडे. प्रत्येक चिवडय़ातील मसाला वेगळा, चव वेगळी.

मध्य्ंतरी नाशिकला जाणं झालं तेव्हा कोंडाजीचा चिवडा व भेळ भत्ता आणला. अलीकडे मित्राने येताना माधवजीचा बढीया चिवडा व भेळ भत्ता आणला. पुण्याहून चितळे यांचा भाजक्या पोह्यांचा लाईट चिवडा आणला. शिवाय पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा शिल्लक आहे. कच्च्या पोह्यांचा चिवडा आणि कोल्हापुरी भडंग संपलेला नाही. बन्या बापू चित्रपटातील ‘लेलो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो’ या गाण्याची आठवण व्हावी इतके वेगवेगळे चिवडे. प्रत्येक चिवडय़ातील मसाला वेगळा, चव वेगळी. त्यामुळे प्रत्येक चिवडा आवडू लागतो. पूर्वी कुरमुरे, डाळ, शेंगदाणे व वरून तिखट मिठाची फोडणी, आवडीप्रमाणे साखर घालून जो प्रकार करत त्याला फोडणीचे कुरमुरे वा मुरमुरे म्हणत. काही जण त्यात कडीपत्ता, लसूण घालत. कधी सुकवून तळून घेतलेला कांदा. येता जाता मुठीत घेऊन ते खात राहायचं. पोह्यांचा चिवडा दिवाळीत व्हायचा. चिवडा वा फोडणी दिलेले कुरमुरे विकत आणले, असं कधी व्हायचं नाही. आता मात्र चिवडय़ाची मोठी बाजारपेठच तयार झाली आहे.

चिवडा, सुकी भेळ, फोडणीचे कुरमुरे व उपवासाचा चिवडाही अनेकदा विकत आणला जातो. मुंबईची चिवडागल्ली राज्यात प्रसिद्धच. लालबागच्या या गल्लीत चिवडय़ाची जवळपास 30/35 दुकानं आहेत. सर्व प्रकारचा चिवडा इथे वाजवी दरात मिळतो. हा चिवडा बाजार 70 वर्षांपासूनचा. पातळ पोहे, भाजके पोहे, बटाटय़ाचा व साबुदाण्याचा चिवडा, मक्याचा चिवडा, तिखट चिवडा, डाएट चिवडा, गोड चिवडा, तिखट पूड घातलेला, हिरवी मिरचीचा, चाट व वेगवेगळय़ा मसालेवाला असा प्रत्येक जिह्यातून आलेल्याला हवा तसा चिवडा इथे मिळतो. पुण्याचा लक्ष्मीनारायण, तर लालबागचा महालक्ष्मी चिवडा. शिवाय सुकी भेळ, शेव घातलेले व लिंबाचा किंचित आंबटपणा असलेले फोडणीचे कुरमुरे… सर्वकाही इथे मिळतं. इथून घाऊक घेऊन किरकोळ पी करणारे असंख्य चिवडावाले आहेत. दिवाळी व अन्य सणाला इथे भलतीच गर्दी असते.

आपल्या गावातील चिवडा मस्त असं प्रत्येकाला वाटतं. त्या चवीची सवय लागते ना! सर्वाधिक चिवडावाले आहेत नाशिकमध्ये. कोंडाजी वावरे यांच्या चिवडय़ाची चव जवाहरलाल नेहरू यांना खूप आवडली होती आणि काँग्रेसच्या गुजरातच्या अधिवेशनात त्यांनी तो सर्वांना वाटला होता. त्यांच्या चिवडय़ाची चव नेहमीच्या चिवडय़ापेक्षा काहीशी वेगळी, भेळ भत्ताही अतिशय छान. मोरे यांचा माधवजी चिवडा व भेळ भत्ताही चुरचुरीत व कुरकुरीत. इशे यांचा मकाजी चिवडाही या दोघांना टक्कर देणारा आहे. तेही भेळ भत्ता बनवतात. कुरमुरे, भेळ भत्ता म्हणजे सुकी भेळ. तो घरी आणून त्याची ओली भेळ बनवा किंवा त्यात केवळ कांदा व कोथिंबीर घालून खा. भेळवाल्याकडील सुक्या भेळेपेक्षा ही पूर्ण वेगळी आणि खूपच चटपटीत. हे तिघे चिवडावाले बरेच जुने. तिघांचे मसाले वेगळे. सानप बंधूंचा व सावता माळी भेळ भत्ताही जोरात चालतो. नाशिकमध्ये अनेक जण चिवडा धंद्यात उतरले आहेत. कऱहाड चिवडा व भेळ भत्ताही लोकप्रिय होत आहे. शिवाय विविध मसाले बनवणाऱया राम बंधू यांचा नाशिक चिवडाही बाजारात आला आहे. नाशिकमध्ये गेल्यावर मिसळ खायची, येताना द्राक्षे व ताजी फळं व भाज्या आणायच्या, जसं ठरलेलं, तसंच चिवडय़ाचं. कधी हा, कधी तो. हरयाणाच्या रेवाडीतील फेरीवाला अनेक ठिकाणी फिरून पुण्यात आला. त्याने जो चिवडा बनवला त्यात डाळ व शेंगदाणे याशिवाय काजू, बदाम, मनुका, बेदाणे घातले. चिवडय़ाचा तिखटपणा कमी केला. साखर तर त्यात होतीच. रस्त्यावर तो हातगाडीवर चिवडा विकायचा. लक्ष्मीनारायण डेटा यांनी तयार केलेला हा चिवडा जगभर लक्ष्मीनारायण चिवडा म्हणून ओळखला जातो. शिवाय आता लक्ष्मीनारायण नावाने इतर जणही तशा चवीचा व पद्धतीचा चिवडा विकतात. अगदी चितळेंकडेही तसा मिळतो. चितळेंचा लाईट म्हणजे डाएट चिवडाही चांगला आहे.

पुण्याचा ‘खमंग’ तिखट चिवडाही बेस्ट. पुण्यात व अहमदनगरमध्ये भेळ भत्ताही चांगला मिळतो. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात लांबोटी गाव आहे. राज्यात 1972/73 च्या दुष्काळात रोजगाराची कामं स्रू असताना उस्मानाबाद म्हणजे धाराशिवहून आलेल्या एका बाईने चहा-चिवडा विकण्यास सुरुवात केली. तो लांबोटीचा मक्याचा चिवडा आता सर्वत्र लोकप्रिय झालाय. त्यांच्या मुलाने त्याला व्यावसायिक रूप दिलं. त्याच्या जयशंकर

रेस्टॉरंटमध्ये खताळ बाईंमुळे लोकप्रिय झालेला चिवडा मिळतो. लातूरचा आष्टा मोड चिवडाही अतिशय लोकप्रिय आहे. अनेक जण तिथून किलो-दोन किलो चिवडा नेहमीच नेतात. चिवडय़ाप्रमाणे यवतमाळचा बुढीयाचा चिवडाही खूप प्रसिद्ध. रामचंद्र भुजाडे व पत्नी अंजनाबाई रोजगाराच्या शोधासाठी यवतमाळला आल्या. नवऱयाला छोटी नोकरी मिळाली. पण घर चालवण्यासाठी अंजनाबाईंनी भाजक्या पोह्यांचा मस्त खमंग चिवडा बनवून विकायला सुरुवात केली. तिथल्या आझाद मैदानाच्या टपरीवर मिळणारा हा चिवडा लोकप्रिय झाला. त्या बाईंना लोक योतमाड (यवतमाळ) की बुढीया म्हणत. त्या बाई वारल्या. पण चिवडा अद्याप बनतो आणि देशा-परदेशांत मागवला व खाल्ला जातो.

कोल्हापूर-सांगलीला आलात की चिवडय़ाचं भडंग नावाचं एकदम मस्त भावंड तुम्हाला दिसेल. अनेकदा चिवडय़ापेक्षा कुरमुऱयाचे अतिशय चविष्ट व चटपटीत भडंग खावेसे वाटतात. त्यावर कांदा घालणं हा भडंगचा अपमान आहे. वाटल्यास सोबत बारीक चिरलेला कांदा वेगळय़ा बशीत ठेवा. पण कांदा घालून भडंग ओले करून त्याची चव बिघडवू नका. पूर्वी सर्वांना सांगलीचे गोरे बंधू यांचे भडंग प्रसिद्ध होते. पण भोरे, कपाले, अंबा, काटकर यांचे भडंगही उत्तम. कोल्हापूर व सांगलीला जाणारे स्त्राr-पुरुष चपला, कोल्हापुरी साज, भडंग व गुळाची किमान एक किलोची ढेप आणतातच. बाकी पदार्थ राहिले तरी भडंग हमखास आणलं जातं. उपवासाचा बटाटय़ाचा, साबुदाण्याचा चिवडाही सर्वत्र मिळतो. उपवास करणारे व इतरही त्यावर तुटून पडतात. मखाना, मका, लाह्या, पोह्यांचा कांदा-कारल्याचा चिवडा खाणारेही वाढत आहेत. विजापुरी, इंदुरी, राजस्थानी, गुजराती चिवडाही जोरात चालतो. शेव-फरसाण घातलेला नायलॉन पोह्यांच्या व बारीक कुरमुऱयांच्या चिवडय़ाचे फॅन्सही खूप आहेत. फरसाण वेगळं खावं. मिसळीत घालावं. पण चिवडा व भडंग यांची खासीयत बिघडवू नये. बरोबर ना?

z [email protected]