ठसा – सुनंदा तावडे

898

>> स्वप्नील साळसकर

पायी लागती खडे विठोबा, धावत ये रे बा पुढे पुढे’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला’, ‘पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठला आळविता कंठ माझा सुकला’ असा हरिनामाचा जयजयकार करत सिंधुदुर्गातील देवगडमधील शिरगाव येथील 84 वर्षीय आजीबाईंनी आपली माघ पायी वारी 40 वर्षांनंतरही सुरूच ठेवली आहे. पायात ताकद असेपर्यंत विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी आपण चालत पंढरपूर गाठणारच, असा निश्चय विठुरायाच्या निस्सीम भक्त असलेल्या सुनंदा तावडे यांनी केला आहे. भातशेतीची कामे आटोपल्यानंतर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना वेध लागतात ते माघ वारीचे. 15 दिवसांच्या या वारीसाठी मग वारकऱ्यांची लगबग सुरू होते. त्यासाठी नियोजनाची बैठक ठरते आणि वारीचे टप्पेही आखले जातात. अशाच प्रकारे कणकवली ते पंढरपूर माघ वारी गेली अनेक वर्षे सुरू आहे. या पायी वारीत देवगड तालुक्यातील शिरगावमधील सुनंदा तावडे या 84 वर्षीय आजीबाई 1979 सालापासून सहभागी होत आहेत. आपल्या गावातून अशी पायी वारी पंढरपूरकडे जावी यासाठी त्यांनी विठुरायाला साकडेही घातले आणि त्यांची इच्छा पूर्णही झाली. त्यानंतर गेली तीन वर्षे शिरगाव येथून समता माघ वारी निघत आहे. त्यात उत्सुकतेने तावडे आजी सहभागी होतायत. विठुरायाच्या प्रेमापोटी संसाराची जबाबदारी बाजूला ठेवून या वारीला महत्त्व देतात. वडील वारकरी, घरात लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण, पांडुरंगाबद्दल प्रचंड भक्ती यामुळे वडिलांचा हा वारसा मुलीने अविरत चालू ठेवला. यावर्षी तावडे आजी दरवर्षीप्रमाणे समता वारीत दाखल झाल्या, परंतु वैभववाडीपर्यंत गेल्यानतंर त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आणि त्यांची वारी अर्धवट राहते की काय अशी भीती आजींना वाटू लागली. मुलाने तिला उपचारांसाठी परत आणले. मात्र एकीकडे वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान सुरू असतानाच आजीच्या जिवाची सारखी घालमेल सुरू होती. विठुरायाला सारखी विनवणी केली जात होती. अखेर आजीबाईंची हाक विठुरायाने ऐकली आणि मुलाला सांगून त्या पुन्हा अर्ध्या अंतरावर वारीत सहभागी झाल्या. पायात शक्ती असेपर्यंत पायी वारीचा वसा कायम ठेवणार असल्याचे तावडे आजी अगदी विश्वासाने सांगतात. शाळेत न जाताही तावडे आजींना मराठी भाषेचे ज्ञान अगाध  आहे. मराठीतून त्या छान लिहू शकतात. मराठीचे छान वाचन त्या आजही करीत आहेत. लहानपणापासूनच धार्मिक पुस्तके वाचण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. दैनंदिन पूजापाठ, आरती आणि विठ्ठलाविषयी प्रचंड भक्ती त्यांनी आजही सुरूच ठेवली आहे. विठ्ठलभक्तीमुळेच हे आपल्याला सहज शक्य झाले असल्याचे तावडे आजी सांगतात.

शिरगाव येथून 21 जानेवारीला निघालेली ही पायी वारी एकूण 13 टप्पे पार करत पंढरपुरात पोहोचते. 12 दिवस मजल दरमजल करत विठुरायाच्या जयघोषात वारीचे प्रस्थान टप्प्याटप्प्याने सुरू राहते. समता वारी मंडळाकडून सर्वोत्तम साटम यांच्या नेतृत्वाखाली खाण्यापिण्याचे उत्कृष्ट नियोजन केले जाते. अनेक गावांत दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून अन्नदानही केले जाते. पुढे ही वारी पंढरपुरात पोहोचल्यावर सिंधुदुर्गातील कुडाळ, वैभववाडी,  कणकवली, देवगड तालुक्यातील जवळपास दोन ते तीन हजार वैष्णवांचा मेळाच जमतो. सर्वजण एकत्रित नगर प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर पुढील चार दिवस हरिनामाचा गजर, विठुरायाच्या चरणी पूजा, दिवसभर भजन, नामस्मरण असा नित्यक्रम सुरू होतो. सर्वधर्मसमभाव वृत्तीने सर्व सिंधुदुर्गवासीय एकत्र येतात आणि सुरू होते चर्चा ती फक्त माऊलींच्या भक्तीचीच.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट’ या योजनेतून सलग पाचव्या वर्षीही पायी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. दोन रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा घेऊन दोन आरोग्य पथके वारकऱ्यांच्या दिमतीला असून वयोवृद्ध वारकऱ्यांची देखभाल करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या