आभाळमाया – ध्वनिकल्लोळ!

996

ध्वनीचा वेग वेगवेगळय़ा माध्यमात निराळा असतो. हवेत तो सेकंदाला 343 मीटर किंवा तासाला 1235 किलोमीटर इतका होतो. पाण्यात त्यापेक्षा जास्त सेकंदाला 1480 मीटर तर लोखंडासारख्या धातूमध्ये सेकंदाला 5120 मीटर एवढा वाढतो. हिऱयासारखा कठीण रत्नात तर ध्वनिवेग सेकंदाला 12 हजार मीटरवर पोहोचतो.

आपण जो आवाज ऐकतो तो हवेतील ध्वनिवेगावर आधारित असतो. त्यामुळे नित्याच्या व्यवहारातला ध्वनी कमी किंवा जास्त हे त्याच्या हवेतील प्रमाणावरून ठरवलं जातं. एखादी सुपरसॉनिक वस्तू जवळून गेली तर प्रचंड ध्वनिकल्लोळ निर्माण होऊन कानठळय़ा बसतील. एरवीही ध्वनिवर्धनाचा अतिरिक्त वापर झाला तर खिडक्यांची तावदानंही थरथरतात. मग ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडणारे विमान मानवी वस्तीजवळून गेले तर बहिरेपणाच यायचा आणि ते जंगलावरून जाताना प्राणी-पक्षी सैरभैर व्हायचे.

मात्र वेगाची आस वेगाने वाढत चाललेल्या माणसाने आपल्याला न झेपेल असा वेगही यंत्राच्या सहाय्याने निर्माण केला आणि अनेक गोष्टींसाठी त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतला. रॉकेटचा वेग तर अंतराळात जाण्यासाठी सेकंदाला आठ किलोमीटरपेक्षा अधिक असावा लागतो. तो ध्वनीच्या वेगाच्या वीसपट असतो. त्याशिवाय अवकाशात जाताच येणार नाही.

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था म्हणजे ‘नॅशनल एअरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ ऊर्फ ‘नासा’ (किंवा नॅसा) या संस्थेचं नाव जगद्विख्यात आहे. अनेक रॉकेटस्, अंतराळयानं आणि माणसंही ‘नासा’ने आजवर अंतराळात धाडली आहेत, मात्र या संस्थेचं पृथ्वी नावाच्या ग्रहावरही काम चालतंच. आपण अंतराळाचा विचार करतो तेव्हा त्यात आपली पृथ्वी आपसूकच येते.

आता या ‘नासा’ने पृथ्वीवरच्या हवाई प्रवाशांसाठी ध्वनिवेगाने जाणारं एक्स-59 नावाचं विमान उत्पादित करण्याचं ठरवलं आहे. ध्वनिवेगाने उडणारं विमान ही काही नवी गोष्ट नाही. 1969 मध्येच त्यावर चर्चा सुरू झाली. 1903 मध्ये राईट बंधूंनी पहिलं आधुनिक इंजिन असलेलं ‘फ्लायर’ विमान केवळ 59 सेकंद उडवून दाखवलं. त्याने मानवी प्रवासात क्रांती केली. त्यानंतर सहा दशकांतच सुपरसॉनिक म्हणजेच स्वनातीत किंवा ध्वनिवेगाने उडणाऱया विमानाची कल्पना प्रत्यक्षात येण्याइतपत प्रगती झाली. ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून ‘कॉन्कॉर्ड’ विमानं बनवली.

अवघ्या सवातीन तासांत लंडन ते न्यूयॉर्क हे 5767 किलोमीटरचं अंतर ही विमानं पार करत. प्रचंड भाडं असलेलं हे विमान श्रीमंत आणि उद्योजकांच्या सोयीचं होतं. सकाळी लंडनहून न्यूयॉर्कला जाऊन संध्याकाळी घरी परतण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ही मंडळी खूश होती.

या ‘कॉन्कॉर्ड’च्या स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगाचं एवढं कुतूहल त्या काळात होतं की, 2 मार्च 1969 रोजी त्याची ‘टेस्ट फ्लाइट’ यशस्वी झाल्यावर ताशी 2158 किलोमीटर वेगाने उडणाऱया या विमानाबाबत 1971 मध्ये आमच्या कॉलेजच्या इंग्लिश विषयाच्या पुस्तकात एक कौतुकाचा धडाच होता! कारण त्या काळाच्या मानाने ध्वनीपेक्षा जवळजवळ दुप्पट वेगाने जाणारं विमान ही विस्मयकारी गोष्ट होती.

1976 साली 21 जानेवारीला कॉन्कॉर्ड रीतसर प्रवासी सेवेत दाखल झालं. त्याचा हा सुखद प्रवास पाव शतक अगदी उत्तम चालला. 25 जुलै 2000 रोजी मात्र पॅरिस ते न्यूयॉर्क फ्लाइटला फ्रान्समध्ये भीषण अपघात होऊन शंभराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर 2003 मध्ये ‘कॉन्कॉर्ड’ हवाई सेवा आवरती घेण्यात आली.
समुद्रात हवाई-पट्टी असलेल्या शहरात हे गरुडाच्या चोचीसारखं ‘नाक’ असलेलं वेगवान विमान उडत होतं पण त्याच्या भयंकर आवाजामुळे ते मध्य वस्तीतल्या विमानतळांवरून उडवणं कठीण झालं. शेवटी त्याचं उड्डाणच थांबलं.

आता ध्वनीच्याच वेगानं, पण ध्वनिकल्लोळ वजा करून शांतपणे उडणारं नासाचं एक्स-59 या वर्षी अवकाशात अवतलं तर हवाई प्रवाशांना मोठाच दिलासा मिळेल. एक्स-59 चा वेग कॉन्कॉर्डइतका नसला तरी ताशी 1754 किलोमीटर एवढा असेल. त्यामुळे ते लंडन-न्यूयॉर्क अंतर पाच-सहा तासांत पार करील. भूपृष्ठापासून 55 हजार फूट उंचीवरून ते उडणार असल्याने आवाजाचं प्रदूषण होणार नाही. मुळात ते फक्त कारचा दरवाजा बंद करताना होतो तेवढाच आवाज करील असं त्याचे निर्माते म्हणतात.

विमानाचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. कोणत्याही संशोधनाचा फायदा-तोटा ते वापरणाऱयांच्या वृत्तीवर अवलंबून असतो. ध्वनिवर्धकाचा आवाजही किती असावा ते माणसंच ठरवतात. एखाद्या संशोधातील त्रुटी कळल्या की, अधिक संशोधन करून त्या दूर करता येतात. त्यामुळे नित्यनव्या संशेधनाला वाव मिळतो. विज्ञान काही निर्माण करते आणि त्यातील त्रुटी तेच दुरुस्त करते ही सततची प्रक्रिया, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन. त्यामुळेच कर्कश आवाज करणाऱया कॉन्कॉर्डपासून क्वाएट सुपरसैनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘क्वाएट’ म्हणजे ‘ध्वनीविरहित’ ‘गप्प’, पण वेगवान उड्डाण होत असेल तर ते हवाई प्रवासातलं मोठं यश म्हणता येईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या