लेख – स्वातंत्र्यवीरांचे पुण्यस्मरण

496

>> विलास पंढरी

सावरकरांना ‘वीर’ का म्हटलं जातं हे हे समजण्यासाठी ते अंदमानला काळय़ा पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी जात असताना सावरकरांनी त्यांच्या पत्नींचा निरोप घेताना जो संवाद घडला तो पाहायला हवा. क्रूर काळही तेव्हा सावरकरांसमोर नतमस्तक झाला असेल. किती ताकद, प्रेम आणि आत्मविश्वास आहे या निरोप देण्यात? आणि काही लोक आजही त्यांच्या राजकीय फायद्यासाठी सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ मानायला तयार नाहीत. स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणाऱया विद्यमान केंद्र सरकारला सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यायला मुहूर्त का मिळत नाही हे मात्र अनाकलनीय आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 54 वी पुण्यतिथी. कर्तृत्व मोठे असूनही एखाद्या महात्म्याला हयात असताना त्रास सहन करावा लागतो. पण बहुधा मृत्यूनंतर त्याची महानता लक्षात येऊन त्याला मान्यता मिळते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्तृत्वाला हयात असताना तर दाद मिळाली नाहीच, पण मृत्यूनंतरही त्यांची बदनामी काही थांबत नाही. सावरकरांनी जीवनभर मृत्यूशी संघर्ष केला. वयाच्या 82 व्या वर्षी प्रायोपवेशन किंवा जैन धर्मातील संथारा व्रताप्रमाणे औषध, पाणी बंद करीत या शूरवीराने जगाचा निरोप घेतला तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1966.

त्यांनी जीवनातल्या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आपल्या ‘हे स्वतंत्रते भगवती’ या स्फूर्तिप्रद कवितेत म्हटलेले आहे, ‘तुजसाठी मरण तें जनन, तुजवीण जनन तें मरण’. असेच जीवन सावरकर जगले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला त्यांचे हिंदुत्व, विज्ञाननिष्ठा खरी ठरलेली भाकिते, त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी केलेले कार्य, काळय़ा पाण्याची शिक्षा, मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी, भाषाप्रभुता, कवी सावरकर, सावरकर आणि गांधीजी, सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर आणि नेहरू असे असंख्य पैलू आहेत.

सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी प्रसिद्ध लेखक व पत्रकार आचार्य ऊर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे. चार वर्षांपूर्वी राजस्थानमधील भाजप सरकारच्या काळात पाठय़पुस्तकांमधून विनायक दामोदर सावरकर यांचा उल्लेख ‘वीर’, ‘महान देशभक्त’ आणि ‘क्रांतिकारी’ असा केला होता. तेथील सध्याच्या काँग्रेस सरकारने ‘वीर’ शब्द वगळून सावरकरांनी जेलमधील त्रासाला कंटाळून ब्रिटिश सरकारकडे माफी मागितली होती, असा उल्लेख केला आहे. तसंच ते गांधीहत्येच्या कटातही सहभागी होते, असेही म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींनीही कारण नसताना सावरकरांवर माफीवीर म्हणत टीका करून सावरकरप्रेमींचा रोष ओढवून घेतला. त्यावर टीकाकारांनी योग्य उत्तर दिले आहे. वास्तविक सावरकरांची ती शरणागती नव्हती. माफीनामादेखील नव्हता. देशकार्यासाठी ती एक तात्पुरती व्यवस्था होती.

सैन्यातील जवान डय़ुटीवर जाताना आपल्या पत्नीचा निरोप घेतानाचे दृश्य आपण चित्रपटात, वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांतून पाहतो. सावरकरांना ‘वीर’ का म्हटलं जातं हे हे समजण्यासाठी ते अंदमानला काळय़ा पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी जात असताना सावरकरांनी त्यांच्या पत्नींचा निरोप घेताना जो संवाद घडला तो पाहायला हवा. क्रूर काळही तेव्हा सावरकरांसमोर नतमस्तक झाला असेल.

पुन्हा भेटण्याची शक्यता नाही अशा परिस्थितीतील नवरा तुरुंगाच्या आतील बाजूस उभा आहे आणि दाराच्या अलीकडे एक सव्वीस वर्षांची वीर पत्नी उभी आहे. नुकताच मुलगा देवाघरी गेल्याने दुःखात बुडालेले हे दांपत्य या दुःखद प्रसंगी काय बोलले असतील? सावरकर त्यांच्या पत्नीस माई म्हणून हाक मारीत असत. ते त्यांना म्हणाले, ‘‘माई, काडय़ा-काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरटय़ात अंडी उबवायची, पिलं वाढवायची याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे, चिमण्याही करतात. आपल्या घरटय़ापुरता संसार कोणालाही करता येतो, आम्हाला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाही. वर ज्वारीचं कणीस उभं रहावं, असं जर वाटत असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतंच. तो शेतात, मातीत मिसळतो तेव्हा कणीस येतं पुढचं धान्य येतं. माई, कल्पना करा की, आपण आपल्या हातानं आपली चूल, भांडीकुंडी फोडून टाकली, आपल्या घराला आग लावली तर उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर येताना पाहायचा असेल तर आपण आपल्या घराचा धूर नको का करायला? वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिलाय की, हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं?’’
‘‘पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर हा शेवटचा निरोप.’’

असे म्हटल्यानंतर त्यावेळी केवळ सव्वीस वर्षांच्या असलेल्या माईंनी सावरकरांच्या पायाला स्पर्श केला. ती धूळ आपल्या मस्तकी लावली. त्यावर सावरकरांनी त्यांना ‘माई काय करताय हे?’ असे म्हणून हटकले. अर्थात माईंनीसुद्धा वीर पत्नीला शोभेल असे उत्तर दिले. ‘‘हे पाय बघून ठेवते. पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या कुटुंबाचे संसार करणारे खूप पाहिलेत. पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला याचा मला अभिमान आहे. तुम्ही जर सत्यवान असाल तर मीही सावित्री आहे, माझ्या तपश्चर्येने यमापासून तुम्हाला मी परत आणीन.’’ किती ताकद, प्रेम आणि आत्मविश्वास आहे या निरोप देण्यात? आणि काही लोक आजही त्यांच्या राजकीय फायद्यासाठी सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ मानायला तयार नाहीत. स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणाऱया विद्यमान केंद्र सरकारला सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यायला मुहूर्त का मिळत नाही हे मात्र अनाकलनीय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या