
>> प्रा. महेंद्र विनायक देसाई
शतकानुशतके हिंदुस्थानींच्या मनावर हिंदुस्थानी अभिजात संगीताचे अलौकिक संस्कार झाल्यामुळे इथल्या प्रतिभाशाली संगीतोपासकांच्या कर्तृत्वाला तेजःपूंज असे सामर्थ्य लाभले आहे. त्यामुळे किती तरी संगीतसूर्य उदयाला आले, अलौकिक होऊन तळपले आणि आपल्या दिव्य व्यासंगाची अमूल्य अशी पुंजी भावी पिढय़ांसाठी अबाधित ठेवून अंतर्धान पावले. त्यांच्या एकंदरीत प्रतिभेचे संचित अगणित भांडारामध्ये संग्रहित असल्यामुळे भविष्यात संगीतोपासना करण्याकडे कल असणाऱया कलासक्त साधकांसाठी ‘किती घेशील दो कराने’ असा संभ्रम व्हावा इतका विपूल असा हा चिरंतन स्वरूपाचा साठा आहे. या संगीत ऐश्वर्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच आपल्या अंगभूत असलेल्या संगीत प्रतिभेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी बाह्य अलिप्तता, मानसिक तटस्थता, एकाग्रता वगैरे उच्चत्तम गुणविशेषांची कास धरणे क्रमःप्राप्त आहे. असे गुणविशेष असणारे साधक म्हणजे संगीताचार्य डॉ. सचिन दिलीप कचोटे सर. संगीत कलेला खऱया अर्थाने वाहून घेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता असे मानणारे, अगदी विनयशील आणि नम्र असे व्यक्तिमत्त्व. मागे मार्च महिन्यात संगीतविषयक उपक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी माझे परमस्नेही तबला अलंकार आणि कचोटे सरांचे शिष्योत्तम दयानंद मणेरीकर यांच्या समवेत कुडाळला गेलो असता, तबलानवाज दिलीप कचोटे सरांची प्रत्यक्ष भेट झाली. आयोजकांद्वारे त्यांचा परिचय करण्यात आला तेव्हा त्यांच्यापाशी असलेल्या अनेकविध पदव्या, त्यांचे अत्युच्य कार्य, त्यांना मिळालेले शेकडो पुरस्कार, मानमरातब, अनुभवांची समृद्ध शिदोरी वगैरे ऐकून आम्ही थक्क झालो. इतकं सगळं असूनही अगदी लीन होऊन ते उपस्थितांचे अभिवादन स्वीकारत होते. ‘विद्या विनयेन शोभते’ या उक्तीचा मूर्तिमंत दाखला मी अनुभवत होतो आणि त्यामुळेच त्यांच्याविषयीचा मनातील आदर द्विगुणीत झाला.
अवघ्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी तबलावादनातील ‘संगीताचार्य’ आणि ‘पीएच.डी.’ मिळविणारे सचिन कचोटे सर करवीर क्षेत्रातील एक उत्कृष्ट तबलावादक, संगीतविषयक सर्वंकश ज्ञान असलेले एक श्रेष्ठतम गुरू म्हणून नावारूपाला आले आहेत. गरीब अन् मागासलेल्या समाजात तसेच आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या कुटुंबात जन्मलेले, अनेक प्रतिकूल प्रसंगांना तोंड देत तबलावादनाची कलात्मक विद्या ध्येयासक्त तसेच कष्ट उपसण्याची तयारी ठेवल्यामुळेच प्राप्त करणे त्यांना शक्य झाले. त्यांच्या विद्यार्थीदशेत या विद्येतील कलेचे उच्च कोटीचे ज्ञान आणि अमूल्य असे संस्कार पं. गोविंद माजगावकर, पं. अमोल दंडगे, पं. अरविंद मूळगावकर, आनंद माजगावकर, डॉ. अजय अष्टपुत्रे वगैरे संस्कारक्षम गुरूवर्य लाभल्यामुळे आणि सद्गुरू कैवल्यानंद स्वामींच्या अनुग्रहामुळे शक्य झाल्याची कबुली कचोटे सर देतात. शिवाय आई-वडिलांचा वरदहस्त निरंतर लाभल्यामुळे या सांगीतिक प्रवासात उत्तरोत्तर प्रगती करत यशाची उच्चत्तम शिखरे पादाक्रांत करणे शक्य झाल्याची ग्वाही कचोटे देतात. तबला विशारद सर्वप्रथम, तबला अलंकार अखिल भारतीय स्तरावर द्वितीय, गायन हार्मोनियम विशारद, तबला एम. ए. विद्यापीठात सर्वप्रथम, यूजीसी एनईटी तबला उत्तीर्ण, पीईटी तबला उत्तीर्ण, सांगली एआयआरचे बी हायग्रेड तबला आर्टिस्ट, ‘संगीताचार्य’ अखिल भारतीय गांधर्व मंडळ- मुंबई आणि शैक्षणिक आलेखाचा कळस म्हणजे द सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय- बडोदा यांच्या वतीने सैद्धांतिक तसेच क्रियात्मक स्तरावर तबल्याचा रियाज-एक अध्ययन अशा प्रायोगिक आणि शास्त्र्ााrय पैलू असणाऱया क्लीष्ट विषयाच्या संशोधनासाठी अखेर पीएच.डी.ची गौरवपूर्ण पदवी देऊन त्यांना अलंकृत केले. त्यांचे संशोधनाचे मौलिक कार्य अजून चालू आहे. विविध घराण्यातील तबल्याच्या बंदिशी विषयीचा सखोल अभ्यास तसेच तबल्याच्या विस्तारशील बंदिशी (पेशकार, कायदा, रेले) या पैलूवर अधिक प्रकाश घालण्यासाठी संशोधनाचे कार्य अविरत चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. अध्ययनाव्यतिरिक्त अध्यापनाचे कार्य चालू ठेवताना इतर राज्यातील विद्यार्थ्यांना तबलावादनाचे मौलिक मार्गदर्शन करण्यास त्यांना आनंद वाटतो.
शिवाजी विद्यापीठाचे व्हिजिटिंग व्याख्याते तसेच किती तरी सरकारी तसेच निमसरकारी संस्थांसाठी तबला विषयाचे तज्ञ म्हणून त्यांना वेळोवेळी पाचारण करण्यात आले आहे. कलागुणांव्यतिरिक्त त्यांच्यामधील मानवतावादी दृष्टिकोन विशेष वाखाणण्याजोगा आहे. जीवनासाठी कला असे मानताना कलेसाठी जीवन असल्याकडे त्यांचा कल असल्याचे जाणवते. खरं म्हणजे असे कलासक्त जीवन व्यतीत करणाऱया या तबलानवाजांना सरकारी दरबारी त्यांच्या बेजोड कामगिरीची दखल घेऊन यथोचित सन्मान केला जावा असे मनोमन वाटते.

























































