ताडासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीए अभिजित कुळकर्णी

सकाळी गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्या शरीरातील स्नायू एकाच अवस्थेत आठ तास असल्यामुळे थोडे ताठरलेले असतात. हा ताठरपणा जाण्यासाठी आपण सहजगत्या आपल्या शरीराला आळोखे-पिळोखे देतो, शरीर थोडे ताणतो आणि त्यानंतर एका कुशीवर वळून आपण उठून बसतो आणि नंतर आपल्या दैनंदिन कार्यक्रमांना सुरुवात करतो. ही क्रिया आपण अनेक वेळा नकळत आणि नैसर्गिकपणे करतो. हीच क्रिया आपण शास्त्रशुद्ध रीतीने श्वासोच्छ्वासाच्या तालावर केली तर ते होते ‘ताडासन’ किंवा ‘तालासन.’

आसनाचे लाभ
आसन दिसायला आणि करायला अतिशय सहजसोपे आहे, परंतु एकच आसन व्यवस्थित रीतीने केले तर आपल्या शरीरातील सर्व नसा खेचल्या जातात. पायाच्या अंगठय़ापासून हाताच्या बोटांपर्यंतचे सर्व स्नायू आणि अवयव खेचले जातात. या आसनामध्ये आपल्या पायांचे तळवे, पायाचे स्नायू, मांडय़ा पोटाच्या बगलेचे स्नायू, काखा आणि आपल्या भुजा ताणल्या जातात. त्यामुळे शरीरामध्ये रुधिराभिसरण उत्तम प्रकारे सुरू होते, आळस निघून जातो, शरीर उत्साहाने भरते. शरीराच्या स्नायूंमधील ताठरपणा कमी होत झाल्याने शरीर बाकीच्या आसनांसाठी तयार होते. लहान मुलांना त्यांची उंची वाढवण्यास मदत होते. शरीराचे संतुलन साधण्याचा अभ्यास होतो. मनावरील ताण कमी होतो.

स्थिरसुखमासनं
आसनाची स्थिरसुखमासनं ही व्याख्या पतंजली ऋषींनी केलेली आहे. या व्याख्येमध्ये सहजगत्या आणि चपखलपणे बसणारे हे आसन आहे. आपल्या शरीराची ती सहज प्रवृत्ती असल्यामुळे हे आसन आबालवृद्ध करू शकतात. ज्यांना गुडघेदुखी आहे अथवा कंबरदुखी किंवा मानदुखी आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे ते लोकही हे आसन करू शकतात.

आसनाचा विधी
सर्वप्रथम एका जागी स्थिर उभे रहा. पाय जुळवून ठेवा आणि त्यानंतर सावकाशपणे आपले शरीर आपल्या पायाच्या बोटांवर वर उचलत न्या. शरीराबरोबरच आपले हातही सावकाशपणे वर उचला. शरीर वर उचलल्यानंतर हातही डोक्याच्या वर नेऊन जुळवून ठेवा. अशा प्रकारे शरीर खेचा. थोडा वेळ (30 ते 40 क्षण) आसनात स्थिर रहावे. संतुलन होत नसल्यास पावलांमध्ये अंतर थोडे वाढवावे.

अशा प्रकारे शरीर खेचून ठेवले तर आपोआप उच्छ्वास होतो. थोडा वेळ श्वास बाहेरच रोखून ठेवावा. त्यानंतर सावकाशपणे भरपूर श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना सावकाशपणे आसनही सोडून द्यावे. या आसनाला ‘ताडासन’, ‘तालासन’ किंवा ‘उत्थित ताडासन’ असे म्हणतात.

योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in