ठसा – ह.भ.प. ताजुद्दीन शेख महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी जीवन समर्पित करणाऱया कीर्तनकार ह.भ.प. ताजुद्दीन शेख महाराजांचा मृत्यू कीर्तन सुरू असतानाच व्हावा, हा तर दैवदुर्विलासच समजले पाहिजे. त्यांच्या अशा या अकल्पित जाण्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दुवाच निखळला आहे. वारकरी संप्रदायातील संत वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वदूर पसरविला. ते मुस्लिम समाजात जन्माला आले तरी कीर्तनासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पोहचवले.

ऐसा पुण्याचा संचय,
टाळ चिपळय़ांचा गजर…
हरिभक्तीच्या कल्लोळात व्हावे
हरी चरणी लीन…

अशी इच्छा त्यांनी भगवंताकडे केली होती आणि भगवंतानेही त्यास प्रतिसाद दिला. धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील जामदे या गावी त्यांचे कीर्तन सुरू होते. हरिनामाचा गजर करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येतो काय अन् महाराजांचेही अशाच भक्तिमय वातावरणात वैकुंठागमन होते काय. नियतीच्या मनात काय असते, नियती कधी काय करेल, याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही, असेच खरे. हृदयविकाराचा झटका आल्यावर महाराज कोसळले. कीर्तनाचे भक्तिमय वातावरण क्षणार्धात बदलून गेले. भक्ताच्या मांडीवरच त्यांनी आपला देह ठेवला. सगळा प्रसंगच मन गलबलून आणणारा. त्यांच्यावर जालना जिह्यात घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेख ताजुद्दीन नुरामत शेख महाराज यांचा जन्म 1966 साली जालना जिह्यात, घनसावंगी तालुक्यात बोधलापुरी येथे झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. सांप्रदायिक शिक्षण पंचक्रोशीतील गावात आणि नंतर आळंदी येथे झाले. गुरू म्हणून त्यांना प. पू. रामानंद स्वामी सरस्वती, तुकाबाबा लाभले. महाराजांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी त्यांनी तो धर्म स्वीकारला नाही तर त्यांनी हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायास प्राधान्य दिले. शाळेत असल्याच्या काळापासूनच त्यांना या सांप्रदायाची आवड निर्माण झाली होती. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच ते स्वतंत्र राहू लागले आणि वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी कीर्तन सेवेस प्रारंभ केला आणि वयाच्या छपन्नाव्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.

ज्या गावी हरिनाम सप्ताह होत नसत, तिथे महाराजांनी हरिनाम सप्ताह केले, कीर्तने रंगविली. मिळणाऱया मानधनातून आलेल्या रकमेचा विनियोग त्यांनी समाजसेवेसाठीच केला. गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला. ज्या-ज्या ठिकाणी जातीय संघर्ष भडकला तिथे जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. सामाजिक एकोपा त्यांनी साधला. एवढेच नाही, कारागृहातील कैदी बांधवांसाठी संतविचारांच्या सकारात्मक विचारातून त्यांच्या बंदिस्त जीवनात अध्यात्माचा आनंद निर्माण केला. जन्मभूमी असलेल्या बोधलापुरी येथे तर स्वखर्चातून साईबाबांच्या मंदिराची व आश्रमाची निर्मिती केली. कीर्तनसेवेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर तर त्यांनी प्रवास केलाच, पण त्याचसोबत गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांत समाजप्रबोधन व जनजागृती मोठय़ा प्रमाणात केली. ताजुद्दीन बाबांनी आयुष्यभर भागवत धर्माची पताका अंगावर घेऊन आपले जीवन समर्पित केले. खडा आवाज आणि रसाळ वाणीतून ज्ञानेश्वरी, गाथेतील दृष्टांत ओघवत्या शैलीतून भक्तांसमोर मांडले. रसाळ भाषा आणि ओघवती शैली ही त्यांच्या कीर्तन शैलीचा महत्त्वाचा गुणविशेष सांगता येईल.

अन्तकालेच मामेव स्मरण
मुक्ता कलेवरम् !

या संतोक्तीप्रमाणेच त्यांनी आपला देहही कीर्तन समाप्तीनंतर ठेवला. यासंदर्भात पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. विठ्ठल शास्त्री चनघटे म्हणतात, ‘वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ताजुद्दीन बाबांचे कार्य अलौकिक असेच होते. बालपणापासून भक्ती मार्गाची आवड असलेल्या महाराजांनी अखेरचा श्वासही पवित्र कीर्तनातूनच घेतला हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असते.’ ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांच्या नावातूनच सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रत्यय आपल्याला दिसतो.