
महेंद्र पाटील
या सृष्टीतली एक नितांत सुंदर गोष्ट म्हणजे फुलं. मग ती कोणतीही असोत. फुलांना पाहिलं की, मन प्रफुल्लित होतं. प्रत्येकाचं रूप वेगळं, रंग वेगळा आणि प्रत्येकाचा सुगंधसुद्धा वेगळा. असं वेगळय़ा प्रकारे स्वतचं अस्तित्व जपत या निसर्गाला शोभा आणणारी अनेक फुलं रानावनांत असतात. तसंच या फुलांकडे पाहून मनातल्या मनात आनंदी होणारे हसरे फुलांसारखे गोड चेहरेसुद्धा असतात.
फुले जितकी सुंदर तितकी त्यांची आवड प्रत्येकाच्या मनात असते. तसंच चेहरा जितका सुंदर, तितकाच तो आवडीचा असतो, पण यामुळे नुकसान दोघांचं होतं. कारण या जगात फुलांनी कसं जगायचं? हा मोठा प्रश्न आहे. फुलांची नजाकत ओळखणारी, त्यांना जपणारी, त्यांचा मंद दरवळ मनात साठवून आनंदी होणारी माणसंच उरली नाहीत. आता एखादं फूल आवडलं की, त्याला मिळवायचं, तेही वाट्टेल तसं, हिसकावून. मग त्या झाडाला, पानाफुलांना जखमा झाल्या तरी हरकत नाही अशा वृत्तीची माणसं आहेत. खरं तर त्या फुलांना स्पर्श करायचीही लायकी नसते त्यांची. तरीही त्यांना ती फुलं हवी असतात, पण काटे मात्र नको असतात. याला फुलावरचं प्रेम नाही म्हणत. याला म्हणतात फक्त स्वार्थ. अरे, फुलांवर प्रेम करणाऱयाने आधी काटय़ांवर प्रेम करायला शिकावं. ते जमत नसेल तर सोडून द्यावा विचार त्या फुलांचा. कारण असं वागून त्यांच्या मनाला फक्त त्रास होईल आणि ती फुलं कोमेजून जातील.
या अशा क्षणिक सुखासाठी आपण का असं वागायचं? हा विचार करायला शिका. कारण हीच गत सुंदर, निरागस चेहऱयाची होते. सुंदर असतो म्हणून तो चेहरा आपल्याला आवडतो आणि मनात घर करू लागतो. दिवसरात्र त्याच विचारात असतो आणि त्या चेहऱयाच्या मनात आपणही घर करावं असं वाटू लागतं, पण एक गोष्ट मनात नसते ती म्हणजे आपल्याला आवडणारा चेहरा आपल्या आधीच कुणाच्या तरी मनात ठसलेला असेल आणि त्या चेहऱयालाही तेच मन हवे असेल तर?
अशा वेळी उगीच आपण का वेडा हट्ट करायचा? त्या फुलांसारख्या चेहऱयाला आणि त्याच्या कोमल मनाला आपण काटय़ांसारखं बोचू लागतो आणि त्यामुळे नकळतपणे होणारा त्रास, जिवाची घालमेल, घुसमट अशा सगळय़ा भावना जागृत होऊन मनाला वेडं करून जातात आणि तेच वेडं मन त्या चेहऱयाला काटेरी वाटू लागतं. त्यामुळे असे चेहरे आपल्यापासून दुरावतात आणि अशी फुलंसुद्धा कोमेजतात. कधीतरी विचार करून स्वतला फुलांच्या जागी ठेवून पहा. मग कळेल तो त्रास, त्या वेदना, स्वतच्या अस्तित्वाची धडपड आणि भवतालचं काटेरी कुंपण आणि त्या कुंपणातून दिसणारं जग. त्यालाही आपल्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना, म्हणून ते उमलतं, फुलतं आणि सुगंधी करून जातं साऱया आसमंताला. आपण त्याला काय देतो? फक्त दुःख. आता तरी शहाणे व्हा. खरंच मनातून विचार काढून टाका त्या नाजूक फुलांचा, ज्यांना आपण विनाकारण हिसकावून घेतो. निष्पाप, निरागस चेहरे, जे आपले होणार नाहीत हे माहीत असूनही त्यांच्यामागे धावत राहायचं… वेडय़ासारखं. काहीच अर्थ नसतो अशा धावण्याला आणि त्या फुलांचे काटे टोचून घेण्याला. त्यांना घेऊन जाणारा जो असेल त्याचाच अधिकार आहे तो आणि त्या चेहऱयाला आपलं मन नाही आवडलं तरी तो वाईट म्हणेल. इतका त्रास देण्यापेक्षा राहू द्यावं तसंच. नाहीतर फुलं कायमची रुसतील तुमच्यावर आणि चेहरेसुद्धा!




























































