
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
तालिबानची राजवट अफगाणिस्तानमध्ये आल्यापासून एक मुद्दा पुढे येत आहे, तो म्हणजे येणाऱया काळात तालिबान हिंदुस्थानला त्रास देऊ शकते का? पाकिस्तान तालिबानी दहशतवादी कश्मीरमध्ये पाठवून पुन्हा एकदा दहशतवाद पुनर्जीवित करेल का? कडव्या तालिबान्यांशी लढण्याकरिता हिंदुस्थान सज्ज आहे का? आतापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानने कडव्या तालिबानी दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळा हिंदुस्थानी सैन्याने त्यांचा नायनाट केला. जे जगातल्या महाशक्तींना जमले नाही ते हिंदुस्थानी सैन्याने वेळोवेळी केलेले आहे.
अनेकांना वाटायला लागले आहे की, तालिबानी लढवय्यांची उंची दहा फूट आहे. ते सुपरमॅन आहेत आणि जगातल्या कुठल्याही सैन्याला हे हरवू शकतात. अमेरिकन सैन्य त्यांच्याशी वीस वर्षे लढत होते, पण अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य फक्त हवेतून लढले. त्यांनी विमान, ड्रोनचा वापर करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने अफगाणिस्तानला आधुनिक शस्त्रांची आणि तंत्रज्ञानाची एक प्रयोगशाळा बनवली होती. वेगवेगळी नवी शस्त्रs यांचं इथे वापर करण्यात आला. मात्र त्यांची जमिनीवर लढण्याची हिंमत नव्हती. युद्ध सैनिक लढून जिंकतात. ते अमेरिकेने केले नाही.
कश्मीरमध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्याकरिता पाकिस्तान तालिबानी हिंदुस्थानात पाठवेल. हिंदुस्थानी सैन्य त्यांच्याकरिता तयार आहे का? थोडक्यात उत्तर आहे, हो. हिंदुस्थानी सैन्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या कडव्या पठाण/ पख्तुनी लढवय्यांशी लढाईची सवय आहे. त्यांनी पठाण दहशतवाद्यांना अनेक वेळा हरवले आहे.
1947 चे पाकिस्तानबरोबरचे युद्ध एक वर्ष चालले. यामध्ये पाकिस्तानने पंचवीस ते तीस हजार टोळीवाले म्हणजेच पख्तुनी/ पठाण यांचा वापर करून कश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. एक वर्ष चाललेल्या या युद्धात हिंदुस्थानी सैन्याच्या पंधरा ते वीस हजार म्हणजे एक ते दोन डिव्हिजन सैन्याने त्यांचा पराभव केला. पठाणांचा पाठलाग करत हिंदुस्थानी सैन्य सध्याच्या पीओकेमध्ये पोहोचले होते, परंतु नंतर युद्धविराम करण्यात आला.
1500 हिंदुस्थानी सैनिकांचे रक्त सांडून आपण पख्तुनी/ पठाणांचा पराभव केला. 1965 च्या युद्धामध्ये पख्तुनी पठाणांचा पुन्हा पराभव 1965 च्या युद्धामध्ये युद्ध सुरू व्हायच्या काही महिने आधी पाकिस्तानने सुरू केले ‘ऑपरेशन जिब्राल्टर.’ यामध्ये पुन्हा पख्तुनी/ पठाणी/ टोळीवाल्यांचा वापर करून पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध छुपे युद्ध सुरू केले. पंचवीस ते तीस हजार कडवे लढवय्ये जनरल हुसेन यांच्या नेतृत्वाखाली कश्मीरमध्ये घुसले. त्यांना दहा वेगवेगळ्या फॉर्सेसमध्ये वाटले गेले होते. प्रत्येक फोर्सेमध्ये चार ते सहा कंपनी संख्या होती. एका कंपनीमध्ये 100 ते 120 लढवय्ये होते, परंतु हिंदुस्थानी सैन्याने त्यांचा पुन्हा एकदा पराभव केला. अनेकांना मारण्यात आले, पकडण्यात आले. अर्थात पुन्हा हिंदुस्थानी सैन्याला रक्त सांडावे लागले. युद्धामध्ये पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते फिल्ड मार्शल आयुब खान जे स्वतः एक पठाण होते. 1965च्या युद्धामध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला आणि आयुब खान यांना आपल्याशी ताश्कंद येथे शांतता करार करावा लागला होता.
1971च्या युद्धाचे सर्वात प्रसिद्ध आठवण आहे, पाकिस्तानी सैन्याचे ईस्ट पाकिस्तानमधले प्रमुख लेफ्टनंट जनरल नियाजी यांचा हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्यासमोर पराभव करारावरती सही करतानाचा फोटो. जनरल नियाझी हे एक पठाण होते. सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान माजी क्रिकेटपटू इम्रान खानसुद्धा पठाण आहेत.
तालिबान हिंदुस्थानमध्ये येईल का?
हा झाला इतिहास, पण सध्याची परिस्थिती काय आहे? तालिबान हिंदुस्थानमध्ये येईल का? पुढचे काही महिने तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता मजबूत करण्यामध्ये वेळ घालवेल? एका लढवय्या जमातीपासून देशाचा राज्यकारभार चालवणे याला वेळ लागतो. त्याच्यानंतर ते अमेरिकेच्या बाजूने लढलेल्या आणि तालिबानच्या विरोधी लढलेल्या अफगाणिस्तानच्या नागरिकांना मारतील. त्यांना आपली आर्थिक व्यवस्था ठीक करावी लागेल. सध्या तालिबान म्हणते आहे की, आम्ही कश्मीरमध्ये हस्तक्षेप करणार नाही, परंतु पाकिस्तानचे तालिबानवर पूर्ण नियंत्रण आहे. पाकिस्तान तालिबानच्या कडव्या दहशतवाद्यांना नक्कीच कश्मीर खोऱयामध्ये घुसवून दहशतवादाला पुनर्जीवित करेल.
आधी पाकिस्तानमधून जाणारे दहशतवादी 90 टक्के पठाण असायचे. यांनीच अनेक महाशक्तींचा पराभव केला होता, परंतु सध्या पाकिस्तानमधले पख्तुनी स्वतंत्र राज्याची आणि देशाची मागणी करत आहे. ते दहशतवादी बनायला तयार नाहीत. याशिवाय बलुचिस्तान, सिंध, पीओके, पाकिस्तानी पंजाबमधून कोणी दहशतवादी बनून कश्मीरमध्ये जायला तयार नाही. पाकिस्तानला दहशतवाद्यांची संख्या कमी पडत आहे. म्हणूनच पाकिस्तान केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून तालिबानला अनेक कडव्या दहशतवाद्यांना कश्मीरमध्ये घुसवण्यास भाग पाडेल. पाकिस्तानला नंबर एक शत्रू हिंदुस्थानचा पराभव करून कश्मीरला पाकिस्तानमध्ये विलीन करायचे आहे. म्हणून तालिबानी दहशतवादी हिंदुस्थानात येतील.
हिंदुस्थानी सैन्याला कश्मीरच्या एलओसीवरती दहशतवादी घुसखोरी थांबवण्यात 90 ते 95 टक्के यश मिळते, मात्र हिंदुस्थानच्या इतर सीमा खास तर हिंदुस्थान-नेपाळ सीमा, हिंदुस्थान-पाकिस्तान, समुद्री सीमांवर अर्धसैनिक दलाने घुसखोरी थांबवणे गरजेचे आहे.
युद्धामध्ये दोन घटक असतात. एक असते सैनिकांची शस्त्रs आणि दुसरे शस्त्र वापरणारे सैनिक. अमेरिका आणि अफगाणी हरले. कारण त्यांची शस्त्रs अत्याधुनिक होती, परंतु ते वापरणारे सैनिक हे लढायला तयार नव्हते. हिंदुस्थानचे त्याच्या विरुद्ध आहे. आपली शस्त्रे आधुनिक नसतील, परंतु सैनिक आणि तरुण अधिकारी कश्मीरचे रक्षण तालिबानपासून करण्याकरिता नक्कीच समर्थ आहे. मात्र महत्त्वाचे आहे की सगळे राजकीय पक्ष, देशाचे वेगवेगळे घटक आणि जनतेने हिंदुस्थानी सैन्याच्या मागे उभे राहावे. ज्यामुळे चीन-पाकिस्तान आणि तालिबान समर्थित दहशतवादाची लढाई जिंकण्यात आपल्याला यश मिळेल.





























































