दिल्ली डायरी – तामीळनाडूच्या राजकारणातील ‘दे धक्का’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणेच तिकडील राजकारणातही असते. अचाट, अफाट ड्रामा ठासून भरलेला असतो. सध्या त्याची प्रचीती तामीळनाडूतील घडामोडींमुळे येत आहे. रजनीकांत यांनी दैवी आदेशाचा हवाला देत अचानक राजकारणातून एक्झिट घेतली आहे. त्यापाठोपाठ द्रमुकसारख्या पक्षातही भाऊबंदकी उफाळून आली आहे. एम. के. स्टालिन यांना त्यांचेच ज्येष्ठ बंधू अळगिरी यांनी आव्हान दिले आहे. रजनीकांत यांनी माघार घेतल्याने त्यांच्या मदतीने तेथे ‘कमळ’ फुलविण्याच्या भाजपच्या आकांक्षांना खीळ बसली आहे. तर स्टालिन यांचे ‘मन के लड्डू’ त्यांच्याच ज्येष्ठ भावाने फोडले आहेत. एकंदरीतच तामीळनाडूच्या राजकारणात सध्या ‘दे धक्का’ सुरू आहे.

नवसमाज निर्मितीचा संकल्प करून तामिळी सुपरस्टार रजनीकांत ऊर्फ थलावाई यांनी राजकारणाच्या रंगमंचावर उतरण्याचा संकल्प केला होता. त्यासाठीचे ‘नेपथ्य’ दिल्लीकर मंडळींनी केले. रंगमंच सजवला गेला, आता हिरोची एंट्री होणार आणि त्यानिमित्ताने ‘कमळा’चीही एंट्री तामीळनाडूत होणार, असे सर्वकाही कथानकानुसार होणार होते. मात्र अचानक ‘क्लायमेक्स’ आला आणि थलावाईंनी तब्येतीचे कारण सांगत राजकीय रंगमंचावरची एंट्रीच रद्द केली. परमेश्वराने आपल्याला चेतावनी दिली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष काढण्याचा माझा इरादा मी गुंडाळून ठेवतो आहे, अशी भावनिक साद घालत थलावाईंनी ‘पीछे मूड’ केल्यामुळे दिल्लीकर मंडळींचा हिरमोड झाला आहे. अर्थात तामीळनाडूच्या राजकारणातील ‘ट्विस्ट’ एवढय़ावरच थांबलेले नाही. रजनीकांत यांच्या माघारीमुळे द्रमुक व अण्णा द्रमुकच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असतानाच द्रमुकमधली भाऊबंदकी पुन्हा उफाळून आली आहे. करुणानिधींचे ज्येष्ठ चिरंजीव माजी केंद्रीय मंत्री अळगिरी यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे कनिष्ठ बंधू एम. के. स्टालिन यांच्या सत्तेच्या वाटेवर काटे पसरवण्याचा कार्यक्रम अळगिरी यांनी आरंभला आहे असे दिसत आहे. साहजिकच जयललितांच्या निधनानंतर केवळ नशिबामुळे मुख्यमंत्री झालेल्या पलानी स्वामी यांच्या आशा मात्र उंचावल्या आहेत. चेन्नईच्या समुद्रकिनाऱयावर चक्रीवादळे नेहमीच येऊन धडकत असतात, मात्र सध्याच्या या राजकीय चक्रीवादळामुळे तामिळी जनतेची मतीही भ्रमित होण्याची वेळ आली आहे.

तामिळी राजकारणाला तशी सुपरस्टारची मोठी परंपरा आहे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी ही भव्य परंपरा असलेल्या या राज्यात मध्यंतरी रजनीकांत व कमल हसन हे दोन सुपरस्टार ‘राजकीय मंचा’वर अवतरले होते. त्यापैकी रजनीकांत यांना दिल्लीश्वरांचा आशीर्वाद होता तर कमल हसन हे व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी लोकसभा निवडणुकीपासूनच सक्रिय होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चार टक्के मतेही मिळाली होती. सध्यादेखील गृहिणींना वेतन देण्याची घोषणा करून कमल हसन यांनी तामीळनाडूच्या राजकारणात आघाडी घेतली आहे. टीव्ही, फ्रीजसह मोफत आश्वासनांची बरसात करण्याची तिकडे परंपराच आहे. कमल हसन एकीकडे असे पाऊल टाकत असतानाच, अमित शहा यांच्या चेन्नई दौऱयानंतर सक्रिय झालेले रजनीकांत अचानक आजारी पडले आणि आजारपणातून उठल्यानंतर त्यांनी ‘दैवी आदेश’ जनतेला सांगितला व राजकारणाला गुडबाय केला. रजनीकांत यांच्या माघारीमुळे तामीळनाडूच्या परंपरागत द्रमुक पक्षांमध्ये आनंदाचे उधाण आले खरे, मात्र द्रमुकच्या आनंदाला लगोलग आहोटीही लागली. एम. के. स्टालिन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला त्यांचेच ज्येष्ठ बंधू अळगिरी यांनी टाचणी लावली. ‘द्रमुक पक्ष करुणानिधींना विसरला असून आपणच त्यांचे खरे वारसदार आहोत, ’ असे सांगत अळगिरी यांनी बंडखोरीचा झेंडा फडकविला आहे. जयललिता व करुणानिधी यांच्या निधनानंतर तामीळनाडूचे राजकारण खऱया अर्थाने पोरके झाले आहे. ही ‘स्पेस’ भरून दक्षिणेकडे कमळ फुलविण्याच्या इराद्याने दिल्लीश्वरांनी रजनीकांत यांना राजकीय रंगमंचावर एंट्री घ्यायला लावली खरी, मात्र माशी कुठे शिंकली कळत नाही. दिल्लीश्वरांचे दक्षिणेकडचे ‘मिशन लोटस’ हे कागदावरच राहील, असेच सध्यातरी दिसते.

प्रभूराम चौधरींचे पत्नीप्रेम

‘राष्ट्र सर्वोपरी…’चा उद्घोष केंद्रातील सत्ताधारी भाजप उठता बसता करत असतो. इतर राजकीय पक्षांना नीतिमत्ता वगैरेचे धडे देण्यात भाजपच्या पुढाऱयांचा बराचसा वेळ सत्कारणी लागत असतो. घराणेशाहीवरून तर काँगेसवर तोंडसुख घेण्यात भाजपचे पुढारी जराही कुचराई करत नाहीत, मात्र मध्य प्रदेशाचे आरोग्यमंत्री प्रभूराम चौधरींनी आपल्या पत्नीप्रेमाने त्यांचे दात घशात घातले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी डॉ. नीरा चौधरी यांना 1042 डॉक्टरांची ज्येष्ठता व योग्यता डावलून आरोग्य खात्याचे विभागीय संयुक्त संचालक बनविण्यात आल्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात सध्या ‘प्रभूरामांचे पत्नीप्रेम’ चर्चेचा विषय बनले आहे. गंमतीचा भाग म्हणजे या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव या पदासाठीच्या उमेदवाराच्या यादीतही नव्हते, मात्र भाजपचा संपूर्ण कारभारच पारदर्शक असल्याने अचानक ते नाव यादीत अवतरले आणि डॉ. नीरा चौधरी संयुक्त सचिवपदी विराजमान झाल्या. काँगेसने त्यावर ‘अंधा बाटे रेवडी फिर अपने अपने को दे…’ अशी टीका केली आहे. त्यामुळे भाजपने आता ‘चालचरित्र व चेहरा’ यांची द्वाही इतरांना देण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे!

चारण यांच्या आत्म्याचा आवाज

‘गुजरात मॉडेल’चे ‘नरेटिव्ह’ कसे फसवे आहे, याची कल्हई आजवर अनेक वेळा निघाली आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत नाहीत, अशा फसव्या कहाण्या पसरवल्या गेल्या, मात्र नुकतीच बलवंतसिंग चारण नावाच्या शेतकऱयाने आत्महत्या केली त्याची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषीविषयक कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱयांमध्ये संताप आहे. याच कायद्याला आणि एकंदरीत शेती व्यवस्थेला कंटाळून बलवंतसिंग चारण यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विशेष म्हणजे हे चारण भाजपचे कट्टर कार्यकर्ते. ‘मी गेल्यानंतरही माझा आत्मा भाजपचाच जयजयकार करेल’, असा पुकारा करत त्यांनी आत्महत्येची चिठ्ठी लिहली आहे. आपल्या दुरावस्थेबद्दल चारण यांनी लुनावडाचे भाजप खासदार रतनसिंग राठोड व आमदार जिग्नेशभाई सेवक यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली व मदतीची अपेक्षा भाजप सरकारकडून केली. त्यांच्या पत्राकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ढुंकूनही पाहिले नाही. बलवंतसिंग चारण यांनी कधी काळी लुनावडामध्ये शेती करीत भाजपही रुजवला होता. त्यांनी भाजपचे तालुकाप्रमुख पदही भूषवले होते. प्रामाणिकपणे अखेरच्या श्वासापर्यंत भाजपचे काम केलेल्या शेतकऱयाला देशातील सर्वात प्रगत म्हणवून घेणाऱया भाजपशासित गुजरातमध्ये आत्महत्या करावी लागली. ‘जिवंतपणी भाजपचे कोणी माझ्या मदतीला आले नाही, मात्र मृत्यूनंतरही माझा आत्मा भाजपचाच जयजयकार करेल. जय भाजप, भारत माता की जय’, असे म्हणत बलवंतसिंग चारण यांनी पत्राची व आयुष्याची अखेर केली आहे. चारण यांच्या आत्म्याचा आवाज कोणी ऐकेल काय?