
> रश्मी वारंग
आपली सकाळ चहा, कॉफीने तरतरीत होते. या पेयांचा सच्चा साथीदार म्हणजे बिस्किट. आबालवृद्धांना प्रिय असं हे बिस्किट जन्माला कसं आलं याची ही खुसखुशीत कहाणी.
बिस्किटांचे मूळ रोमन संस्कृतीशी नातं सांगते. आदिम काळापासून मानव धान्याची पेस्ट करून ती भाजत असे. अडल्यानडल्या वेळी हीच भाजलेली गोष्ट धान्याच्या पेस्टमध्ये पुन्हा बदलून त्याला वापरता येई. साठा करण्यासाठी ही कृती त्याने स्वीकारली. तीच कृती आजच्या बिस्किटांशी नातं सांगते. निओलिथिक काळात दगडावर ही धान्याची पेस्ट भाजली जायची. पुढे लॅटिन भाषेने ‘बिस’ म्हणजे दोन आणि ‘क्वी’ म्हणजे कुक अशा अर्थाने या पदार्थाला बिस्किट हे नाव दिले. दोन वेळा कुक म्हणताना बिस्किट पहिल्यांदा बेक आणि दुसऱया वेळेस स्लो अवनमध्ये ड्राय केले जाते. त्याचा संबंध या नावाला आहे. रोमन शेफ अपॅशियसने दिलेली पाककृती पहा. उत्तम दर्जाचं गव्हाचं पीठ पाण्यात उकळून त्याची पेस्ट प्लेटमध्ये पसरवावी ती सुकली की, तिच्या वडय़ा पाडून त्या कुरकुरीत होईस्तोवर तळाव्यात व नंतर मधासोबत खायला द्याव्यात. ही पाककृती म्हणजे आपल्या बिस्किटांचं आद्य रूप.
14 व्या शतकात इंग्रजीत ‘बिस्किट’ हा शब्द वापरला जाऊ लागला. त्या काळी बिस्किटे ही गोड आणि खारी अशा दोन्ही चवीत तयार केली जायची. सकाळचा नाश्ताच नाही, तर चक्क जेवणातही बिस्किट्स खाल्ली जायची.
दीर्घकाळ टिकणारा पदार्थ म्हणून बिस्किट्स बोटीवरचे खलाशी खात, पण ती तुटू फुटू नयेत म्हणून खूप काळ बेक केली जातं. सैनिकांसाठी तयार बिस्किटं अशी कडक असायची की, त्यांना ‘स्टोन ब्रेड’ म्हटलं जायचं. इतकी कडक बिस्किट्स आधी कॉफी किंवा काही वेळा चक्क वाईनमध्ये बुडवून खाल्ली जात. सुरुवातीला साखर फक्त श्रीमंतांची मत्तेदारी होती, पण साखरेचे उत्पादन वाढून ती स्वस्त झाल्याबरोबर बिस्किटंदेखील तळागाळापर्यंत पोहोचली. इंग्रज, स्कॉटिश व डच मंडळींनी अमेरिकेत बिस्किटं नेली तेव्हा त्यांना ‘टी केक्स’ म्हटलं जायचं.
आपल्या देशात ब्रिटिशांनी बिस्किटस् आणली. त्यांच्या सवयीच्या प्रभावातून आपणही बिस्किटांचं नातं चहाशी जोडलं. सुरुवातीला पावाप्रमाणेच बिस्किट खाणं धर्मासाठी निषिद्ध होतं. बिस्किट्स खाणाऱयांना चक्क प्रायश्चित्त घ्यावं लागे हे आज सांगून खरं वाटणार नाही, पण लवकरच हा गैरसमज दूर झाला आणि बिस्किट हा हिंदुस्थानींच्या आहाराचा अनिवार्य भाग बनला.
कठोरपणा सोडून मृदू, मुलायम झालेल्या बिस्किटांना आज लहानांपासून मोठय़ांनी आपलंसं केलंय. गरमागरम चहासोबत सकाळचा नाश्ता असो वा दुपारच्या जेवणानंतर तोंडांत चघळायचं काही गोड किंवा उपाशी पोटात ढकलण्यासाठी काहीतरी… बिस्किट्स उत्तम पर्याय ठरतात. चहाच्या कपासह ती मनात कधी विरघळतात कळतच नाही.
























































