
>>द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थानी संघ श्रीमंती, तृप्ती आणि फाजील आत्मविश्वास याच्या साखरझोपेतून जागा झाला आहे का?
साखरझोपेत स्वप्न पाहणं कठीण नसतं. पण प्रत्यक्षात ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मैदानावर शर्थ करावी लागते. साउथहँप्टनच्या मैदानावर ती स्वप्नपूर्तीची शर्थ कुठे दिसली नाही.
कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत शिरण्यासाठी हिंदुस्थानने जंग जंग पछाडलं. हिंदुस्थानात फिरकीचे आखाडे बनवून हिंदुस्थानी संघ जिंकला. पण या गोष्टीसाठी इसापनीतीतल्या धूर्त कोल्हय़ाची हुशारी पुरते. पण त्याच जिवावर करकोचाच्या देशात गेल्यावर विजयाचा घास खाणं सोपं नसतं. तिथे करकोचा सरशी मारतो.
अक्षरशः एक औक्षणी सेना घेऊन हिंदुस्थानी संघ इंग्लडमध्ये उतरला. केवढं ते सैन्य! बिनीचे सरदार, राखीव सरदार, विविध क्षेत्रातल्या गुरुवर्यांची फौज आणि सर्वांच्या डोक्यावर एक अर्जुन व एक द्रोणाचार्य. यांना सर्व कळत असल्यामुळे ते कृष्णालाच घेऊन जायला विसरले. त्यामुळे युक्तीच्या नेमक्या चार गोष्टी त्यांना कळल्याच नाहीत किंवा कळल्या पण त्या वळल्या नाहीत.
कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च स्टेजवर खेळताना एकाही कौंटी संघाबरोबर न खेळणं किंवा तसे सामने आयोजित न करणं हा कुठला माज?
सरावासाठी ही आपसात खेळायची कल्पना कुणाची?
कारण काय दिलं जातं तर इंग्लिश कौंटी संघात आता म्हणे दम राहिलेला नाही. पूर्वीचे संघ मूर्ख होते का? पूर्वी पहिल्या कसोटीपूर्वी अनेक कौंटी सामने खेळले जात. इंग्लडच्या खेळपटय़ा, त्यांचं हवामान याच्याशी एकरूप होणं एका क्षणात शक्य नसतं. जर आपण ते कौंटी सामने खेळलो असतो तर भले त्या संघाच्या गोलंदाजांचा दर्जा मोठा नसेल पण वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या गोलंदाजांसमोर हिंदुस्थानी संघाला खेळता आलं असतं. गोलंदाजांना नेमका कुठला टप्पा घ्यावा, हेसुद्धा कळलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की, जेव्हा परदेशी संघ एखाद्या कौंटीविरुद्ध खेळतो तेव्हा त्या कौंटी संघातले खेळाडू त्यांच्या दृष्टीने सर्वस्व पणाला लावतात. कारण ते स्कोर, तो परफॉर्मन्स त्यांना फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे समोर आव्हान नाही तरी खऱया अर्थाने एक लढणारा संघ मिळाला असता. पण हिंदुस्थानी बोर्डातल्या धुरिणांना यातलं काहीही नको होतं किंवा त्यांना तसं सांगितलं गेलं. बरं ही गोष्ट सौरभ गांगुलीला माहीत नव्हती का? सौरभ गांगुली इंग्लंडमध्ये खेळलाय. त्याचं पहिलं कसोटी शतक इंग्लंडमध्येच आहे. तो इंग्लंडमध्ये कौंटीसुद्धा खेळलेला आहे. त्यामुळे त्याला इंग्लिश कौंटीविरुद्धच्या सरावाचं महत्त्व माहीत नाही असं समजणं म्हणजे न्यूटनला फिजिक्स कळत नव्हतं असं म्हणण्यासारखं आहे.
बरं वातावरण ढगाळ असताना, पाऊस सतत ये-जा करणार हे हवामान खातं सांगत असताना आपण फक्त तीनच वेगवान गोलंदाज घेऊन खेळलो. किती षटकं मिळाली जडेजाला? आणि जडेजाला घेऊन किती फायदा झाला? सतत जाणवत होतं की, हिंदुस्थानला एक वेगवान गोलंदाज कमी पडला. त्यातही आपण मोठय़ा नावांच्या मागे धावतो. महंमद सिराज हवा होता, असं वारंवार वाटत होतं. ऑस्ट्रेलियात आपण जो देदीप्यमान विजय मिळवला होता ना, त्या वेळेला ती मोठी मोठी नावं खेळत नव्हती. सिराजसारख्या तरुणांनीच हिंदुस्थानी संघाला जिंकून दिलं होतं. याचं कारण असं असतं की, त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करायची संधी मिळते आणि ती संधी ते घट्ट मुठीत पकडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचा फायदा हिंदुस्थानी संघाला होतो. जे बनचुके असतात त्यांच्यासाठी एक अपयश एखाद्या ओरखडय़ासारखंसुद्धा नसतं.
पहिल्या डावातली टॉस हरल्यानंतरची हिंदुस्थानी संघाची सुरवात हा हिंदुस्थानी फलंदाजीमधला सर्वात मोठा पर्पल पॅच होता. त्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजीत तो रंग दिसलाच नाही. इंग्लंडमध्ये प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीची तासभरातली षटकं ही फार महत्त्वाची असतात. कारण खेळपट्टीत त्या वेळेला जान असते. त्यात आपण जगातल्या सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाजीसमोर खेळत होतो. अशा वेळी ती षटपं डोळ्यात तेल घालू खेळायला हवीत. निदान पहिला एक तास तरी! आणि त्या वेळेला जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडून सर्वात जास्त अपेक्षा असतात. विराट कोहली त्या अपेक्षा पुऱया करू शकला नाही. पण हे आपल्याला जाणवलंय का की, गेल्या 45 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकलेलं नाही? शेवटचं त्याचं शतक बांगलादेशविरुद्ध होतं. ते आता द्वापारयुगातलं वाटतं. गेल्या दोन वर्षांतली त्याची कसोटी कामगिरीसुद्धा सामान्य आहे. त्याची सरासरी 39च्या पुढे गेलेली नाहीये. हिंदुस्थानी फलंदाजीच्या दोन्ही डावांमध्ये त्या पहिल्या तासात पडलेल्या महत्त्वाच्या विकेट्स हिंदुस्थानी संघाला जास्त इजा करून गेल्या. दुसऱया डावात रहाणेचं बाद होणं दुर्दैवी होतं. पण पहिल्या डावात तो सेट झालाय असं वाटत असताना कसा बाद झाला? न्यूझीलंडमध्ये वॅगनरने त्याला पकडायला वापरलेला पिंजराच त्याने इथे पुन्हा वापरला. पाळलेल्या पोपटाने पिंजऱयात शिरावं तसा तो पिंजऱयात शिरला. हिंदुस्थानच्या पहिल्या डावात चेंडू घडाळ्याच्या काटय़ासारखा हलत होता हे खरं आहे; पण हे इंग्लंड आहे, इथे चेंडू नाकासमोर सरळ कधीच चालत नाही (अपवाद बुमराहचा. पहिल्या डावात बुमराहचा चेंडू फारच सरळमार्गी वाटला.). इंग्लंडमध्ये स्विंगला कव्हर करून खेळावं लागतं. चेंडूवर जाण्याऐवजी चेंडू बॅटवर येऊ द्यावा लागतो. गावसकर ‘सॉफ्ट हॅण्ड, सॉफ्ट हॅण्ड’ ओरडतो तो उगाच नाही. इंग्लंडमध्ये त्यामुळे फलंदाज कधीच सेट नसतो. हिंदुस्थानात ठीक आहे, 30 झाले आता 100पर्यंत मरण नाही. असं सेट झालेल्या फलंदाजाला वाटू शकतं. पण इंग्लंडमध्ये तसा फाजील आत्मविश्वास ठेवणं चुकीचं आहे. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ याचा प्रत्यय इंग्लंडमध्ये अगदी सेट झालेल्या फलंदाजांनासुद्धा येतो.
हिंदुस्थानी फलंदाजीच्या पहिल्या डावाबद्दल एक म्हणता येईल की, वातावरण ढगाळ होतं. जागतिक दर्जाची स्विंग गोलंदाजी होती. त्यामुळे पेपर कठीण होता. पण दुसऱया डावात तर वातावरण असं नव्हतं ना? दुसऱया डावांत वातावरण फलंदाजीला अत्यंत पोषक होतं. म्हणजे काळे ढग पांगलेले होते. निळं आकाश दिसत होतं. सूर्य हसत होता. पण तरीही हिंदुस्थानी फलंदाजी ढेपाळली आणि धायमोकलून रडली.
ऑस्ट्रेलियात गील आणि पंत या दोन तरुण मुलांनी धमाल केली होती. पण त्यांनीही आता लक्षात ठेवायला पाहिजे की, देश बदललेला आहे. इथे चेंडूच्या करामती वेगळ्या असतात. इथे खेळण्यासाठी एक वेगळं तंत्र लागतं. तिथे जे फटके सहजतेने मारता येत होते ते इथे मारता येतातच असं नाही. मुळातच शेवटच्या दिवशी हिंदुस्थानी फलंदाजीचं उद्दिष्ट काय हे कळत नव्हतं. म्हणजे त्यांना जिंकायला जायचं होतं की ड्रॉ करणं हा अधिक चांगला निर्णय आहे असं वाटत होतं? याबाबतीत ते गोंधळात होते. पंत तर त्या इनिंगमध्ये प्रचंड गोंधळात आहे, असं मला वाटलं. त्याला सुरुवातीला एक जीवदान मिळालं, त्यानंतर तो बऱयाच वेळेला सेन्सिबली खेळतोय असं वाटायचं आणि मध्येच तो चेंडू मारण्यासाठी स्टेप आऊट व्हायचा किंवा कुठेतरी त्याच्या मानेवर टी-ट्वेण्टीचं भूत येऊन बसलंय की काय असं वाटायचं. एक गोष्ट मला मान्य आहे की, मुक्त फलंदाजी आणि बेशिस्तपणे केलेली फलंदाजी यात फार अस्पष्ट रेष आहे. ही रेष तुमचे यश आणि अपयशाप्रमाणे बदलत जाते. अपयश मिळालं की तुम्हाला बेशिस्त ठरवलं जातं. पंतलाही बेशिस्त ठरवलं जाणार आहे. पण पंतने लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण इंग्लंडमध्ये खेळतोय. त्यामुळे आक्रमकपणे खेळतानासुद्धा बंधनाचा मास्क बॅटला लावावाच लागणार. न्यूझीलंडच्या कर्णधाराने आणि गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांचा फार सुंदर अभ्यास केला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी टाकली व क्षेत्ररचना लावली. म्हणजे अगदी जडेजाच्या बाबतीतसुद्धा त्याची बॅट उधळणार नाही, हे त्यांनी पाहिलं. वॅगनरने जडेजाच्या अंगावर उसळते चेंडू तर सोडून त्याला बांधून टाकला. मग एक हळूच लालूच दाखवणाऱया चेंडूला त्याच्या बॅटने स्पर्श केला आणि तो बाद झाला. माझी हिंदुस्थानी फलंदाजांएवढीच निराशा ही हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी केली. बुमराह हा गेल्या वर्षभरात तो जुना पूर्वीचा, खतरनाक बुमराह वाटतच नाहीये. मुख्य म्हणजे त्याला पहिल्या डावात चेंडू स्विंग करताच आला नाही आणि त्याचा सर्वोत्कृष्ट स्पेल होता तो मॅचच्या शेवटच्या सत्रामध्ये. पण तोपर्यंत पुलाखालून पाणी कधीच निघून गेलेलं होतं. Hit the deckचा सल्ला अती होतोय का? इशांत शर्मासुद्धा अजिबात प्रभावी वाटला नाही. खरंतर इशांत शर्माच्या आता 300 विकेट्स झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या उत्तरायणाला सुरवात झालेली आहे. आता सिराजकडे जास्त आशेने पहायला हवं. शमीने मात्र उत्कृष्ट गोलंदाजी टाकली. हिंदुस्थानी गोलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसारखे चेंडू स्विंग करू शकले नाहीत. न्यूझीलंडचे गोलंदाज ज्या दिवशी सूर्य चमकत होता त्या दिवशीसुद्धा चेंडू चांगला स्विंग करत होते आणि ज्या वेळेला ढगाळ वातावरण होतं तेव्हा हिंदुस्थानी गोलंदाजांना चेंडू स्विंग करणं जमलं नाही. मॅच बघताना असं वाटतं की, शमीलाच फक्त योग्य तो टप्पा सापडला. त्याने स्विंगचा चांगला उपयोग केला.
एकंदरीत हिंदुस्थानी संघाचे बरंच चुकलं.
आतातरी जागं व्हा. जमिनीवर राहून विचार करा. तरच इंग्लंडमधील इतिहास बदलेल.



























































