
>>संध्या सिनकर
हैमिन सुनिम हे बौद्ध धर्मातील झेन तत्त्वज्ञानाचे नामवंत लेखक आहेत. दक्षिण कोरियात जन्मलेल्या व अमेरिकेत शिकलेल्या सुनिम यांनी कोरियातील बुद्धविहारात बौद्ध भिक्षू होण्याचे प्रशिक्षण घेतले. ते हॅम्पशायर कॉलेजमध्ये बौद्ध तत्त्वज्ञान शिकवत. त्यांच्या ‘थिंग्स यू कॅन सी ओनली व्हेन यू स्लो डाऊन’ या दक्षिण कोरियात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा लेखिका माधुरी शानभाग यांनी ‘शांत मन आनंदी जीवन’ हा मराठी अनुवाद केला आहे. सुनिम सांगतात जीवनाचा वेग कमी करा. नातेसंबंध जोपासताना, स्वतःचे मूल्यमापन करताना मनात दया ठेवा. जीवन मनापासून व आनंदाने जगण्यासाठी अनेक उदाहरणे देऊन ते मार्गदर्शन करतात.
या पुस्तकामध्ये आठ प्रकरणे आहेत. सुरुवातीला त्यामध्ये निबंध, नंतर छोटे छोटे मेसेजेस, त्यानंतर प्रत्येक प्रकरणात पुढे एक लेख आहे आणि पुन्हा मेसेजची मालिका. हे मेसेज निराशेच्या काळात वाचकांना दिलासा देतील. एकटेपणात सोबत करतील.
आपल्या मनाची व बाह्य जगाची सीमारेषा प्रत्यक्षात अगदी बारीक व भासमय असते. मनातला आनंद बाहेरच्या जगावर परिणाम करतो. बाहेरचे जग आनंदी व दुःखी नसते ते फक्त अस्तित्वात असते. आपण आपल्या मनात काय आहे तेव्हढाच तुकडा बाहेरच्या जगात बघत असतो. आपले मन सजग असेल तरच बाहेरचे जग अस्तित्वात येते. आपण आपल्या नजरेच्या आवाक्यात येणारे पाहू शकतो. त्यामुळे काय पाहायचे ते शहाणपणाने ठरवायला हवे व त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. प्रत्येकाला येणाऱया बाह्य जगाचा अनुभव हा तुमच्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. तुमचे मन आनंदी असेल तर तुम्हाला जग तसेच दिसेल. जेव्हा तुमचे मन नकारात्मक विचारांनी युक्त असते तेव्हा तुम्हाला जगही निराश दिसते.
पुस्तकात अनेक मेसेज मनाला सजग करणारे, प्रेरणा देणारे, शांतवणारे, विसावा देणारे आहेत. सुनिम म्हणतात ‘जीवन हे एक नाटक आहे. त्यात तुम्हाला एक भूमिका लिहिलेली दिलेली असते. जर तुम्हाला ती भूमिका आवडली नाही तर तुमच्याकडे तुम्हाला हवी तशी भूमिका निर्माण करण्याची शक्ती आहे.’
आपण प्रामाणिकपणे विचार केला तर आपण इतरांसाठी ज्या गोष्टी करत असतो त्या प्रत्यक्षात आपण स्वतःसाठी करत असतो हे लक्षात येईल. आपण आपले कुटुंब सुखी राहावे अशी प्रार्थना करतो. कारण आपल्याला ते आपल्या भोवती हवे असतात. जेव्हा आपला जोडीदार सोडून जातो तेव्हा आपण अश्रू ढाळतो. कारण आपल्याला पुढचं एकाकीपण दिसत असतं. आपल्या अंतर्मनात हे सर्व अगदी खोलवर रुजलेले असते. त्यापासून आपली सुटका होणे अत्यंत कठीण असते. सुनिम सांगतात, काळजी करणं थांबवा. तुमचं मन तुम्हाला सांगते ते करा. तुमचे आयुष्य साधे सोपे करा. तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य करा. तुम्ही जर स्वतः आनंदी राहिला तरच हे जग तुम्ही आनंदी करू शकता. आपण एकमेकांच्या साथीने सुखी असणं महत्त्वाचं. तुम्हाला जे घडावे असे वाटते ते घडावे म्हणून वाट पाहू नका. कृती करा. सुखी होणे हे तुमचे ध्येय असावे. यशस्वी होणे हे नको. तुम्ही यशस्वी झाला तर त्यात तुम्हाला सुख लाभले नाही तर त्याचा काय उपयोग? प्रेरणेचा एक शब्द जो विश्वासाने, दयेने व आशेने उच्चारला असेल तो शब्द माणसाचे भविष्य बदलू शकतो. ज्यांना काम आवडत नाही, पण ते करायलाच हवे म्हणून करतात त्यापेक्षा ज्या लोकांना आपल्या कामापासून आनंद मिळतो ते लोक कामात अधिक यशस्वी होतात. टीकाकार असणे सोपे असते, पण त्याने जर त्या कामाची जबाबदारी स्वीकारून ते पार पाडायचे ठरवले तर त्याला काम समजते.
आपण एखाद्याचा खूप तिरस्कार करतो तेव्हा त्याचा खूप विचार करतो. त्याला मनातून हद्दपार करू शकत नाही आणि हळूहळू आपण त्याच्यासारखे बनत जातो. आपल्या आनंदाचे मूल्यमापन दोन साध्या प्रश्नाने करता येते. पहिला प्रश्न – तुम्ही जे काम करत आहात ते अर्थपूर्ण आहे असे तुम्हाला वाटते का? दुसरा प्रश्न – तुमच्या भोवतालच्या लोकांशी तुमचे नातेसंबंध चांगले आहेत का? सुनिम यांचं विवेचन, मार्गदर्शन वाचकांना प्रेरणा देत, आयुष्याच्या कठीण प्रसंगांना सामोरे जायला मदत करतं आणि वाचकांचाही वर्तणुकीतील चांगल्या बदलांच्या दिशेने प्रवास सुरू होतो. मनाची सजगता जागृत ठेवली तर आपण राग, मत्सर व अपेक्षाभंग यासारख्या नकारात्मक भावनांना कसे हाताळू शकतो ते पुस्तकात छान विशद केले आहे. आपल्याला नक्की काय करायचं आहे ते समजत नसेल भविष्याविषयी संदिग्धता असेल तर आपण स्वतःच्या अंतर्मनाचा कसा वेध घ्यावा याविषयी पुस्तकातून मार्गदर्शन मिळते. हिलिंग मेंटर म्हणून कोरियात प्रसिद्ध असलेल्या सुनिम यांचं हे पुस्तक वाचकांना सुखी व शांतीपूर्ण जीवन जगायला मदत करेल.
शांत मन आनंदी जीवन
लेखक ः हैमिन सुनिम
अनुवाद ः माधुरी शानभाग
प्रकाशक ः मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ: 160, मूल्य: रुपये 500/-




























































