
>> दिलीप जोशी
‘चराति चरतो भगः’ म्हणजे चालणाऱ्याचे भाग्य उजळते, म्हणूनच ‘चरैवति चरैवति’ किंवा ‘चालत रहा’ असा संदेश आपल्या संस्कृतीने दिला तो फार मोलाचा. सोप्या भाषेत सांगायचं तर ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार’ असं घडतं. आता आपण आधुनिक काळात देशाटनाला पर्यटन म्हणतो. थोडक्यात, भ्रमंती किंवा फिरस्तेगिरी. काय फायदा या सगळय़ाचा, तर कवी म्हणतो त्याप्रमाणे ‘पंडित मैत्री’ आणि ‘सभेत संचार’ होतो. आता यातला ‘पंडित’ म्हणजे कोणी प्रवचनकारच असायला हवा असे नाही. ज्याच्यापासून काही शिकता येईल असा कोणीही. मात्र अशा वेळी आपलं पुस्तकी शिक्षण, पदवी किंवा नोकरी-व्यवसायातलं स्थान विसरून नव्याने शिकण्याची, क्षणोक्षणी विद्यार्थी होण्याची तयारी असायला पाहिजे.
गेली दोन वर्षे थंडावलेले ‘पर्यटन’ या वर्षी तरी मुक्त वातावरणात सुरू व्हावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यापूर्वीच्या सुमारे पन्नास वर्षांत मात्र खूप फिरायला मिळाले. एकोणीसशे सत्तरपासून आम्हा तरुणांचा समूह सहय़ाद्रीच्या कडेकपारीतील दुर्गम गडकिल्ले पाहायला निघाला. शिवरायांच्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावणारे हे गडकोट पाहताना विलक्षण स्फूर्ती यायची. अनेकदा अर्धपोटी किंवा उपाशी राहून पायपीट करावी लागली तरी काहीच वाटत नसे. उलट एका उदात्त ध्यासाने प्रवास चाललाय या कल्पनेतूनच ऊर्जा मिळायची. नंतर पुरेशी तयारी करून मोहिमा आखू लागलो.
याबरोबरच दोनवेळा हिंदुस्थानातल्या बहुतेक राज्यात फिरण्याची संधी मिळाली. आम्ही ठरवलेलं असायचं की, ‘टच अॅण्ड गो’ असा धावता प्रवास नको. एकेका राज्यात आठ-पंधरा दिवस राहून तिथल्या प्रेक्षणीय स्थळांबरोबरच खेडय़ांमध्ये जाऊन तिथलं जनजीवन अनुभवावं असं वाटायचं. आमचा मुंबैकर शहरी अवतार पाहून दूरच्या खेडय़ातली मंडळी सुरुवातीला थोडी बिचकायची, पण त्यातल्याच एखाद्या शिकणाऱ्या तरुणाशी मैत्री करून संवाद साधता यायचा. त्या त्या गावातली वैशिष्टय़पूर्ण ठिकाणं न्याहाळताना तिथली भाषा कानावर पडायची. त्यातली काही वाक्यं किंवा निदान शब्द शिकून घेतले की, माणसं अधिक मोकळेपणाने बोलायची. बंगालमध्ये ‘आपनि केमोन आछेन?’ किंवा तामीळनाडूत ‘एपडियरके’ म्हणजे आपण कसे आहात? असं विचारलं की, त्यांना गंमत वाटायची. आपल्या महाराष्ट्रातही विविध बोली आहेतच. रात्री आमच्या गाण्यांच्या ‘मैफली’त स्थानिकांनाही सामावून घ्यायचो. त्यांच्या परंपरेतली गाणी ते म्हणताना चार शब्द ऐकून आम्ही म्हटले की, मंडळी खुश व्हायची. या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून आलेल्या अनुभवाचा नवनव्या शब्दांचा, जीवनविषयक संकल्पनांचा परिचय होत गेला आणि पत्रकारी लिखाणात त्याचा फायदा झाला.
प्राचीन वास्तू, म्युझियम वगैरे तर पर्यटनातली नित्याची स्थळं, पण वेरूळचं एक कैलास लेणं आम्ही पाच-सात तास बघतोय म्हटल्यावर गाइडसुद्धा चक्रावला. अशा ठिकाणी जाताना थोडंसं ‘होमवर्क’ (गृहपाठ) करून गेलं तर उत्तम ठरतं. एकदा याच लेण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यटन विभागाचा संगीत महोत्सव होता. असा ‘वेरूळ महोत्सव’ (किंवा येलोरा फेस्टिव्हल) आजही होत असेल, पण आम्ही गेलो होतो त्या ‘फेस्टिव्हल’मध्ये दुपारी जेवणाच्या विशाल टेबलाभोवती आमच्याबरोबर होते विख्यात सरोदवादक अमजद खाँ, नृत्यांगना मल्लिका साराभाई आणि शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज कलाकारांशी मुक्त संवाद साधता यायचा.
काही प्रवास तर आणखी वेगळा अनुभव देतात. 1980 चं देशातून सुमारे 80 वर्षांनी दिसलेलं खग्रास सूर्यग्रहण पाहायला दक्षिण हिंदुस्थानातल्या रायचूर या छोटय़ा गावात गेलो, तर तिथे देशी आणि विदेशी पर्यटकांची जत्राच उसळलेली दिसली. देशातल्या अनेक प्रांतांतल्या आणि जगातल्या अनेक देशांतल्या लोकांशी त्या दिवसभरात भरभरून संवाद साधता आला. आता वाटतं, त्यावेळी आजच्यासारखे सेलफोन आणि त्यात चित्रीकरण करणारे कॅमेरे असते तर! पण ते नव्हते तेच बरं होतं. म्हणून तर जगातली कोणतीही दोन माणसं मोडक्या-तोडक्या इंग्लिशचं माध्यम करून पारावर बसलेल्या माणसांसारखी ‘धो धो’ बोलत राहिली. आम्ही सारे खरंच स्टेशनच्या पारावर म्हणजे प्लॅटफॉर्मवर दाटीवाटीने बसलो होतो. एक रात्र तिथेच जागून काढली. त्या अनुभवाने ‘पंडित मैत्री’ म्हणजे ज्ञानात भर पडली आणि ‘सभेत संचार’ म्हणजे संपूर्ण देशी आणि विदेशी अशा समूहात केवळ माणूस म्हणून संचार झाला. त्याने संवादाची कला शिकवली. गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या पर्यटन दिनाचं बोधवाक्य होतं ‘सर्वसमावेशक’ पर्यटन. साहस, जिज्ञासा, कुतूहल, जनजीवन आणि विज्ञान या सर्वांची जवळून ओळख व्हायची तर ‘चालत’ राहायलाच हवं. त्यासाठीचा मार्ग मात्र विचारपूर्वक निवडला पाहिजे आणि तो स्पष्ट नि मुक्तही असला पाहिजे.






























































