
>> प्रतिमा इंगोले, ज्येष्ठ लेखिका
आज गौराई घरोघरी येणार… लेकाच्या निमित्ताने ही आदिमायाही स्वत:चे माहेरपण करवून घेते… कोडकौतुक पुरवून घेते… कोकण… विदर्भ… प्रत्येक प्रांताच्या नाना तऱहा… गौराईची ही मातृसत्ताक पद्धती आज घरोघरी रुजावी….
सोशल मीडियाचे इतर अनेक दुष्परिणाम असले तरी सामाजिक जाणीव वाढण्यास त्याचा हातभार लागतो का? हा तसा अभ्यासाचा विषय आहे. पण एवढे मात्र खरे की, त्यावरच आजच्या गौराईंचे, महालक्ष्मींचे सुसंगत रूप मला तरी कळून आले. कारण अनेकांच्या घरी आता महालक्ष्मी म्हणून जिजाऊ आणि सावित्रीबाईंना स्थापण्याची नवी परंपरा रूढ होते आहे. सोशल मीडियावरून त्याचा प्रसारही केला जातो आहे. त्याबद्दल अनुकूल मते सर्वत्र व्यक्त केली जात आहेत. आमच्या विदर्भात तरी गौराईंचा उत्सव हा घरगुती नसून लोकोत्सव असतो. एखाद्या लग्नसोहळय़ाइतकाच हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरी किमान शंभर दीडशे तरी लोकप्रसाद घेतातच आणि प्रसाद म्हणजे महाप्रसादच असतो.
खरे तर ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या पूर्वीच्या गणराण्या असाव्यात. पूर्वी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. तेव्हा लोक टोळय़ा करून राहत होते. या टोळय़ांना जनसमूह अथवा गणसमूह म्हणत होते. या गणसमूहाची प्रमुख स्त्री होती. तिला गणराणी म्हणत होते. या सर्व गणराण्याच आता उन्नयन होऊन देवीरूपात पुजिल्या जातात.
रेणुका, अंबा, दुर्गा, काली, एकवीरा, लक्ष्मी या त्या काळातील गणराण्याच आज देवी म्हणून पुजिल्या जातात. कारण या गणराण्यांनी समाजाचे राखण केले. समाजाच्या उपयोगी पडून सर्वांचे भले केले म्हणून त्या देवत्व पावल्या. त्या घरोघरी पुजिल्या जाऊ लागल्या. त्यांच्यासारख्या ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी यासुद्धा गणराण्याच होत्या. कदाचित त्या बहिणी असतील, पण त्यांचे लोकोपयोगी कार्य बघून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त होऊ लागला आणि त्यातूनच कालांतराने त्याची जागा देवत्वाने घेतली. त्या देवरूप पावल्या. त्याच न्यायाने पाहिले तर आजच्या पुरोगामी लोकांकडचा हा महालक्ष्मी उत्सव कालानुरूप ठरतो. कारण जिजामाता आणि सावित्रीबाई या दोघींनीही समाजोपयोगी कामे केलीत. त्यांनी केवळ स्त्रियांसाठीच काम केले असे नाही. तर त्यांनी पुरुषांचीही अस्मिता जागृत केली. त्यांना गुलामीची जाणीव करून दिली. त्यांच्यामध्ये स्फुल्लिंग चेतविले. त्यातून स्वराज्य उदयास आले. स्त्र्ायांवरील अन्यायाबरोबरच, पुरुषांवरील अन्यायही दूर झाला.
शेवटी देवत्व म्हणजे तरी काय असते? माणसांपेक्षा अधिकचे गुणत्व लाभून देवत्व प्राप्त होते. माणूस स्वतःपुरता विचार करतो. स्वार्थी ठरतो, पण जो स्वतःपेक्षा दुसऱयांचा विचार करतो तो देवरूप ठरतो. त्या दृष्टीने या दोघीही देवरूपच आहेत आणि त्यांची पूजा देव जर अस्तित्वात असला तर देवापर्यंत पोहोचणारच आहे. तसे पाहता पितरांबाबत हेच घडते. आपण आपल्या आई-वडिलांचे श्राद्ध करतो, पण त्याद्वारे सर्व पितरांपर्यंत ती श्रद्धा पोहोचते अशी लोकधारणा असते. त्याचप्रमाणे या देवरूप असणाऱया दोघींबद्दलच हा श्रद्धायुक्त आदरभाव देवापर्यंत नक्कीच पोहोचत असणार. शेवटी देवाची पूजा हाही एक संकेतच असतो.
पश्चिम महाराष्ट्रात अथवा कोकणात तर गौराई म्हणून तेरडय़ाच्या रोपाची पूजा करतात. मग जर या रोपांद्वारा जर पूजा देवांपर्यंत पोहोचते तर या दोन्ही आधुनिक गौराईंमार्फत नक्कीच पोहोचावी. आजच्या गौराईला ती स्कूटर चालवते आहे. हातात पर्स घेत आहे असे आधुनिक रूप देण्यापेक्षा आधुनिक गौराईच पूजेसाठी वापरणे जास्त चांगले आहे आणि त्यादृष्टीने समाजात परिवर्तन होणे हे खरे आधुनिकतेचे परिणाम आहे. शेवटी कोणताही सण वा उत्सव हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच असतो. पूर्वीच्या ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या पृथ्वीचीच रूपे मानले जात होती. त्या आपले पोषण करतात म्हणून त्यांच्याबद्दलचे ऋण त्यांची पूजा करून व्यक्त केले जात होते. त्यानिमित्त घरात गोडधोड, वेगळे पदार्थ केले जात होते. पण त्याचा आस्वाद माणसंच घेत होती. म्हणजे ती पृथ्वीची संकेतात्मक पूजा ठरत होती. माणसंच माणसांसाठी पृथ्वीचे निमित्त करून सोहळा साजरा करीत होती. बहुतेक सर्वच सोहळे असेच संकेतात्मकच असतात. अमके झाले तर अमके होते हे लोकसंकेतच असतात. त्यादृष्टीने हासुद्धा एक लोकसंकेतच ठरतो. तेव्हा काळानुरूप लोकसंकेत पाळणे केव्हाही योग्य ठरते. पूर्वीच्या रूढी, परंपरा आजच्या विज्ञानयुगात कालबाहय़ ठरतात. नव्या परंपरा नव्या रूढी रूढ होतात.
तद्वतच गौरायांबाबतही नवे पायंडे, नव्या परंपरा, नव्या रूढी व्हाव्यात. थोडक्यात गौराया अथवा महालक्ष्मी तसा संपूर्ण महाराष्ट्रात थाटामाटात साजरा होणारा लोकोत्सव. हा सणापेक्षा लोकोत्सव ठरतो तो विदर्भातील महालक्ष्मींमुळे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात त्यांना गौराई म्हणतात. तेरडय़ाच्या रोपांचीच गौराई म्हणून पूजा करतात. ही पूजा तशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत असावेत. कारण गौराया या पृथ्वीचीच दोन रूपे आहेत, असे म्हणतात. मी प्रबंधासाठी लोकसाहित्य विषय घेतला. लोकसाहित्य गोळा केले त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले महालक्ष्मी म्हणजे आदिशक्तीचीच दोन रूपे.
आदिशक्तीच जन्म देते आणि मेल्यानंतर उदरात घेते. त्यांच्याच रूपांची ही पूजा. एकीचे नाव ‘अदिती’ आणि दुसरीचे नाव ‘निऋ&ती’ एक पालन करते तर एक विनाश करते. जसा आरंभ महत्त्वाचा तसाच शेवटची महत्त्वाचा. त्यानेच सृष्टीचक्राला गती येते. ‘पुनरपि जननम, पुनरपि मरणम्’ हेच सृष्टीचे महत्त्वाचे सूत्र. एक झाड उन्मळून पडते तर त्याच्याखालीच दुसरे रोप उगवते. आजा मरतो आणि नातू जन्माला येतो. यातूनच सीतेला पृथ्वी जन्म देते आणि शेवटी भुई दुभंगून पोटात घेते ही मिथ्थकथा जन्माला येते. हा सगळा पृथ्वीचाच खेळ. एक रूप मंगलदायी तर दुसरे प्रलंयकारी. पृथ्वी फळते, फुलते माणसाचे पोषण करते. भाद्रपद महिना असाच फळण्याचा, फुलण्याचा. पूर्वी जेव्हा रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी बरसायच्या तेव्हा भाद्रपदात पिकं घरात यायची. मूग, मटकी, उडीद, भडाची ज्वारी, तीळ वगैरे. मिरची, भेंडी, वांगी, अंबाडी, कोहळे, दोडके, कारले, गवार, बरबटी शेंगा, चवळी, भोपळा इत्यादी भाज्या शेतात तयार व्हायच्या. या सगळय़ांचा पृथ्वीलाच नैवेद्य दाखवून तिला खूश करण्याचा प्रयत्न त्यातून असायचा. तुझे तुलाच अर्पण म्हणत कृतज्ञता व्यक्त केली जायची. आवर्जून जे नवीन तेच अर्पण केले जायचे. मुद्दाम कोहळय़ाची भाजी, भोपळय़ाची कथली, सोळा भाज्यांची मिश्र भाजी केली जायची. पृथ्वीने पदरी घातलेल्या समृद्धीबद्दल विनम्रता व्यक्त केली जायची. शेवटी पूर्वी गौराई पृथ्वीरूप आहे असे मानणे, अथवा गौराई गणराण्या उभयन होऊन देवरूप पावल्या असे मानणे म्हणजे संकेतच ठरतात. तेव्हा जर संकेत बदलले तर श्रद्धा बदलत नाही ती कायम ठेवली की झाले? म्हणजे आजच्या गौराईमार्फत आपली पूजा देवापर्यंत पोहोचते ही नवी श्रद्धाच प्रस्थापित होईल. शेवटी पूर्वी तरी त्याचे प्रमाण कोणीच पाहिले नव्हते आणि आताही पाहणार नाही. खरे ना?





























































