लेख – युक्रेन युद्धः रशियाला सैनिकांची टंचाई

russia-ukraine-war1
फोटो प्रातिनिधीक

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

युक्रेन युद्धामध्ये लढण्याकरिता रशियाकडे पुरेसे सैनिक नाहीत. त्यात शेकडो रशियन महिलांनी रस्त्यावर उतरून युद्ध नको, शांती हवी, अशी मागणीच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडे केली आहे. त्यामुळेच काही महिन्यांपासून फारशी लढाई होताना दिसत नाही. येणाऱ्या काळामध्येसुद्धा हे युद्ध पुन्हा सुरू व्हायची शक्यता दिसत नाही.

युक्रेन युद्धामध्ये रशियासमोर कठीण परिस्थिती निर्माण होत आहे, ती म्हणजे युद्धभूमीवर लढण्याकरिता निर्माण झालेली सैनिकांची टंचाई. या युद्धात दोन ते अडीच लाख रशियन सैनिकांनी प्राण गमावले आहेत किंवा ते गंभीर जखमी झाले आहेत. रशियामध्ये प्रत्येक रशियन युवकाला सैन्यामध्ये चार वर्षे कम्पल्सरी सर्व्हिस करावी लागते. मात्र या सैनिकांचे लक्ष हे लढण्यापेक्षा आपली चार वर्षे कुठलाही धोका न पत्करता कशी पूर्ण करता येईल यावर असते. युक्रेन युद्धामध्ये अनेक वेळा रशियन सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस शरणागती पत्करली.

आपल्याकडील सैनिकांची कमी पूर्ण करण्याकरिता रशियाने प्रायव्हेट आर्मी व्हॅगनार भाडोत्री सैनिकांचा मोठय़ा प्रमाणामध्ये वापर केला. व्हॅगनारचे भाडोत्री सैनिक हे दुप्पट किंवा तिप्पट पगार घेऊन काम करणारे रिटायर्ड सैनिक असायचे. त्यांना लढाईमध्ये सर्वात जास्त यश मिळाले होते. मात्र व्हॅगनार भाडोत्री सैनिकांनी बंड केले. त्यामध्ये व्हॅगनारच्या प्रमुखाचा गूढ मृत्यू झाला. त्यानंतर व्हॅगनार भाडोत्री सैनिकांचा युक्रेन युद्धामध्ये असलेला सहभाग अतिशय कमी झाला आहे.

सैनिकांची कमतरता पूर्ण करण्याकरिता रशियाने काही अभिनव कल्पनांचा वापर केला. उदाहरणार्थ, तुरुंगामध्ये असलेले कैदी किंवा पकडलेले गुन्हेगार यांना सांगण्यात आले की, जर तुम्ही सैन्यात नोकरी केली तर तुमचे गुन्हे माफ करण्यात येतील. परदेशातील भाडोत्री सैनिकांची भरती करण्यात येत आहे. असे आमिष देण्यात आले की, जर तुम्ही रशियन सैन्यात 4 वर्षे काम केले तर तुम्हाला रशियाचे नागरिकत्व दिले जाईल. त्यामुळे मध्य आशिया, बांगलादेश, नेपाळ यामधून अनेक युवक रशियन सैन्यात भरती होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी एक वृत्त प्रसारित झाले की, युद्धाला कंटाळून सात रशियन सैनिक पळून जात होते. गोळ्या घालून त्या पळणाऱ्या सैनिकांना ठार मारण्यात आले. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’च्या विशेष प्रतिनिधीने म्हटले आहे की, सैनिकांमध्ये क्रूरता आणि अत्याचाराची विकृती वाढावी म्हणून रशिया त्यांच्या सैन्यांना अमली पदार्थ आणि व्हायग्रा देत आहे. त्यामुळेच रशियन सैनिक युक्रेनमध्ये अत्याचार करत आहेत. या सगळ्यांचा सैनिकांच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल? युक्रेनमध्ये रशियन सैनिक म्हणून गेलेला आपल्या घरचा पुरुष कसा जगत असेल, याची काळजी रशियन महिलांना वाटणे साहजिकच आहे.

गेल्या दोन वर्षांत रशियन सैनिकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय असेल? यासंदर्भात जगभरातल्या विश्वसनीय संघटनांकडून रशियन सैन्याबाबत फारच नकारात्मक बातम्या प्रसारित होत आहेत. रशियन सैनिकांच्या मृतदेहाचे मांजरी, कुत्रे, डुकरे लचके तोडत आहेत, असा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्याच्या मृतदेहाची अशी विटंबना झाली. कारण रशियन सैनिकांनी आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांचा मृतदेह परत आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. त्यांना वाटते की, मृत सैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना रशियन सरकारकडून योग्य मान मिळत नाही.

नुकतेच एका चर्चच्या सोहळ्यात पुतीन म्हणाले की, रशियन महिलांनी किमान आठ मुलांना तरी जन्माला घालावे. कारण रशियाची लोकसंख्या घटते आहे. गेल्या वर्षीही त्यांनी ‘ग्लोरी टू मदर हिरोईन’ संकल्पना सांगितली होती. यामध्ये दहा मुलांना जन्म दिलेल्या मातेला हा सन्मान दिला जाईल. तिला एक अरब रुबल म्हणजे 13 लाख रुपये प्रदान करण्यात येतील. आठ ते दहा मुलांना जन्म द्या, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन महिलांना सांगत असतानाच मॉस्कोमध्ये शेकडो महिला रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून म्हणत आहेत की, आम्हाला युद्ध नको, शांती हवी आहे! या महिलांचा पती, भाऊ किंवा मुलगा रशिया-युक्रेन युद्धात सैनिक म्हणून सामील आहेत. महिलांनी पुतीन यांच्याकडे मागणी केली आहे की, आता सैनिकांना परत मायदेशी बोलवा. युद्धाचे परिणाम होतात ते सैनिकांच्या कुटुंबांवर. युद्धात लाखो सैनिक शहीद होतात. त्यांच्या पत्नी विधवा होतात. मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपते. युक्रेन युद्धसमाप्तीची चिन्हे दिसत नाहीत. सुरुवातीला वाटायचे की, रशिया काही दिवसांतच युक्रेनला नमवेल, पण युद्धाला आता दोन वर्षे होतील, तरीही युद्धात सैनिकांची दुसरी फळी तयार करून ती पाठवून आधीच्या सैनिकांना युद्ध विश्रांती दिली जात नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची लोकप्रियता घसरली आहे. पुतीन यांना 2030 सालापर्यंत राष्ट्रपती पदावर राहायचे आहे. त्यामुळे जनतेचे समर्थन मिळवण्यासाठी ते जनतेबरोबर संवाद साधतात. चर्च संस्थेचे समर्थन मिळवण्यासाठी चर्च संस्थेला अभिप्रेत असलेल्या महिला जीवनाचे समर्थन करताना दिसतात. महिलांनी आठ ते दहा मुलांना जन्म द्यायला हवा, असे आवाहन ते करत आहेत. पण महिलांना नक्की काय वाटते? काही दिवसांपूर्वी अनेक गरोदर महिला रशियाहून अर्जेंटिनाला गेल्या. कारण अर्जेंटिनाच्या कायद्यानुसार, त्यांच्या देशात कोणत्याही देशाच्या मातेने बालकाला जन्म दिला तर त्या बालकाला अर्जेंटिनाचे नागरिकत्व मिळते व पालकांनाही नागरिकत्व मिळते. युद्धग्रस्त रशियापासून  दूर जावे आणि अर्जेंटिनाचे नागरिकत्व मिळावे यासाठी हा खटाटोप केला गेला. गेल्या तीन महिन्यांत 5 हजार, 189 रशियन महिला अर्जेंटिनामध्ये गेल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अनेक रशियन युवकांनी कम्पल्सरी मिलिटरी सर्व्हिस न करण्याकरिता इतर देशांमध्ये पलायन केले. याशिवाय अनेक श्रीमंत नागरिकांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. युक्रेनवरील आक्रमणानंतर नऊ लाख नागरिकांनी रशियातून पलायन केले आहे आणि हा लोंढा थांबण्याचे संकेत दिसत नाहीत.

दोन ते तीन कोटी रशियन रशियाच्या बाहेर इतर देशांमध्ये राहत आहेत. अरब-इस्रायल युद्ध संपल्यानंतर जसे इस्रायली बाहेरच्या देशांतून इस्रायलमध्ये परत आले होते तसे रशियन रशियामध्ये परत यायला तयार नाहीत. याचाच अर्थ होतो की, युक्रेन युद्धामध्ये लढण्याकरिता रशियाकडे पुरेसे सैनिक नाहीत. त्या देशाला सैनिकांची टंचई भासत आहे. त्यात शेकडो रशियन महिलांनी मॉस्कोमध्ये रस्त्यावर उतरून युद्ध नको, शांती हवी’, अशी मागणीच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडे केली आहे. बहुधा त्यामुळेच काही महिन्यांपासून फारशी लढाई होताना दिसत नाही. येणाऱ्या काळामध्येसुद्धा हे युद्ध पुन्हा सुरू व्हायची शक्यता दिसत नाही.