आभाळमाया – उल्कांचा पाऊस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

गेल्या आठवडय़ात आपण अशनी किंवा महापाषाणाने पृथ्वीला धडक देऊन निर्माण केलेल्या काही महाकाय विवरांचा मागोवा घेतला. अजूनही पृथ्वीवरची अनेक प्राचीन विवरं अज्ञात असू शकतात. काही दाट जंगलात दडलेली असतील तर काही सागरतळाशी बुडलेली असतील.

परंतु अवकाशात फिरणाऱया काही महापाषाणांचा पृथ्वीला धोका संभवत असला तरी अशा ‘निअर अर्थ’ अशनींपेक्षा रोज पृथ्वीकडे झेपावणाऱया उल्कांची संख्या प्रचंड असते. इंग्लिशमध्ये त्यांचं वर्णन ‘शूटिंग स्टार’ असं केलं जातं. तो अर्थातच ‘तारा’ आपल्या सूर्यासारखा विशाल असतो. आपल्याकडेही पूर्वी ‘तारा पडला’ असं म्हणत. हिंदी सिनेमात तर नायक-नायिका परस्परांना ‘वो देखो शूटिंग स्टार’ म्हणत तो ‘दाखवतात’ आणि ‘तू त्याच्याकडे काय इच्छा व्यक्त केलीस?’ असंही विचारतात. प्रत्यक्षात आकाशातून पडणारी उल्का म्हणजे पूर्ण जळून जाणारा छोटासा दगड असतो. तो ‘दाखवून’ प्रश्न वगैरे विचारेपर्यंत टिकत नाही. क्षणभर चमकून, किंचित प्रकाश रेषा निर्माण करून तो लुप्त होतो. सिनेमातली गोष्ट वेगळी, विज्ञानातली वेगळी.

काय आहे ती विज्ञानातली गोष्ट? कधी पडतात या उल्का? रोज रात्रीच्या आकाशात दिसतात का? रात्रभर आकाश न्याहाळत राहिलं तर काही उल्का नक्कीच दिसतात, पण ‘उल्कावर्षाव’ ज्याला म्हणतात तो विशिष्ट राशीच्या पार्श्वभूमीवर ठरावीक तारखांनाच होतो. आता नोव्हेंबरमध्ये 15 ते 19 पर्यंत सिंह राशीतून उल्कावर्षाव होईल तेव्हा त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

बरं, उल्का रात्रीच पडतात असे नाही. रात्री सूर्यप्रकाश नसल्यामुळे आणि अमावस्येला चंद्रप्रकाशही नसल्यामुळे त्या दिसतात इतकंच. एरवी दिवसाही किती तरी उल्का पृथ्वीवर येतच असतात. त्यांचं प्रमाण वाचाल तर चकित व्हाल. रोज (24 तासांत) सुमारे 25 लाख उल्का (दगड) पृथ्वीवर पडून 15000 टन वजनाची भर आपल्या निळय़ा ग्रहावर पडत असते! म्हणूनच विज्ञानाचा अभ्यास आश्चर्यकारक सत्यांचा असतो असं म्हटलं जातं.

या क्षणकाल चमकत्या उल्केचं स्वरूप सूक्ष्म धूलिकणांपासून पूर्ण ज्वलन होऊ शकेल एवढय़ा दगडांपर्यंत असतो. अवकाशात भरकटणारे हे धुलिकण आणि दगड पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ आले की, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जातात. तेव्हा त्यांचा वेग सेकंदाला 20 किलोमीटर असतो! सुमारे 100 किलोमीटरच्या वातावरणाला छेदून येतात तेव्हा त्या घर्षणातून उष्णता आणि प्रकाश साहजिकच निर्माण होतो. तीच प्रकाशरेषा आपण क्षणभर पाहतो.
आधी म्हटल्याप्रमाणे उल्केचा वेग सेकंदाला वीस ते बेचाळीस किलोमीटर असला तरी पृथ्वीच्या वातावरणात शिरताच पृथ्वीच्या वेगाचाही परिणाम होऊन उल्केचा प्रत्यक्ष (इफेक्टिव्ह) वेग सेकंदाला एकाहत्तर किलोमीटर एवढा होतो. आता विचार करा, एवढय़ा प्रचंड वेगाने येणारी उल्का पाहून कोणाला दाखवणं शक्य आहे का? योगायोगाने अनेकांनी ती उल्का त्याच वेळी पाहिली असेल तर गोष्ट वेगळी.

पृथ्वीच्या वातावरणात घर्षणाने जळून जाताना दिसते ती उल्का. मोठय़ा आकाराचे (10 मीटरपेक्षा जास्त) अशनी शक्तिशाली दुर्बिणीतून दिसू शकतात. एखाद्या उल्केमध्ये निकेल, लोह असे धातूही असू शकतात, तर काही पूर्ण दगडी (अग्निजन्य खडकांचे तुकडे) असतात.

17 जानेवारी 2013 च्या रात्री थेट सूर्यमालेबाहेरच्या उर्ट क्लाउडमधून निसटलेली उल्का अमेरिकेतील नेवाडा राज्यातून काही सेकंद अवकाशात जळताना दिसली. असे ‘फायर बॉल’ छोटय़ा उल्कांपेक्षा काही सेकंद जास्त दिसतात. काही उल्हा सूर्यमालेत प्रवेशलेल्या धूमकेतूंनी मागे सोडलेल्या द्रव्यातूनही निर्माण होतात. विशिष्ट राशींच्या पार्श्वभूमीवर ठरावीक दिवशी दिसणारा उल्कावर्षाव बहुदा धूमकेतूंनी मागे साडलेल्या द्रव्यातूनच निर्माण झालेला असतो.
अलीकडच्या काळात पृथ्वीवर पडलेल्या उल्कांचे काही अवशेष सापडले आहेत. उल्का साधारण जिथे पडली तिथे जाऊन गावकरी कुतूहलाने बघतात. थोडय़ा जनजागृतीमुळे याबाबतची त्यांची भीती कमी होत आहे. भर हिरव्या जंगलात मध्येच जळालेला भाग व छोटय़ा दगडाचा अवशेष दिसला तर काही जण ती घटना जवळच्या विद्यापीठाला कळवतात. 28 फेब्रुवारी 2009 रोजी सुदानच्या न्यूबियन वाळवंटात पडलेली उल्का अशीच शोधली गेली. अशा उल्कांचे तुकडे खगोलीय अभ्यास संस्थांमध्ये जतन करून ठेवण्यात येतात.

साधारण 1807 पासून उल्कावर्षावांचा वैज्ञानिक अभ्यास गतिमान झाला. 1833 मध्ये झालेल्या उल्का वादळाचा (सिरिअर स्टॉर्म) सुखद अनुभव घेतल्यानंतर वैज्ञानिकांबरोबरच सर्वसामान्यांचं कुतूहलही खूप वाढलं. आता आपल्याकडचा पावसाचा वर्षाव आणि कोविडचा कहर ओसरला की मुक्त श्वास घेत उल्कावर्षाव पाहायला कदाचित जाता येईल.