आभाळमाया – आकाशदर्शनाची तयारी

475

>> वैश्विक  ([email protected])

पावसाचा मोसम (बहुधा) संपलाय. आता वेध दिवाळीचे, लक्ष दीपांचा हा उत्सव काही दिवसांतच आपण अनुभवणार आहोत. त्याची तयारी घरोघर सुरू झाली असेल. पृथ्वीवरच्या चमचमत्या, रोषणाई करणाऱ्या दिव्यांनी आधीच पृथ्वीची रात्र कायमची उजळली आहे. दीपावलीच्या काळात अर्थातच हा झगमगाट वाढेल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या उक्तीला साजेसाच आपला हा वार्षिक सण असतो.

दिवाळीचा काळ आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. आकाशात भरून राहिलेली निरभ्र रात्रीची ‘आभाळमाया’ आता  भरभरून दिसू लागेल. तारकांनी खच्चून भरलेलं तारांगण पाहताना खूप मौज वाटेल. माणसाची अवकाशवेध घेण्याची ही आवड खूप जुनी आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य आणि टायकोब्राहे, गॅलिलिओ अशी जगभरची इतिहासकालिन अवकाश तज्ञ मंडळी त्या त्या काळातील साधनांसह किंवा नुसत्या डोळय़ांनी आकाशदर्शन करत आली. गेल्या तीन-चार दशकांत मात्र दुर्बिणींच्या उत्तम सोयीमुळे हे आकाशदर्शन सर्वसामान्यांच्याही नजरेत आलं. त्यातच 1980, 1995, 1999, 2009 या वर्षी हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाल्याने लोकांमध्ये याविषयी कुतूहल निर्माण झालं. ‘खगोल मंडळा’सारख्या संस्थांनी खगोल अभ्यासाचा सातत्याने प्रसार केला. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रूजण्यास मदत होऊन हजारो लोकांनी आकाशातील चमचमत्या तारकासमूहांची माहिती करून घेतली.

आता पुन्हा आकाशाकडे नजर रोखण्याची वेळ आली आहे. दिवाळीतल्या अमावस्येला दारी उजळलेल्या दिव्यांची आरास असेल, परंतु नंतर आठ दिवसांनी अष्टमीचा चंद्र दुर्बिणीतून न्याहाळण्याचा, निर्जन माळरानावरून आपली आकाशगंगा ‘याचि डोळा’ पाहून मनात साठवण्याचा आनंद काही निराळाच. आता पुढच्या पावसाळय़ापर्यंत अमावस्येच्या रात्री किंवा त्याआधीच्या वा नंतरच्या अष्टमीपर्यंतचा प्रत्येक महिन्यातला काळ हा आकाशदर्शनासाठी अत्यंत अनुकूल असेल. अर्थातच अवकाळी पाऊस आला नाही तरच ही आकाशीची दौलत पाहायला मिळेल. 1998 मध्ये सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा उल्का वर्षाव उत्तम प्रकारे दिसणार असे खगोलीय गणितामुळे आधीच समजले होते. आम्ही त्यासाठी सुमारे हजार-दोन हजार लोक येतील अशी अपेक्षा धरून वांगणी येथे तयारीसाठी गेलो. त्या रात्री तासाला 200 ते 250 उल्का आणि अग्निगोलक (फायरबॉल) अवकाश व्यापून टाकताना अनुभवले. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम उत्तमच होणार यात शंका नव्हती. तशी बातमीही दिल्यामुळे सुमारे 10 हजार पेक्षक जमले. सारे काही छान जुळून आलेले असतानाच ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आणि एका अप्रतिम कार्यक्रमावर अक्षरशः पाणी पडलं. सुजाण प्रेक्षकांनी ही गोष्ट समजून घेतली, आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या नियोजनाचं कौतुकही. आम्ही त्याला ‘ग्रॅण्ड फ्लॉप शो’ म्हटले. असेही घडते कदाचित, पण आकाशाखाली रात्र घालवून दुर्बिणी रोखण्याचा उत्साह मात्र द्विगुणित झाला.

या वर्षी आकाशातील महत्त्वाच्या ‘घटना’ म्हणजे 17 आणि 18 नोव्हेंबरचा सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा प्रसिद्ध उल्का वर्षाव ही रात्रीच्या आकाशातली मनोहारी गोष्ट, तर यंदा भर दिवसा दिसणारा अवकाशी सोहळा म्हणजे बुध ग्रहाचे सूर्यबिंबासमोरून जाणे. त्यालाच बुधाचे अधिक्रमण म्हणतात. याशिवाय 26 डिसेंबरला दक्षिण हिंदुस्थानातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण नऊ वर्षांनी पुन्हा दिसत आहे. त्याचा ‘आस्वाद’ घ्यायला खगोल अभ्यासक तयारीला लागलेत. त्यासाठीच खास चष्मे विविध खगोल संस्था देतील. एरवीच्या आकाशदर्शनासाठी एक लेझर टॉर्च आणि नुसती नजर पुरेशी आहे. दुर्बिण असेल तर अधिक चांगले. मात्र दुर्बिणीच्या मिरर किंवा लेन्सला फंगस लागलं असेल तर ते आताच साफ करून घ्यायला हवे. दुर्बिणीचे ट्रायपॉड आणि अलाइन्मेंट’ यांची तपासणी करायला हवी. एवढय़ा सामग्रीनिशी अंधाऱ्या निरभ्र जागी अवघे अवकाश आपलेच आहे!

आपली प्रतिक्रिया द्या